Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसाठवणीतल्या आठवणी...

साठवणीतल्या आठवणी…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

जसं आठवणीतलं गाठोडं सोडलं… भरभर साठवणीतल्या आठवणी बाहेर पडल्या… किती वेचू अन् किती नको… असं होऊन जातं… जितक्या सावरता आल्या… गोळा केल्या… बाकी सोडून दिल्या! असंच होतं नेहमी या आठवणीचं… भराभरा येतात, पिंगा घालायला लागतात… किती किती धरू… काही निसटून जातात… भूतकाळात नेऊन ठेवतात मनाला!!

आठवणीचं कसं आहे नं…
त्या येतात…
त्या हसवतात…
त्या रडवतात…
अन् निघून जातात…
मागे आठवणी ठेवून!!

तशा फार बेभरवशाच्या असतात या आठवणी… नको तेव्हा फार काही आठवतं… अन् आठवावं म्हटलं की या लपून बसतात! खूप मागे…भूतकाळात घेऊन जातात… काही सुखद असतात तर काही दुःखद…
काही हव्याशा तर काही नकोशा… हट्टी असतात फार…
नको नको म्हणून दूर सारलं तरी येऊन छळतात या नकोशा आठवणी…
तर कधी उदास मनाला आनंदी करून जातात या हव्याशा आठवणी!!

चांगल्या आठवणींनी सकारात्मक ऊर्जा मिळते, मरगळलेल्या मनाला उत्साही करते… पण… काही सलणाऱ्या असतात त्या टोचत राहतात आतल्या आत… हृदयाचा एक चोर कप्पा असतो, तिथे या घर करतात, दडी मारून बसतात! मन आणि मेंदू यांची जबाबदारी असते या आठवणींना कसे हाताळायचे… मनाला त्रास होईल अशा आठवणींना जास्त खतपाणी घालून पोसू नये… उगाळू नये त्या जास्त… फोफावतात त्यामुळे… मेंदूचा ताबा घेतात, पोखरून टाकतात… न कुरवाळता त्यांना आयुष्यातून हद्दपार करता आलं पाहिजे… नाही, केलंच पाहिजे! मनाला नेहमी ताजे करतील अशा सुंदर आठवणींचा ठेवा जपावा नेहमी, त्याचा सकारात्मक परिणाम मनावर, हृदयावर, मेंदूवर नक्कीच जाणवतो!
लहानपणापासूनच्या हसऱ्या, खेळकर, खोडकर, आनंदी आठवणींची नेहमीच उजळणी करत राहावी… पण मन फार विचित्र असतं… जे चांगलं आहे त्याचा आनंद घेण्यापेक्षा… काय नाही हाच विचार करत स्वतःला छळून घेत असतं! खरं तर… मानवी जीवनात नेहमी प्रसन्नता असायला चांगल्या आठवणींची साथ असते. सत्तर टक्के आठवणी चांगल्याच असतात… पण उरलेल्या तीस टक्क्यांमध्ये व्यक्ती अडकवून घेते स्वतःला… काय साधतं त्याने… नुकसानच ना!!
आठवणी… एक वरदान आहे… आठवण येणं हे प्रेम आहे! तुझी आठवण आली… असं कोणी म्हटलं तरी गळा भरून येतो! दिवस

येतात, जातात…
पण मन कुठंच लागत नाही…डोळ्यांतील पाऊस पडून गेला… तरी आठवणींचे आभाळ मोकळे होत नाही… आठवण आली नाही असं कधी झालंच नाही… विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही… आठवायला विसरावं लागतं…सूक्ष्म, निसटता, अगदी हलकासा… आठवण म्हणजे स्पर्शच असतो नं दिसणारा! घडून गेलेल्या गोष्टींमध्ये फिरवून आणतं मनाला… म्हणून हृदयात कायम चांगल्या आठवणीच जपून ठेवाव्यात… हृदयाचं आयुष्य वाढतं!!
अनेक कप्पे असलेली तिजोरी म्हणजे हृदय… जे काळजीने जपले पाहिजे… ते मनाचे कर्तव्य आहे! या तिजोरीची दारे फक्त सुखद आठवणींसाठीच उघडावीत, नकोशा आठवणींना बाहेरच ठेवावे. ‘‘ नो-एंट्री’’चा बोर्ड लावून! हे एक हृदयाला मिळणारं ऑक्सिजनच आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे… हृदयातील अत्तराची कुपी नेहमी सकारात्मक आठवणीनी दरवळत राहावी…

चला… गाठोडं बांधावं… कुठे निसटून नं जावो… मनाला ताजं ठेवणाऱ्या… साठवणीतल्या आठवणी!!
याद न जायें बिते दिनों कि…
जाके न आयें फिर वो…
दिल क्यों बुलाये इन्हें…
दिल…. क्यों बुलायें…!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -