Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजविवाहित पुरुषाशी लग्न

विवाहित पुरुषाशी लग्न

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

मुंबई हे शहर असे आहे की, या एका शहरामध्ये विविधता नटलेली आहे. सर्व राज्यांतून लोक कामानिमित्त मुंबई शहरामध्ये येतात आणि इथेच स्थायिक होऊन जातात. एवढेच नाही, तर मुंबई त्यांना आपल्यामध्ये सामावून घेते. या परप्रांतातून आलेल्या मुलांची महाराष्ट्रातल्या अनेक मुलींसोबत विवाह झालेले आपल्याला ऐकायला मिळतात.

रिचा ही महाराष्ट्रीय कुटुंबात जन्मलेली मुलगी. शिक्षण जेमतेमच घेतलेली; पण आपण चारचौघांत उठून कसं दिसलं पाहिजे, लोकांनी आपल्याकडेच कसं बघितलं पाहिजे, याकडे तिचं कटाक्षाने लक्ष असायचं. शिकलेली होती. एक दिवस ती मुलाशी लग्न करून, आपल्या आई-वडिलांसमोर आली. आई-वडिलांना तो एक धक्काच होता. मुलगा हा उत्तर प्रदेशचा असल्यामुळे, आई-वडिलांना खरंच टेन्शन आलं होतं की, आता आपल्या समाजामध्ये आपण काय उत्तर द्यायचं. रिचाच्या सांगण्यावरून तो मुलगा इंजिनीअर आहे, असं त्यांना समजलं. त्याच्या वागण्या-बोलण्यातून तो सुसंस्कारी मुलगा असल्याचे जाणवत होते. आता मुलीने लग्न केलेलं आहे, तर स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, असं आई-वडिलांना वाटलं. आपल्या घरातील जे जे कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी एकमेकांच्या घरी जात असत.

रिचाचा नवरा तिच्या आई-वडिलांच्या समोर आपण किती सुसंस्कारी असल्याचा आव आणत असे. तिच्या घरच्यांशी तो आपुलकीने बोलत असे. विचारपूस करत असे. त्यामुळे रिचाच्या घरच्यांना वाटत होतं की, रिचाला खूप नशीबवान नवरा मिळाला. जरी बाहेरच्या प्रांतातला मुलगा असला, तरी सुसंस्कारी आणि काळजी घेणारा श्रीमंत मुलगा आहे, असे सर्वांना वाटलं. रिचाचे वडील माझ्या जावयासारखा कोणाचा जावई नाही, असे सर्वांना सांगत असत. सुरुवातीला ही दोघं भाड्याच्या घरात राहत होती. रिचाचा नवरा मात्र तिला आपल्या घरी जास्त घेऊन जात नव्हता. घरी घेऊन गेला, तरी नवऱ्याचे तिच्यावर बारीक लक्ष असायचं. रिचाच्या नवऱ्याने नवीन घर घेतल्यामुळे, तिच्या आई-वडिलांना त्याचा अभिमान होता; पण तो घर घेताना, रिचाचं नाव मात्र लावत नव्हता. बँकवाल्यांनी आणि इतर लोकांनी सांगितल्यावर त्याने तिचं नाव त्या घराला लावण्यात आलं, तोपर्यंत तो तिच्याशी व्यवस्थित वागत होता. काही काळ ते दोघे जण नवीन घरात एकत्र राहिले. नंतर कामानिमित्त रिचाचा नवरा कामानिमित्त तिथे जातो सांगून, तो आपल्या वडिलांसोबत राहू लागला. एक- दोन महिने झाले, तरी तो आपल्या पत्नीकडे जातच नव्हता. त्यामुळे घराचे हप्ते थकले होते.

बँकांकडून लोकं तिच्याकडे हप्ते वसूल करण्यासाठी येत होते. या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये पुष्कळ वाद होऊ लागले. रिचाचा नवरा आपण हे घर विकूया, असं बोलू लागला. पण ती काय घर विकायला तयार नव्हती. रिचाच्या नातेवाइकांकडे आपण अडचणीत आहोत आणि पैशांची मदत करा, असं तो फोन करू लागला. अनेकांनी तो चांगला मुलगा आहे म्हणून मदतही केली; पण तिच्या नातेवाइकांच्या पैशांची त्याने परतफेड केली नाही म्हणून तिने एक दिवस त्याचं सामान बघण्याचं ठरवलं. हा असा काय वागतोय, याच्या सामानात काही तरी मिळेल म्हणून शोध घेताना तिला त्याचं आणि एका मुलीचं विमानाचं तिकीट मिळालं. त्या तिकिटामध्ये ती मुलगी त्याची पत्नी असल्याचे नमूद केलं गेलं होतं.

हे तिकीट बघताच, रिचाला साहजिक धक्काच बसला. रिचाने फेसबुक व इतर माध्यमांच्या साहाय्याने तिचा शोध घेतला आणि तिच्यापर्यंत गेल्यानंतर ती उच्चशिक्षित महिला होती. रिचाने तिला पतीबद्दल विचारणा केली असता, ती काही बोलायला तयार नव्हती. नंतर ज्यावेळी रिचाने मी त्याची पत्नी आहे, असं बोलल्यावर तिलाही धक्का बसला. कारण ती सरळ बोलली, मी त्याची पत्नी आहे आणि तो गेली दोन वर्षं माझ्याशी व्यवस्थित बोलत व घरी येत नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या माहेरी आई-वडिलांकडे राहत आहे. माझ्याकडून त्याने २५ लाख रुपये घेतले आहेत. पहिलं लग्न झालेलं असताना, त्यांनी दुसरे लग्न केलेलं होतं आणि पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी या दोघांनाही फसवत असल्याची लकेर त्याच्या चेहऱ्यावर नव्हती.

पहिल्या पत्नीला तो धक्काच होता. आपण आपल्या आई-वडिलांना ते कसं सांगायचं, हा तिच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. रिचाला नवऱ्यानेच आपल्याला फसवलंय, याच्यामुळे तीदेखील धक्क्यात होती. आपल्या नातेवाइकांचे पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे तिच्या नातेवाइकांमध्ये आणि तिच्यामुळे वाद होऊ लागले होते. आपल्या नवऱ्यामुळे आपले नातेवाईकही आता दुरावलेले होते. रिचा मात्र घेतलेलं घर सोडत नव्हती.

ती त्याच घरात राहत होती. एक दिवस बँकेने हप्ते न भरल्यामुळे तिला घर खाली करायला लागले. अक्षरशः तिला रस्त्यावर आणलं. आता आपल्या आई-वडिलांकडे न राहता, दुसरीकडे राहू लागली. त्याचवेळी तिला समजलं की, तिच्या पतीने आता तिसरं लग्न करून, तो एका वेगळ्याच ठिकाणी राहत आहे. पहिल्या पत्नीने आपल्या पतीच्या विरुद्ध कोणतीही तक्रार केली नव्हती; कारण त्यांना पैशासाठी फसवलं होतं. समाजामध्ये आपलं नाव खराब होईल म्हणून तिचे आई-वडील तिला गप्प ठेवत होते. दोघींनाही त्यांच्या घरच्यांचा, नातेवाइकांचा आधार नव्हता. परप्रांतीय, अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर त्याच्याविषयी जाणून न घेताच लग्न करतात आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते, त्यावेळी पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नसतो.

(सत्य घटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -