Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजप्रेमकहाणी (भाग ३)

प्रेमकहाणी (भाग ३)

‘हेमंत देशपांडे’ हे कॉमन नेम! हीच तर गोंधळगोडी होती. तिने घरातला फोटो पुन्हा निरखला. तरुण सुंदर चेहरा! त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा! ती कोटाची स्टाइल! ऐटबाज नि बाईंच्या खांद्यावर टाकलेला हात! अतिशय प्रेमळ जोडी! दृष्ट न लागो या प्रेमळ जोडीला.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

सावली या मुलीस ग्राऊंडवर चक्कर आली नि हेडसरांच्या खोलीत नंतर शयनकक्षात बाईंच्या देखरेखीखाली झोपविण्यात आले. डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित तपासले. पुढे…)

“कोणी तुला जवळ घेतले होते का बाळ?”
सावली थरथर कापू लागली.
“न घाबरता सांग!”
“माझे सावत्र वडील डॉक्टर काका. आई कामाला गेली की, मला …मला… मला…” सावलीला पुढे बोलताच येईना. तिचे हुंदकेच पुरेसे बोलके होते.
“काही हरकत नाही. आपण करू अक्सीर इलाज. म्हणजे हमखास उपाय बरं का? सावली, तू निश्चिंत राहा. सारी चिंता डॉक्टरवर सोड. मी तुझा हितचिंतक आहे. तुझ्या बाबांना कायदा शिक्षा करेल.”
“ते मला मारतील!”
“अरे वा! हम करेसो कायदा? ऐसा नही चलेगा.”
“जेलमध्ये टाकतील बाबांना?” ती घाबरली.
“टाकलं तरी मी तुझा सांभाळ करीन हं बाळ.” बाई ममतेने म्हणाल्या. तिला त्या क्षणी बाईंचा खूप आधार वाटला.
प्रकरण थोडक्यात निभावले. दिवस वगैरे गेले नव्हते. नुसता ताण होता मनावर!
देशपांडे सरांनी बाईंचे यथोचित कौतुक केले अन् त्यांचा शाळेत सत्कारही केला. ‘मुला-मुलींकडे ममतेने बघणाऱ्या बाई म्हणून.’

अगदी सहजतेने.
“वैदेही मॅडम” विठू शिपाई वर्गावर आला.
शाळेत हेडसरांनी नुकताच सत्कार केला होता, त्यामुळे वैदेहीची वट वाढली होती, मुलांच्या नजरेत.
“कुणी शकूबाई आल्यात घरून. हेडसरांच्या खोलीत. चला.”
“शकू? घर सोडून कशासाठी आली आहे ही?” स्वत:लाच प्रश्न करीत, वैदेही वर्ग सोडून, परत हेडसरांच्या खोलीकडे रवाना झाली.
“बाईनू” शकू तिला पाहताच
गळ्यातच पडली.
“अगं हो हो…”
“तो परत आलाय. गावगुंड घेऊन. परत चल म्हणतोय. सोटा उगारतोय. धाक दाखवतोय.”

“काय मोगलाई लागून गेलीय काय? थांब! मी येते. मी जाऊ शकते का सर? परत येईन तासभरानं. घर जवळच आहे माझं. मी रिक्षानं जा-ये करीन. तोवर माझी प्रॉक्सी…”
“चिंता करू नका मॅडम. मी इथली बाजू सांभाळतो. तुम्ही घरचा प्रश्न सोडवा. पोलीस फोर्सची मदत घ्यायची का?”
“घेऊया. घेऊयाच. त्याला जरा आळा बसेल.” वैदेही आश्वस्त होत म्हणाली.
पोलीस चौकी शाळेजवळच होती. पोलीसवाले चांगले मित्र होते शिक्षकांचे. त्यांची मुले शाळेत होती ना!
मग एक सशस्त्र पोलीस अधिकारी सोबत आला. पण धाकदपटशा करणाऱ्या नौरोजींनी आधीच पळ काढला, तो दुरून ताफा बघून.
“सॉरी, मॅडम. तुम्हास खेटा पडला.”
“अगं हरकत नाही. तुझ्यासाठी एवढी गोष्ट मी नक्कीच करू शकते बरं पोरी.”
“असं वारंवार घडलं तर?”
“तर आम्ही पहाराच बसवू बाईंच्या घरापाशी.” तो सशस्त्र पोलीस अधिकारी म्हणाला.
मग पोरगी परत खुलली. फुलली. आनंदी झाली.
पण एक शंका तिच्या मनास त्रास देत होती. तिचे डोके कुरतडत होती. लवकरच त्याचे निराकरण करण्याचे तिने ठरविले.
दुसरा दिवस उजाडला.
पण तो दिवस वैदेहीसाठी ताप घेऊन आला. असा अगदी अचानक ताप
कसा आला?

“मी शाळेत सांगून येते.”
“अगं मी हेडसरांना फोन करते ना!”
“ऐका ना माझं एकदा तरी!” ती हट्ट करून शाळेत गेली. येता-जाता हेडसरांचा चेहरा न्याहाळायचा होता तिला.
‘हेमंत देशपांडे’ हे कॉमन नेम! हीच तर गोंधळगोडी होती. तिने घरातला फोटो पुन्हा पुन्हा निरखला. तरुण सुंदर चेहरा! त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा! ती कोटाची स्टाइल! ऐटबाज नि बाईंच्या खांद्यावर टाकलेला हात! अतिशय प्रेमळ जोडी! दृष्ट न लागो या प्रेमळ जोडीला. तिने फोटोचीच दृष्ट काढली.
“सर, मोठे सर आत येऊ?”
“ये ये. तू… वैदेहीकडे असतेस ना?”
“हो. त्यांची केअरटेकर आहे मी!”
“बैस. बैस अशी समोर.”
“मी उभीच बरीय”
ती सरांना निरखित म्हणाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -