Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलसमूहाचे गाणे - कविता आणि काव्यकोडी

समूहाचे गाणे – कविता आणि काव्यकोडी

वर्गावर आल्या एकदा
आमच्या मुळेबाई
समूहदर्शक शब्द म्हण
शिकूया आज काही

मेथी, पालक, शेपूची
असते म्हणे जुडी
आंबे पिकवण्यासाठी
आंब्यांची अढी

गच्च बांधून ठेवतात
जशी उसांची मोळी
डोंगराळ रानात दिसे
करवंदांची जाळी

टोपलीत रचून ठेवतात
भाकरींची चवड
घराच्या कोपऱ्यात दिसे
मडक्यांची उतरंड

लुकलुक करून हसे
तारकांचा पुंज
झाडाला वेढून बसे
वेलींचा कुंज

जमिनीवर फुलून येई
फुलांचा ताटवा
आकाशी विहरत राही
पाखरांचा थवा

जंगलात फिरताना दिसे
हत्तींचा कळप
एकावर एक ठेवतात
नाण्यांची चळत

कवितेतून समूहाचा
बोध कळून आला
समूहदर्शक शब्दांचा
अभ्यास छान झाला!

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) हुडहुडी भरते
दात लागे वाजू
मऊ मऊ दुलईत
खूप वेळ निजू

दव आणि धुक्याचे
दान हे पडते
कोणत्या ऋतूत
ही किमया घडते?

२) महिन्यानुसार हा
बदलतो पाने
दिवसाचे रोज
गातो नवे गाणे

ऑफिस, घर, शाळा
कुठेही भटकतो
बारामास भिंतीवर
कोण बरं लटकतो?

३) सुरुवातीला होता
रंग याचा काळा
खडूशी नेहमीच
दोस्ती याची बाळा

वेडवाकडं लिहिल्यावर
वाईट हा दिसतो
शिकवताना मदतीला
कोण बरं असतो?

उत्तर –

१) हिवाळा

२) दिनदर्शिका

३) फळा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -