Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजशाळा सुटली पाटी फुटली!

शाळा सुटली पाटी फुटली!

बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत. मराठी भाषा टिकली नाही, तर मराठी संस्कृती टिकणार नाही, संस्कृती टिकली नाही, तर आमच्याकडे उरणार काय? काहीच हातात राहणार नाही, ही खंत अनेकांना जाणवते. आज मराठी शाळाच राहिल्या नाहीत, तर खापराच्या पाट्या पाहायलाही मिळत नाहीत. काळ्याशार नव्या पाटीवर पेन्सिलने हातात हात घेऊन, अक्षरे गिरविणे हा संस्कारही काळाबरोबर कधी संपला, तेही समजलं नाही.

विशेष – लता गुठे

रविवारचा दिवस. सकाळची नऊ-साडेनऊची वेळ. प्रत्येक रविवारी सकाळी जुहू चौपाटीवर फेरफटका मारून झाल्यानंतर, समुद्राची गाज ऐकत, निवांत वाळूवर बसून, ओली माती पायावर थापून, त्याचा खोपा बनवण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एक मुलगी खेळता खेळता गाणं म्हणत होती… तेही चक्क मराठीतलं आणि आताच्या काळातलं नाही, तर ५० वर्षांपूर्वीचं जे ५०-६० वर्षांपूर्वी पहिली दुसरीला असतील, त्या प्रत्येकाने म्हटलेलं हे गाणं… ‘शाळा सुटली पाटी फुटली…’

काल एक छोटीशी मुलगी बडबड करत होती…
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली
तिचं ते तालासुरातलं गाणं कानावर पडलं अन् आपसूक माझ्या ओठांतून पुढच्या ओळी बाहेर पडल्या. जून महिना सुरू झाला की, शाळेचे वेध लागायचे. कधी एकदा शाळा सुरू होते आणि कधी शाळेत जाते असं व्हायचं. नवीन पाटी-पुस्तकं पाहण्यासाठी जीव व्याकूळ व्हायचा आणि कितीही सांभाळून वापरायची म्हटलं, तरी कधी तरी पळता पळता ठेच लागून पडले की, पाटी हमखास फुटायची. एकदा पाटी फुटली की, वर्षभर दुसरी पाटी भेटायची नाही, याची गॅरंटी असायची. त्या निवांत सकाळी बालपणीच्या आठवणीत मीही रमले.

‘तिने पुन्हा ये रे पावसा’ हे गाणं सुरू केलं. तिच्या इंग्लिश टोनमध्ये म्हटलेले गाणे कानाला छान वाटले म्हणून मी तिच्याकडे निरखून पाहिलं. जवळ गेले आणि विचारलं, “तुला कोणी गं गाणं शिकवलं?” तिने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा खेळायला लागली. मी पुन्हा हाच प्रश्न विचारला. तोंडावर आलेले केस मागे सावरत म्हणाली, ‘‘माय ग्रँड मदर.”
तुला मराठी समजतं?
“of course…
but I can’t speak…”

आज प्रत्येक घरामध्ये हीच अवस्था झाली आहे. घरात आम्ही मराठी बोलतो; परंतु आमची नातवंडं कॉन्व्हेंटच्या शाळेत जातात. आता सीबीएससी, आसीएसी बोर्डाच्या शाळेचा सुकाळ झाला आहे. वाटेल ती फी भरून, त्याच शाळेत मुलं पाठवायची, हा पालकांचा अट्टहास असतो. स्पर्धेच्या युगात कोणत्याच पालकांना वाटत नाही, आपली मुलं मागे राहावीत. त्यामुळे शहरातच नाही, तर खेड्यांमध्येही हीच अवस्था आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी त्या मुलांचे आई-वडील तरी त्यांच्याबरोबर इंग्रजी बोलतात; परंतु ग्रामीण भागांमध्ये आजूबाजूच्या घरातलं सारंच वातावरण मराठी असतं. इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये सर्वच मराठी माध्यमात शिकलेले शिक्षक, शिक्षिका इंग्लिश माध्यमातील मुलांना शिकवतात. त्यामुळे फक्त पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम शिकविण्यापुरते इंग्लिश मर्यादित असते. त्या मुलांची ससेहोलपट होते.

शाळेच्या बाहेर पडले की, मुलं मराठी बोलतात, ऐकतात. ९९ टक्के घरातील मुलांचे पालक मुलांबरोबर मराठीत बोलतात; परंतु मुलांनी इंग्रजी शिकावं, हा अट्टहास असतो. कोणीही मराठी माध्यमात मुलं शिकवायला तयार नाही, त्यामुळे मराठी माध्यमातील शाळा बंद पडत चालल्या आहेत. सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांची यामुळे कुचंबना होत आहे. परकीय भाषेमध्ये शिकणारी मुलं घोकमपट्टी करून, जेमतेम पास होण्यापुरते मार्क्स पडतात; परंतु त्यांची कल्पकता, सर्जनशीलता परकीय भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मारली जाते. मातृभाषेतून शिकलेली मुलं ज्या पद्धतीने विचार करू शकतात, कल्पना करू शकतात, त्या प्रमाणात परकीय भाषेतून शिकणारी मराठी मातृभाषा असलेली मुलं विचार करू शकत नाहीत. मराठी वातावरणातून गेलेल्या मुलांना इंग्रजी बोलणे अवघड जाते, त्यामुळे अभ्यासातले लक्ष हे कमी होते. शाळेबद्दल नावड निर्माण झाल्यामुळे, शाळेतही जाण्याचा कंटाळा येतो.

कालचीच गोष्ट, माझी घरकाम करणारी बाई दररोज दार उघडल्याबरोबर हसून घरात येते आणि उत्साहाने पटापट काम आवरून, “ताई मी येते” असं म्हणून धावत असते. मी कित्येक दिवसांपासून तिला पाहत असल्यामुळे, तिच्या चेहऱ्यावरील उदास भाव पाहून अंदाज आलाच. कारण आदल्या दिवशी ती म्हणाली होती, उद्या पोराचा दहावीचा निकाल आहे. मी न राहवून तिला विचारलं, काय झालं? अशी उदास का दिसतेस? त्यावर ती म्हणाली… “पोरगं तीन विषयांत नापास झालं. नवरा सोडून गेला, तेव्हा एवढंसं होतं ताई. इंग्लिश शाळेत घातलं. दिवसभर राब राब राबून, त्याची शाळेची फी भरली. काही कमी पडून दिलं नाही. सगळं पाण्यात गेलं बघा.” असं म्हणून तिने डोळे पुसले.

“जे झालं ते झालं. जाऊ दे आता. ते तीन विषय सहा महिन्यांनी पुन्हा देता येतील.” तिची समजूत काढण्यासाठी मी म्हणाले.
“रातच्या पासून माळ्यावर झोपलंय. वर तोंडबी करेनाय.”
“त्याला काही म्हणू नकोस आता. चूक तुझी आहे.” तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिले. “इंग्लिश मीडियमला का घातलंस? मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं असतंस, तर पोरगं शिकलं असतं” मी म्हणाले. पण वेळ निघून गेल्यानंतर जर तरच्या बोलण्याला काय अर्थ आहे म्हणा! ही कहाणी एका घरातली नसून, अनेक घरातली आहे. मूल नापास झालं की, वैफल्यग्रस्त होतात. पुढे शिकण्याची उमेद राहत नाही. त्यांच्या मनात अभ्यासाविषयी भीती निर्माण होते. हे सगळं वर्षानुवर्ष चालूच आहे; परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही. इंग्लिश मीडियमचाच अट्टहास यासाठी धरला जातो; कारण मराठी माध्यमांमधून पुढचं शिक्षण नाही. बी. ए. करायचं म्हटलं, तरी इंग्लिशमधून करावं लागतं. हा अनुभव माझा आहे. मी जेव्हा चेतना कॉलेजला बी. ए. ला ॲडमिशन घेतलं, तेव्हा मराठीमधून शिकण्याची इच्छा असतानाही, नाईलाजाने इंग्लिश माध्यमामधून अ‍ॅडमिशन घ्यावं लागलं; कारण मराठीतून शिकविण्याची तिथे सोय नव्हती.

आज सगळीकडे इंग्लिश मीडियमच्या शाळांचा सुकाळ झाला आहे, त्यामुळे मराठी भाषेला उतरती कळा लागली आहे. लेखिका, प्रकाशिका म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये वावरताना अनेक प्रश्न, समस्या समोर येत आहेत. मराठी साहित्याकडे, पुस्तकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे, वाचक पुस्तकांपासून दूर चालले आहेत. मुलांना शाळेचा अभ्यासच पूर्ण करता करता नाकी नऊ येतात. अवांतर वाचायला, त्यांना वेळच मिळत नाही. इंग्लिश माध्यमात शिकत असल्यामुळे, मराठी पुस्तकं वाचण्याची त्यांना अजिबात इच्छा नसते. त्यामुळे ही मुलं बोनसायसारखी झाली आहेत.

आमच्यावर लहानपणी वाचनाचे संस्कार झाले. मराठी माध्यमात शिकल्यामुळे, शाळेचा अभ्यास सहज चालता बोलता व्हायचा. त्यामुळे गोष्टीची पुस्तकं वाचायला वेळ मिळायचा. आमच्या काळात शिकवणी नव्हत्या किंवा कोणी अभ्यास करा असंही म्हटलं नाही, तरीही चांगले मार्क्स पडायचे. टी.व्ही., मोबाइल नसल्यामुळे अवांतर वाचन भरपूर झालं आणि विचारांच्या कक्षा रुंदावल्या. सृजनशील मनावर बालवयातच वाचनाचे संस्कार रुजले आणि ते कायम राहिले. हे सर्व आमच्या पिढीसाठी… आमची मुलं इंग्लिश मीडियमला घातली; परंतु त्यांच्यावर वाचनाचे संस्कार केले. आज मराठी नाही; पण इंग्लिश पुस्तकं तरी वाचतात. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी मुलंच नातवंडाबरोबर इंग्लिश बोलतात, त्यामुळे मराठीचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना ही भीती वाटते की, पुढे मससराठीचं काय होणार? मराठी पुस्तकं वाचलीच गेली नाही, तर मग मराठी पुस्तक आम्ही लिहितो कोणासाठी? कोण ते वाचतील?

बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत. मराठी भाषा टिकली नाही, तर मराठी संस्कृती टिकणार नाही, संस्कृती टिकली नाही, तर आमच्याकडे उरणार काय? काहीच हातात राहणार नाही, ही खंत माझ्यासकट अनेकांना जाणवते. आता मागेही जाणे शक्य नाही. कितीही सांगितलं, तरी कोणीही मराठी माध्यमात मुलं शिकायला पाठवणार नाहीत. यावर फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश हा पॅटर्न सक्तीचा करायला पाहिजे. म्हणजे मुलं मराठीही शिकतील आणि इंग्रजीही.

आज मराठी शाळाच राहिल्या नाहीत, तर खापराच्या पाट्या पाहायलाही मिळत नाहीत. काळ्याशार नव्या पाटीवर पेन्सिलने हातात हात घेऊन, अक्षरे गिरविणे हा संस्कारही काळाबरोबर कधी संपला, तेही समजलं नाही. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते बालपण आठवलं आणि बाबांच्या हातासोबत गिरविलेला श्री गणेशाही…

सरकार मायबापला लवकर जाग येवो. संपूर्ण महाराष्ट्रात सेमी इंग्लिश हा पॅटर्न लागू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -