
मध्य रेल्वेने दिली मोठी माहिती
मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकावरील फलाट विस्तारीकरणासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. या ब्लॉकदरम्यान रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली सर्व कामे आटोपून रेल्वे लोकल सेवा लवकर सुरळीत करावी, अशी प्रवाशांनी मागणी केली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने वेळेआधीच कामे पूर्ण करण्याचा मानस साधला होता. अशातच आज दुपारी हा मेगाब्लॉक संपणार असून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र ब्लॉक संपूनही काही रेल्वे रद्द केल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे आजही गरज असल्यास प्रवाशांनी बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे हाल पाहता प्रशासनाने देखील ब्लॉककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवरील सुरू असलेली कामे जवळपास पूर्ण होत आली आहे.
सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक आज रविवारी दुपारी १२.३० वाजता तर ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक आज दुपारी ३.३० वाजता संपणार आहे. मात्र, सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार असल्याने आजही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
इतक्या रेल्वेगाड्या रद्द
आज लोकल ट्रेनच्या २३५ फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याचप्रमाणे ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.