Saturday, July 6, 2024

सूर्यमाला

कथा – प्रा. देवबा पाटील

आज यशश्री खूपच खूश दिसत होती. कारण तिला परीताईकडून रोज नवनवीन माहिती मिळत होती. परीताई आल्यावर तिने तिचे नेहमीसारखे चहा-पाण्याने स्वागत करून, आपली प्रश्नमाला सुरू केली.
“बरे ग्रह, उपग्रहांना स्वत:चा प्रकाश का नसतो मग?” यशश्रीने विचारले.
“काही ग्रह हे थंड होत होत घन बनलेत. असे काही ग्रह, उपग्रह हे घनरुपात आहेत; परंतु काही द्रवरुपातही आहेत. काही गोठीव वायु-द्रवरुपात आहेत. त्यामुळे त्यांचे तापमान सूर्याइतके प्रचंड नसते म्हणून त्यांना स्वत:चा प्रकाश नसतो.” परीने उत्तर दिले.

“आकाशात ता­ऱ्यांपासून ग्रह कसे काय निर्माण झाले असतील?” यशश्रीने विचारले.
“खगोल शास्त्रज्ञ असे सांगतात की, तारे हे तप्त वायूंचे गोळे असतात. अब्जावधी वर्षांपूर्वी एक महाकाय अतिशय उष्ण असा तप्त वायूंचा एक गोळा या अवकाशात फिरत होता. त्याला महाकाय तारा असे संबोधण्यात आले.” परी पुढे म्हणाली की, “तर त्या महाकाय ता­ऱ्यांचा भयंकर मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाने त्याचे अनेक तुकडे झालेत.”
“त्याच तुकड्यांचे तारे, ग्रह बनलेत. असेच ना परीताई?” यशश्रीने विचारले.

“खरेच, तू खरोखरच बुद्धिमान आहेस.” परी म्हणाली.
“ताई, आमच्या सरांनी आजच, तर आम्हाला बरेच काही शिकविले.” यशश्रीने सांगितले.
“तर जे तुकडे तसेच उष्ण वायूंचे तप्त गोळे राहिलेत, ते तारे बनलेत व जे तुकडे कालांतराने हळूहळू थंड होत घन झालेत त्यांचे ग्रह, उपग्रह बनलेत. अशारीतीने ता­ऱ्यांपासून ग्रह निर्माण होतात.” परी म्हणाली.
“अशाच रीतीने आमची सूर्यमालाही तयार झाली ना ताई?” यशश्रीने विचारले.

“हो. सूर्यही आधी असाच भयंकर उष्ण असा एक महाकाय गोळा अवकाशात मुक्तपणे फिरत होता. फिरता फिरता, त्याचा भयंकर मोठा असा स्फोट झाला. त्या स्फोटाने त्याचे अनेक तुकडे झालेत. त्या तुकड्यांपेकी सर्वात मोठा अतिशय उष्ण वायूंचा मूळ गोळ्याचा तुकडा आजचा सूर्यतारा बनला. बाकीच्या तुकड्यांचे ग्रह व उपग्रह निर्माण झालेत. काही तुकड्यांचे ग्रहांमधील रिकाम्या जागांत असे ग्रहांसारखेच, परंतु आकाराने खूप लहान असे अनेक लघुग्रह बनलेत. काही तुकड्यांच्या उल्का बनल्यात, काही तुकड्यांपासून धूमकेतू बनलेत. ते सारे ग्रह खूप वेगाने व खूप जोराने दूर फेकल्या गेल्याने, तेही गतिमान झालेत व स्वत:भोवती नि आपल्या सूर्याभोवती फिरू लागलेत. लघुग्रह, उल्का नि धूमकेतू हे सूर्याभोवती फिरत असतात. उपग्रह मात्र हे स्वत:भोवती व स्वत:च्या ग्रहाभोवतीही फिरतात. सूर्य व हे सारे ग्रह, ग्रहांचे उपग्रह, धूमकेतू, उल्का व लघुग्रह असे सर्व मिळून सूर्यमाला तयार झाली.” परीने सविस्तर सांगितले.

“आकाशात एखाद्या ता­ऱ्याचा स्फोट एकाएकी कसा काय होतो?” यशश्रीने विचारले.
“अतिशय कमी वेळात संपूर्ण बदल घडवून आणणारी जी अस्थिर अवस्था असते, तिला स्फोट म्हणतात. या स्फोटमय अवस्थेतील पदार्थ इतके अस्थिर असतात की, त्यांना किंचितसाही धक्का लागला, तरी ते ताबडतोब एकमेकांपासून अत्यंत जोराने दूर फेकल्या जातात. हा अस्थिरपणा स्फोटमय अवस्थेचे मुख्य लक्षण आहे. जेवढा अस्थिरपणा जास्त तेवढा स्फोट होण्याचा संभव जास्त असतो. जेव्हा एखाद्या ताऱ्यातील घटक पदार्थ अतिअस्थिर होतात नि ते एकमेकांवर आदळतात, तेव्हा त्या ता­ऱ्यांचा एकदम स्फोट होतो. काही तारे अतिआकुंचित होतात व अतिआकुंचनाने शेवटी त्यांचाही स्फोट होतो.” परीने सांगितले.

“म्हणजे रात्रीला जे चमकताना दिसतात, ते तारेच असतात. ग्रह नसतात. असेच ना?” यशश्रीने विचारले.
“बरोबर, रात्रीला जे चमचमताना दिसतात, ते तारेच असतात. पण काही ग्रह हे परप्रकाशित आहेत म्हणजे त्यांना स्वत:चा प्रकाश नाही; परंतु ते त्यांच्या ता­ऱ्याचा प्रकाश परावर्तित करतात.” परी सांगू लागली, “उदा. पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह. तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो आणि छान चमकताना दिसतो. असे काही जवळचे परप्रकाशित ग्रहसुद्धा प्रकाशित दिसतात; पण त्यांचा प्रकाश हा स्थिर चमकताना दिसतो, लुकलुकताना मुळीच दिसत नाही.”
“ताई आज मला गृहपाठ करावयाचा आहे.” यशश्रीने असे म्हणताबरोबर “छान आहे. तू आज तुझा गृहपाठ उरकून घे. आपण उद्या भेटू.” असे म्हणून परीताई निघाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -