नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
तलत मेहमूद एकेकाळी खूप लोकप्रिय गायक होते, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यांनी सिनेमात नायकाची भूमिका केली होती, हे थोड्याच लोकांना माहीत असेल. त्या सिनेमात त्यांना ‘सिंगिंग स्टार तलत मेहमूद’ म्हणून पहिल्यांदाच सादर करण्यात आले होते. इतर कलाकार होते श्यामा, पीस कंवल, दिवान शरार, एस. एन. बॅनर्जी, मास्टर रोमी आणि रमेश.
तसे १९४५ पासून १९५८ पर्यंत तलत मेहमूद यांनी १४ चित्रपटांत काम केले. अगदी नूतनपासून काननबाला, रुपमाला, मधुबाला, शशिकला, काननदेवी, भारतीदेवी, सुरैया, शामा, नादिरा आणि मालासिन्हापर्यंतच्या एकापेक्षा एक अभिनेत्रींबरोबर आणि देव आनंद, शम्मी कपूरसारख्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. मात्र त्यांना अभिनयात फारसे यश मिळाले नाही, तरी अत्यंत आगळ्या हळुवार आवाजामुळे आणि वेगळ्याच गायनशैलीमुळे त्यांचे चित्रपटसृष्टीतील स्थान आज केवळ अद्वितीयच आहे.
त्यांना दिलीपकुमार ‘परफेक्ट जंटलमन’ म्हणत. त्यांची गाणी आवडणारा फार मोठा रसिकवर्ग आजही आहे. विशेषत: सिनेमातील गझल गायनासाठी त्यांना ओळखले जाते. ज्या चित्रपटाने त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले तो होता, १९५३चा ‘कारदार प्रॉडक्शन’चा ‘दि-ए-नादान.’ याचे वेगळेपण असे की, कथा प्रेमाच्या त्रिकोणाची असली, तरी हा त्रिकोण वेगळा होता! सहसा त्रिकोणात एकाच मुलीवर दोन मुलांचे प्रेम असते. इथे दोन सख्ख्या बहिणी एकाच तरुणाच्या प्रेमात पडतात. त्यातून निर्माण झालेली शोकांतिकावजा सुखांतिका म्हणजे ‘दिल-ए-नादान.’
सेठ हिराचंद यांना दोन मुली–आशा (श्यामा) आणि कामिनी (पीस कंवल) आहेत. मोहन (तलत मेहमूद) हा संगीतकार होण्यासाठी धडपडणारा तरुण घरून पाठिंबा न मिळाल्याने, सेठजींच्या आश्रयाला येतो. ते त्याला संगीतकार होण्यासाठी मदत करतात. त्यात कामिनी आणि मोहन एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस आशा (श्यामा) अचानक कामिनीला आपले गुपित सांगते की, तिचे मोहनवर प्रेम आहे. झाले! आपल्या मोठ्या बहिणीला दु:खी करायचे नाही म्हणून कामिनी आपल्या प्रेमाची आहुती देऊन, मोहनला आशाशी लग्न करावयास भाग पाडते. मात्र आतून पूर्णत: निराश झालेला कलासक्त मोहन आणि स्वच्छंदी जगायला उत्सुक असलेली आशा या दोघांत अजिबात पटत नाही.
आशाला मोहनच्या गाण्यात काहीही रस नाही. तिला फक्त भौतिक सुखात रुची असल्याने, मनाने दोघे कधीच जवळ येत नाहीत, पदोपदी भांडणे होत राहतात. खरे तर आशाच मोहनचा सतत पाणउतारा करत राहते. त्यात तिला मोहन आणि कामिनीमधील पूर्वीच्या प्रेमाबद्दल माहीत झाल्याने ती प्रचंड संतापते.
रागाच्या भरात घाईघाईत जिना उतरताना, गर्भारशी आशा जिन्यावरून पडून जखमी होते. मुलाला जन्म दिल्यावर तिचा मृत्यू होतो. जाताना ती बाळाला कामिनीच्या हाती सोपवून जाते. पुढे तो मुलगा मोहन आणि कामिनीला एकत्र आणतो अशी कथा!
त्यातली शकील बदायुनी यांची खुद्द गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेली सर्वच ९ गाणी गाजली. त्यातले तलतजींनी सुधा मल्होत्रा आणि जगजीत कौर यांच्याबरोबर गायलेले-
‘मुहब्बतकी धून बेकरांरोसे पुछो,
नगमा हैं क्या चांद तारोसे पुछो’
सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातले –
‘ना वो हमारे, ना दिल हमारा,
कहीं भी अपना नही ठिकाना’
आणि खुद्द तलतजींच्या आवाजातले-
‘ये रात सुहानी नही,
ए चांद सितारो सो जावो.’
विशेष लोकप्रिय ठरले. या सिनेमात तलतजींच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणे होते. शकील बदायुनी यांच्या लेखणीतून उतरलेल्या त्या गाण्याचे शब्द मनाला घेरून टाकतात. चित्रपटातला प्रसंग असा असतो की, नकळत बहिणीच्या प्रेमाचा बळी घेऊन, मोहनशी लग्न केलेली आशा त्याच्याबाबतीत अजिबात खूश नाही. ती त्याचा चक्क तिरस्कार करू लागली आहे. त्याचे गाणे, रसिकता, कला काहीही तिला आवडत नाही.
मोहनने आपले सच्चे प्रेम गमावून, तिच्यासाठी आयुष्याची आहुती दिली, याची जाणीवही तिला नाही. त्यावर सततचा अपमान आणि दु:स्वास मोहनला असह्य झालेला आहे. एके दिवशी रस्त्यावरचे गाणारे त्यांच्या बंगल्यापुढे येऊन गाणे म्हणत असतात. ते दारोदार पैसे मागणारे गरीब कलाकार असतात. मोहन त्यांचे गाणे मनापासून ऐकत असतो. तशात आशा संतापून बाहेर येते आणि त्यांना हाकलून लावते. तिच्या दु:स्वासाने आधीच दु:खावलेला मोहन या प्रकाराने उदास होतो, एकटाच बसून गावू लागतो. मात्र तरीही त्याची तिच्याबद्दल तक्रार नाही. तो देवाकडेच आपले दु:ख मांडत ‘त्या’चीच तक्रार करतो आहे-
‘जिन्दगी देनेवाले सून,
तेरी दुनियासे दिल भर गया.
मैं यहाँ जीते-जी मर गया.
ज़िन्दगी देनेवाले सुन…’
हिंदी सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे गाणे गायलेले असते. तेही केवळ ‘गाणे’ म्हणून नाही तर खरोखर परमेश्वराकडे अगतिकपणे केलेली त्याचीच तक्रार म्हणून! इतक्या या गाण्यातल्या भावना सार्वत्रिक होत्या. ‘देवा, हे जीवन तू दिलेस; पण आता मला ते नकोसे झाले आहे. जगणेच जर असे असेल, तर मरण अजून काय वेगळे असणार? मला नको तुझे जीवन! सोडव मला यातून.’ असे कधी तरी ‘त्याला’ प्रत्येक संवेदनशील हृदयाने आतल्या आत सांगितलेले असतेच. त्यामुळे अशी गाणी त्यांचा सिनेमातील संदर्भ पूर्णत: बाजूला ठेवूनही जवळची वाटतात. निराशेत आणि दु:खात जेव्हा माणसाची जगण्याची इच्छाच संपते, तेव्हा त्याला दिवसातला एकेक क्षण असह्य असतो –
‘रात कटती नहीं, दिन गुज़रता नहीं,
ज़ख़्म ऐसा दिया है के भरता नहीं.
आँख वीरान है, दिल परेशान है,
ग़मका सामान है…
जैसे जादू कोई कर गया
ज़िन्दगी देनेवाले सुन…’
अनेकदा उघडपणे आपली काहीही चूक दिसत नसताना, माणूस मूकपणे शिक्षा भोगत असल्यासारखे, उदास दिवस काढत असतो. जगण्यात काहीच अर्थ नाही, असा अनुभव त्याला पदोपदी येत असतो. जणू मन आतूनच मेलेले आहे असे वाटते. मग त्याचे मूक आक्रंदन एक हुंकार बनते. त्याला देवाला विचारावेसे वाटते, ‘माझ्या पदरी तूच दिलेल्या एवढ्याशा सुखाने तुला कसली भीती वाटली? माझा मत्सर वाटला का? का तू मला हे डोंगराएवढे दु:ख आणि ते भोगायला इतके दीर्घ आयुष्य दिलेस?’
‘बेख़ता तूने मुझसे ख़ुशी छीन ली,
ज़िंदा रखा, मगर ज़िन्दगी छीन ली.
कर दिया दिलका ख़ूँ, चुप कहाँतक रहूँ,
साफ़ क्यूँ न कहूँ..
तू ख़ुशीसे मेरी डर गया
ज़िन्दगी देनेवाले सुन…’
अशी जुनी गाणी सिनेमातील त्या त्या प्रसंगाला चपखल बसणारी असली तरी तो संदर्भ सोडूनही कोणत्याही दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या एखाद्या सुहृदाप्रमाणे असत. म्हणून तर रसिक हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात त्यांना जपून ठेवतात. आतल्या आत गुणगुणतात.