Wednesday, July 17, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनवाराणसीत मोदींचीच जादू...

वाराणसीत मोदींचीच जादू…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघात शनिवारी, १ जून रोजी मतदान पार पडले. वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. गुजरातचे मोदी आपले राज्य सोडून उत्तर प्रदेशातील पवित्र अशा वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेवर जात आहेत. त्यांचा विजय १०१ टक्के निश्चित आहे. पंतप्रधान मोदींनी या मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर तब्बल ५० वेळा तरी वाराणसीला भेट दिली. लोकांनी निवडून दिल्यानंतर अनेक खासदार मतदारसंघात लोकांना कधी दिसत नाहीत, भेटत नाहीत, पण मोदी यांनी आपल्या मतदारसंघाशी नियमित व सातत्याने संपर्क ठेवला आहे. मतदारसंघात अनेक विकासकामे तर सुरू केलीच, पण मतदारसंघ स्वच्छ, सुंदर कसा राहील यावरही त्यांचा कटाक्ष आहे.

वाराणसीमधील रस्ते रुंद झालेत, वीजपुरवठा अखंड आहे, वाराणसी हे गेल्या दहा वर्षांत एक सुंदर शहर बनले आहे. अमूल डेअरीनेही आपले चांगले बस्तान येथे बसवले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदींचे वाराणसीतील मतदारांशी अनोखे नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर निघालेल्या ‘रोड शो’मध्ये लाखो लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘रोड शो’ ज्या मार्गाने योजला होता, ते रस्ते दिव्यांनी उजळून निघाले होते. त्या मार्गावरील घराघरांवर सजावट करण्यात आली होती. मोदींचे स्वागत म्हणजे दिवाळी-दसरा असे वातावरण वाराणसीत होते. आपण निवडून दिलेला खासदार हा देशाचा पंतप्रधान आहे व ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर आपला खासदार पंतप्रधानपदाची हॅटट्रीक करणार आहे, यावर वाराणसीकरांचा विश्वास तर आहेच पण मोदींविषयी प्रत्येकाच्या अंत:करणात अभिमान आहे.

वाराणसीतून मोदी निवडून येणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. मोदींच्या नावानेच भाजपाचे व एनडीएतील मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येतात. उमेदवार कोण आहे याचा विचार न करता मतदार कमळाला मत म्हणजेच मोदींना मत असा विचार करून ईव्हीएमवर बटण दाबतात. वाराणसीतून मोदी हे विक्रमी मताधिक्य घेऊन निवडून आले पाहिजेत अशा जिद्दीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेले दोन महिने काम केले आहे. २०१४ व २०१९ पेक्षा जास्त मताधिक्य मोदींना मिळाले पाहिजे, अशी पक्षाने योजनाबद्ध आखणी केली होती. जम्मू-काश्मीरपासून ते हैदराबादपर्यंत पक्षाचे नेते, वक्ते व प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठी हजेरी लावली. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या मंत्र्यांनी तर वाराणसी मतदारसंघ पिंजून काढला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल, एस. जयशंकर, स्मृती इराणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री व प्रमुख नेत्यांनीही वाराणसीत येऊन प्रचार केला. मोदींना मिळणारा अफाट प्रतिसाद पाहून स्वत: फडणवीस भारावून गेले. मतदारसंघातील ब्राह्मण, ओबीसी, भूमिहार, दलित, अशा सर्व घटकांपर्यंत भाजपाचा कार्यकर्ता प्रचारासाठी पोहोचला पाहिजे यावर कटाक्ष होता. हैदराबादच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लताही वाराणसीत आल्या होत्या.

वाराणसी शहर हे बनारस किंवा काशी म्हणूनही ओळखले जाते. मंदिराचे शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे. हिंदू भाविकांसाठी हे पवित्र शहर आहे. मोदींनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, तसेच एनडीएमधील अनेक दिग्गज नेते हजर होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरेड संगमा, जनसेवा पक्षाचे पवन कल्याण, राष्ट्रीय लोकमोर्चाचे उपेंद्र कुशावह, हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जतीन राम मांझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू, निशाद पक्षाचे संजय निषाद, सुहेल भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभोर, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, लोजपा चिराग पासवान, तसेच अंबुमणी रामदास, पी. के. वासन, देवनाथन यादव, तुषार वेल्लापल्ली, अतुल बोरा आदी नेते उपस्थित होते. सन २०१४ पूर्वीची वाराणसी आणि आता दहा वर्षांनंतरची वाराणसी यात फार मोठा बदल झाला आहे. मोदींमुळेच हा मतदारसंघ व्हीआयपी झाला. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने वाराणसीच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले गेले. फेब्रुवारी महिन्यात मोदींच्या हस्ते वाराणसीमधील १३००० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन असा मोठा कार्यक्रम झाला. मोदी खासदार झाल्यापासून वाराणसीचा मोठा लाभ झालाच पण मतदारांच्या अनेक अपेक्षाही पूर्ण झाल्या.

नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाला तगडा उमेदवार गेल्या तीनही निवडणुकीत मिळाला नाही. त्यामुळे वाराणसीतील निवडणूक लागोपाठ तिसऱ्यांदा एकतर्फी होत आहे. गेल्या दोन निवडणुकीत मोदींच्या विरोधात पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात उभे आहेत. काँग्रेसला मोदींच्या विरोधात उमेदवारच सापडत नाही हे त्याचे कारण आहे. स्वत: अजय राय हे उत्तर प्रदेश विधानसभेवर आमदार म्हणून पाच वेळा निवडून गेले आहेत. पैकी तीन वेळा ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले होते. नंतर ते सपामध्ये गेले व आता ते काँग्रेसमध्ये आहेत. यावेळी त्यांनी स्वत: काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून मोदींच्या विरोधात वाराणसीमधून प्रियंका गांधी वड्रा यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती पण पक्षाने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. मोदींच्या विरोधात सपा व बसपने आजवर जे जे उमेदवार उभे केले ते सुद्धा त्यांच्यापुढे लेचेपेचे ठरले. गुजरातमधून आलेल्या मोदींविषयी उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या मतदारांना काँग्रेस, सपा किंवा बसपपेक्षा जास्त विश्वास वाटतो. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तर अब की बार दस लाख पार… असा संकल्प यावेळी केला आहे. वाराणसी मतदारसंघात १८ लाख ५४ हजार ५४० मतदार असून रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कॅन्ट, सेवापुरी असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.

सन २०१४ मध्ये मोदींच्या विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वसर्वो अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढवली होती. मोदींचा लोकसभेत निवडून जाण्याचा रस्ता रोखण्याचा केजरीवाल यांनी चंग बांधला होता, पण मतदारांनी तो उधळून लावला. २०१४ च्या निवडणुकीत मोदींना ५,८१,०२२ मते मिळाली, केजरीवाल यांना २,०९,२३८ मते पडली, तर अजय राय यांना ७५ हजार ६१४ मते पडली होती. सन २०१९ च्या निवडणुकीत मोदींना ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळाली, सपाच्या शालिनी यादव यांना १ लाख ९५ हजार १५९, तर काँग्रेसचे अजय राय यांना १ लाख ५२ हजार ५४८ मते मिळाली. अजय राय यांनी मोदी हे बाहेरचे उमेदवार आहेत, असाही प्रचार केला. काशीची संस्कृती वेगळी आहे, ती त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील असेही सांगितले. पण राय यांना गेल्या दोन्ही निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

सन २००९ मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे वाराणसीमधून लोकसभेवर निवडून आले होते. त्यांना २ लाख ३ हजार १२२ मते मिळाली, त्यांच्या विरोधात बसपचे मुख्तार अन्सारी यांना १ लाख ८५ हजार ९११, तर सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे अजय राय यांना १ लाख २३ हजार ८७४ मते मिळाली. सन २००९ मध्ये वाराणसीत भाजपाला ३०.५२ टक्के मते मिळाली, बसपला २७.९४ टक्के मते पडली. सन २०१४ मध्ये भाजपाला ५६.५२ टक्के, तर आपला २०.३ टक्के मते मिळाली. सन २०१९ मध्ये भाजपाला ६३.६२ टक्के, तर सपाच्या उमेदवाराला १८.४ टक्के मते पडली. वाराणसीत १९७७ मध्ये जनता दलाचे चंद्रशेखर, १९८० काँग्रेसचे कमलापती त्रिपाठी, १९८४ काँग्रेसचे श्यामलाल यादव, १९८९ मध्ये जनता दलाचे अनिल शास्त्री, १९९१ भाजपाचे भालचंद्र दीक्षित, १९९६, १९९८ व १९९९ मध्ये भाजपाचे शंकर प्रसाद जैस्वाल आणि २००४ मध्ये काँग्रेसचे राजेश कुमार मिश्रा निवडून आले होते. मोदींना आव्हान देणारा उमेदवार इंडिया आघाडीकडे नाही हे वास्तव आहे, वाराणसीत मोदींचीच जादू कायम आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -