Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकरिअर कसे निवडावे?

करिअर कसे निवडावे?

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

नुकतेच मुलांचे दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागले. काॅलेजमध्ये प्रवेशासाठीची धावपळ, धडपड सुरू झाली आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ तसेच मुलांच्या आणि आई-वडिलांच्या मनात खूप गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. ज्यांची मुलं आता दहावीतून अकरावीत आणि बारावीतून सीनियर काॅलेजमध्ये जाणार आहेत, त्याबरोबरच नववी ते बारावी या दरम्यानचा वयोगट आणि इयत्तांमधील सगळ्याच विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट पालकांनी करून घेतली, असेल असे नाही. त्याबरोबरच आपले मित्र ज्या स्ट्रीमसाठी प्रवेश घेताहेत, तिकडेच जाणं हा मनुष्यस्वभाव आहे. शिवाय पालकही या गोष्टीला अनुकूल असतात. सुरक्षितता हा मुद्दा त्यात असतो. पुढे मुलांना नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, हाही हेतू यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.

मग यासाठी ●सायन्स साईडला जाऊन डाॅक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट होता येईल.

● काॅमर्सला जाऊन बँकिंग, ऑडिटर, अकाऊंटंट, चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) होता येईल. आर्ट्सला जाऊन शिक्षक, प्रोफेसर होता येईल. बहुतेक वेळा हा असा आणि इतकाच व्यावहारिक विचार केला जातो. त्यात गैर असे काही नाही. पण करिअर निवडताना जो सरधोपट विचार केला जातो, त्यापेक्षा वेगळा विचार करता येईल, हे नक्की. करिअर मार्गदर्शन ही सजगता तशी बऱ्याच उशिराने मुलांच्या आयुष्यात येते. पण करिअरसाठी जी विचार करण्याची क्षमता सुरू व्हायला हवी, तिचा विचार तरी आपण आधीपासून करायला हवा.

● साधारण १२ वर्षं वयानंतर ‘मी शाळेत का जातो?’ या प्रश्नावर मुलांशी चर्चा व्हायला हवी. यावर मुलं उत्तर देतात-‘मी शिक्षण घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, आई-वडिलांचं, शाळेचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, आपल्या पायावर उभे राहण्यासाठी शाळेत जातो.’ ही उत्तरे बरोबरच आहेत; पण मी माझ्यासाठी, मला अभ्यास करायचा आहे, मला परीक्षा द्यायची आहे म्हणून शाळेत जातो. ही उत्तरं अपेक्षित आहेत. कारण या उत्तरात ‘मी’ शब्द महत्त्वाचा आहे. ही जाणीव मुलाला करून द्यायची आहे. जेव्हा मुलाला हे समजेल की, जे करायचंय ते मला करायचंय आणि माझ्यासाठी करायचंय तेव्हा स्वतःच्या बद्दल विचार करायला लागतील.

मुलाला आवडणाऱ्या विषयांची यादी, आवडणारे शिक्षक यांचीही यादी करायला सांगा. का बरं आवडतात हे विषय? ती कारणं लिहून काढायला सांगा. लिहून काढल्यावर एक फायदा असा होतो की, विचार केला जातो आणि खरं चित्र त्यांच्यासमोर उभं राहतं.

गंमत म्हणजे जे विषय आवडतात, तेच शिक्षक मुलांना आवडतात. इथे तुमची मुलं आपले आवडते विषय, कारणं याबद्दलचा विचार जो त्यांनी कधी शांत बसून केलेला नसतो, त्याची सुरुवात होते आणि ते खरोखरच खूप आवश्यक असते.

● या बरोबरच मला कोणत्या गोष्टी करायला आवडतात, मी केलेल्या कोणत्या गोष्टी इतरांना आवडतात, माझं कौतुक होतं, मी त्या गोष्टी करताना आनंदी आणि उत्साही असतो, पुढे याच क्षेत्रात काम करायला मला आवडेल आणि सगळ्यात शेवटी हे करिअर करायचं असेल, तर कोणते अभ्यासक्रम आहेत, काॅलेजेस, ॲडमिशन्सचे कट ऑफ, नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काय संधी आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी पालकांनी मुलांना मदत करायची आहे.

● वर सांगितलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्त ऑफ बीट क्षेत्रात करिअर केलेल्या नामवंत व्यक्तींबद्दल बोलणं होऊ देत. जसं की, हाॅटेल मॅनेजमेंट-शेफ संजीव कपूर
पोलीस खाते-जाॅइंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील सायकॉलॉजी-डाॅ. आनंद नाडकर्णी
कॅलिओग्राफी-अच्युत पालव
पर्यावरण-मेधा पाटकर
प्रयोगशील शिक्षक-सोनम वांगचुक
अनाथ मुली आणि स्त्रियांचे शिक्षण आणि प्रगती-अधिक कदम
ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत
सुवर्णपदक – नीरज चोप्रा यांसारख्या व्यक्तींचे करिअरबद्दलची पुस्तकं, व्हीडिओ हे मुलांसमोर येणे गरजेचे आहे.

या व्यतिरिक्त मुलांसाठी किती तरी प्रकारच्या संधी असतात, करिअर करण्याकरिता.
आय. आय. टी. इंजिनीअरिंग जसं करता येतं, तसंच कौशल्य असणाऱ्यांसाठी आय. टी. आय. हेही आहे.
काॅमर्समध्ये जसं एम. बी. ए. करता येतं, तसंच हाॅटेल मॅनेजमेंटही करता येतं.
लाॅमध्ये वकील, जज, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश हेही चांगलं करिअर आहे.
मेडिकलला जाऊन जसं डाॅक्टर होऊ शकता. तसेच पॅरामेडिकल लाईनला जाऊन फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरेपिस्ट, स्पीच थेरेपिस्ट,स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट इ. संधी पण आहेत. परकीय भाषा उदा. जपानी, फ्रेंच, रशियन इ. शिकून दुभाषी म्हणून उत्तम संधी आहे.

बी. ए., एम. ए.ला सायकॉलॉजी घेऊन क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, काऊंन्सिलरचे क्षेत्र निवडता येते. मात्र सायकॅट्रिस्टसाठी मेडिकललाच जावे लागते.

जसे वैमानिक (पायलट) होण्याची संधी तसंच एअरहोस्टेस, ग्राऊंड स्टाफ म्हणूनही काम करता येते. एम. पी. एस. सी, यू. पी. एस. सी तसेच इतर स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी पोस्टवर काम करता येईल. ॲडव्हरटायझिंग, फोटोग्राफी, ॲनिमेशन, गेम डिझाईनिंग हे क्रिएटिव्ह करिअरही आहेत.

रेडिओ जाॅकी, अभिनय क्षेत्र, नृत्य, लेखन, पत्रकारिता, स्टॅण्ड अप काॅमेडियन, तसेच कीर्तनकार, वक्ता, कोरिओग्राफर, इव्हेंट मॅनेजमेंट हे परफाॅर्मिग आर्ट करता येईल.

जिम ट्रेनर, ड्रेस डिझाईनिंग, ज्वेलरी डिझाईनिंग यांबरोबरच ज्यांना साहसाची, आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करण्याची आवड आणि क्षमता आहे ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये तसेच जंगल, पशुप्राणी यात रमतात, त्यांना फाॅरेस्ट ऑफिसर होण्याच्या तसंच हाॅटेल इंडस्ट्रीज, पार्टी, गेट टुगेदर, कार्यक्रम, राजकारण यांमध्येही उत्तम संधी आहेत.

करिअर निवडण्याची प्रक्रिया ही जरी दहावी, बारावीनंतर सुरू होत असली, तरी स्वतःला ओळखणं स्वतःच्या क्षमतांचा अंदाज घेणं, उद्दिष्ट ठरवणं, आवश्यक माहिती मिळवून स्वतःला तपासणं याची सुरुवात आठवी इयत्तेत व्हायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -