Sunday, July 7, 2024

परीकथा

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?’ या गाण्याने तरुणपणात मला वेड लावले होते. ताल-सूर काहीही नसताना ते निव्वळ गुणगुणणे हे आनंददायी होते. शाळेतून कॉलेज आणि कॉलेजमधून बाहेरचे विश्व जेव्हा नजरेस पडले तेव्हा, खरं सांगायचं तर डोळ्यांसमोर येणारा हा ‘राजकुमार’ मात्र बदलायचा! गंमतीचा भाग सोडा; परंतु परीकथेतल्या गोष्टी वास्तवात अस्तित्वात असतात का, हा प्रश्न तेव्हा कधी पडला नाही. खरंतर तोपर्यंत लहानपणी ऐकलेल्या सगळ्या परीकथा म्हणजे खोट्या कथा आहेत किंवा त्या बडाचढाकर असतात, हेही माहीत नव्हते. या सर्व कथा खऱ्याच कथा वाटायच्या. खूप उशिरा ‘परीकथा’ या शब्दाचा अर्थ कळला. काहीतरी चमत्कृती निर्माण करणाऱ्या, सत्य नसलेले काहीतरी अद्भुत विश्व अशा कथांना ‘परीकथा’ म्हणतात, हे कळले.

लहानपणी ऐकलेल्या अनेक कथा आठवतात. घोड्यांना पंख आहेत, पक्षी माणसांसारखे बोलतात, जलपरी-वनपरी-वायुपरी-हिमपरी अशा खूप पऱ्या मुलांना मदत करतात. त्यांचा शाळेतला अभ्यास करून देतात, त्यांना फिरायला नेतात, त्यांचे मरून गेलेले जवळचे नातेवाईक, मुलांना आणून भेटवतात इत्यादी. शाळेमध्ये असताना मी लालपरी झाले होते. नीलपरी, पीतपरी, हरीतपरी अशा इतर पऱ्यांची इतर नावे होती. आम्ही सगळ्यांनी खूप छान नाच केला होता. ते गाणं काही आठवत नाही; परंतु तेव्हा घातलेला पऱ्यांच्या खूप साऱ्या लेस लावलेला लाल भडक रंगाचा फुलारलेला झगा आणि हातात धरलेला चमचमणारा तारा अजूनही डोळ्यांसमोर येतो, कधी कधी. त्या काळात फोटोंची फॅशन नसल्यामुळे त्याचा फोटो मात्र माझ्याकडे नाही. त्यानंतर घरात, शाळेत कुठेही वावरताना आपण परी असल्याचाच मला भास होत होता.

सहसा या परीकथांमध्ये सकारात्मकता असते, आनंद देणाऱ्या गोष्टी असतात, फार क्वचित दुष्ट परी वगैरे असते; परंतु मराठी कथांमध्ये तसे वाचल्याचे या क्षणी तरी मला आठवत नाही. जगभरातही परीकथांचे एक वेगळे आणि महत्त्वाचे स्थान आहे. बालकांच्या निरागस आणि संस्कारक्षम मनाला आनंद आणि संस्कार देण्याचे काम या बोधपर असणाऱ्या परीकथा करतात.

हे सगळे आठवायचे कारण म्हणजे अलीकडे युरोप दौऱ्यावर स्विर्झलँडमधील ‘माऊंट पिलाटस’ या जागी भेट देण्याचा योग आला. स्विस आल्प्समधील पर्वतरांगांपैकी ‘पिलाटस’ हे एक शिखर आहे, जिथे एकेकाळी ड्रॅगन आग ओकायचे किंवा त्यांच्या उश्वासाद्वारे आग बाहेर निघायची आणि तिथे भुतांचे साम्राज्य होते असे मानले जाते. खडकांच्या कपारीमध्ये आजही असे अनेक ड्रॅगन राहतात असे येथील रहिवासी मानतात. अधूनमधून ते त्यांना दिसतात, त्यांच्याशी संवाद साधतात अशी माहिती स्थानिक गाईडसकडून ऐकायला मिळाली. काही ड्रॅगन हे माणसांना विशिष्ट आजारांपासून बरे करतात त्यामुळे त्यांच्या शोधार्थ माणसे स्वतःहून जातात असेही त्यांनी सांगितले. याच कथांचा उपयोग करून इथे अतिशय भव्य-दिव्य आकर्षक असे ‘ड्रॅगन वर्ड’ निर्माण केले आहे. अद्भुत अशा ड्रॅगन कथांना अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनोरंजनपर बनवले आहे. आबालवृद्ध येथे काही काळ रमतात. ‘पिलाटस’ या शोमध्येसुद्धा ड्रॅगनविषयी अनेक गंमती जमती अंतर्भूत केलेल्या आहेत. शेवटी काय तर सुशिक्षित माणसेसुद्धा अशा कथांकडे कशा दृष्टीने पाहतात हे आहे. त्यांचा परीकथेतील विश्वासाला तडा जाणार नाही, अशा तऱ्हेने शास्त्रज्ञ अनेक प्रयोगाद्वारे अमानवी शरीरे, आत्मे, हजारो वर्षे जीवित असणारे प्राणी अस्तित्वात नसतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात; परंतु बुद्धी आणि मन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट बुद्धीला जरी पटली तरी मन मानत नाही. त्यामुळे मनावरचा पगडा हा बुद्धीपेक्षा खूपदा भारी असतो आणि त्यामुळे ‘पिलाटस’मधला ड्रॅगन अजूनही अस्तित्वात आहे, असेच मानले जाते. काहीही असो.

आपल्या बालपणात वाचलेल्या, ऐकलेल्या सर्व परीकथा आजही आठवतात. पुस्तकातील परीकथेतील पात्रांची रंगीबेरंगी आकर्षक चित्रे डोळ्यांसमोर येतात, आनंद देऊन जातात. कोण्या लहान मुलांनी कथा सांगायला सांगितल्यावर आठवणीतील परीकथा आपण उत्साहाने सांगतो. सर्वांत गंमतीचा भाग म्हणजे या कथा ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांना मिळणारा आनंद, त्यांची कथा ऐकण्यातली एकाग्रता हीसुद्धा परीकथा सांगणाऱ्याला आनंद देऊन जाते. त्यामुळे ‘परीकथा’ ज्यांनी आपले बालपण समृद्ध केले ते परीकथांचे दालन आजच्या काळातही लहानग्यांसाठी आपण उघडेच ठेवूया. योग्य वेळी त्यांना कधीतरी कळेलच की ‘परीकथा’ या केवळ परीकथाच असतात!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -