हवामान विभागाने दिला अंदाज
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी नागरिक उकाड्याने (Heat) हैराण झाले आहेत. उष्णतेने त्रस्त असलेला प्रत्येक नागरिक पावसाची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक आनंदवार्ता मिळत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या झळांपासून मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान अभ्यासकांनी येत्या दोन दिवसात मुंबईत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज दिला आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून भारतात दाखल झाला असून १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार आहे. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असल्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईत ४ ते ५ जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच १० जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढील आठवड्यात असं असेल तापमान
हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे, पुढील आठवड्यात ढगाळ आकाशासह वातावरणात धुकं राहण्याचा अंदाज दिला आहे. त्याचबरोबर, रविवार आणि सोमवारी किमान तापमान २८ अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी तापमान २७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.