आपण बऱ्याचदा माणसाच्या दिसण्यावरून किंवा चेहऱ्यावरून कोणता माणूस कसा आहे हे ओळखतो. पण हा पर्याय चुकीचा आहे. हेरगिरी करताना कधीच खात्री पटल्याशिवाय, पुरावा असल्याशिवाय कोणावरही संशय घेऊ नये.
कथा – रमेश तांबे
गाडी भरधाव पळत होती. १३-१४ वर्षांचा डिटेक्टिव्ह अमित खिडकीत बसून गार वारा अंगावर घेत होता. घड्याळात सकाळचे ७ वाजले होते. तेवढ्यात ड्रायव्हरने गाडीचे ब्रेक्स दाबले. कचकच आवाज करीत, गाडी थांबली अन् गाडीत दोन माणसं चढली. भर रस्त्यात आडवे येऊन गाडी थांबवली म्हणून ड्रायव्हर त्यांना बडबडत होता. खरे तर गाडीतली माणसेदेखील घाबरली होती. पण ते दोन प्रवासी अगदी बिनधास्त बसले होते. जणू काही घडलेच नाही.
ती दोन माणसं अमितच्या पुढच्या सीटवर बसली. ती अंगापिंडाने मजबूत, रंगाने काळी सावळी आणि राकट दिसत होती. त्यांच्या काही तरी गप्पा चालल्या होत्या. त्यांची बॅग त्यांनी आपल्या शेजारीच ठेवली होती. त्यातल्या एका माणसाचा हात त्या बॅगवर कायम होता. अमितच्या मनात संशय बळावला. दोन धिप्पाड माणसं, जबरदस्तीने गाडी थांबवणं, त्यांचं बेरकी दिसणं, त्यांच्या जवळची बॅग, बॅगेवर सतत ठेवलेला हात, त्यांचं हळू आवाजातलं बोलणं, या साऱ्या गोष्टी पाहून अमितचं डिटेक्टिव्ह मन आता वेगाने विचार करू लागलं.
आता अमित सरसावून बसला. त्यांचं बोलणं कान देऊन ऐकू लागला. “ही बॅग त्यांना दिली म्हणजे आपलं काम फत्ते झालं” असं काही तरी ते बोलत होते. अमितच्या डोक्यात असंख्य विचार येऊ लागले. काय असेल या बॅगेत? पैसे, चोरीचा माल की कुण्या माणसाची हत्या करून त्याला कोंबून ठेवलंय आत! अमित आता विचारांवर स्वार झाला होता. इयत्ता आठवीत शिकणारा अमित हेरकथा खूप आवडीने वाचायचा. त्याला स्वतःला देखील मोठेपणी गुप्तहेरच व्हायचं होतं. त्याची ही आवड त्याच्या घरच्यांना, शाळेतल्या मित्रांना शिवाय शिक्षकांना देखील माहीत होती. शाळा आणि परिसरातील किती तरी चोऱ्यांचा छडा लावण्यात, त्याने पोलिसांना मदत केली होती.
आता अमित गाडीतून उतरण्याची तयारी करू लागला. ती दोन माणसंदेखील उतरण्याची तयारी करू लागली. तशी अमितची चलबिचल वाढली. त्याची नजर सारखी त्यांच्या बॅगेकडे जात होती. उतरण्याचे ठिकाण जवळ येऊ लागले. गाडीचा वेग कमी झाला. अमितने लगेच खिशातून मोबाइल काढला आणि पोलिसांना गुपचूप फोन करून, त्यांना बऱ्हाणपूर बस स्टॅण्डवर बोलावून घेतले. अमितने आतापर्यंत अनेकदा चोरांना पकडून दिले होते, त्यामुळे त्याच्याकडे पोलिसांचे फोन नंबर होतेच.
बस स्टॅण्डवर उभी राहिली. ती माणसे आपली अवजड बॅग कशीबशी उचलत, गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू लागली. अमितने खिडकीतून पाहिले, तर चार-पाच पोलिसांचे पथक गाडीसमोरच उभे होते. त्यामुळे खाली उतरताच, त्या दोघांना त्यांच्या बॅगेसह ताब्यात घेण्यात आले. खाली उतरून अमित धावतच पोलिसांकडे गेला आणि म्हणाला, “साहेब हीच ती माणसं, हीच ती बॅग.” तिकडे त्या दोन माणसांना कळेना, पोलिसांनी आपल्याला का पकडले? आणि हा मुलगा कोण? कारण पोलिसांना बघताच, ते दोघेही खूप घाबरले. ते गयावया करू लागले. साहेब आम्हाला सोडा. आम्ही काही केले नाही. आम्हाला रेल्वे स्टेशनवर लवकर जायचे आहे. ११ वाजताची गाडी आहे आमची. गाडी चुकेल!
पोलिसांनी त्या दोघांची गचांडी धरून, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. चांगला दम भरून चौकशी केली. त्यांची सगळी बॅग तपासली. त्या बॅगेत कपडे, पुस्तके आणि खाद्यपदार्थाशिवाय काहीच नव्हते. पोलीसदेखील चक्रावले. त्यांनी अमितकडे पाहिले, तर त्याचादेखील चेहरा पडला होता. अर्धा तास चौकशी करून, पोलिसांनी त्या दोघांना सोडून दिले. जाता जाता ती माणसं अमितला म्हणाली, “आमच्या दिसण्यावरून तू आम्हाला चोर समजलास. अरे पोरा आमची मुलं शिकायला दिल्लीला चालली होती. त्यांना ही बॅग द्यायची होती. त्या बॅगेत त्यांचं सगळं सामान होतं. आता ती गाडीदेखील निघून गेली असेल. आता ही बॅग आम्ही आमच्या मुलापर्यंत कशी पोहोचवू.” त्या माणसांच्या डोळ्यांत पाणी तराळले.
अमितला आपली चूक कळली. पोलिसांनी देखील त्याला चांगलाच दम भरला. या चांगल्या माणसांना तुझ्यामुळे नाहक त्रास झाला. त्याच क्षणी अमितच्या डोक्यावरचं डिटेक्टिव्हचं भूत बऱ्यापैकी उतरलं. या घटनेनंतर अमितने हेरगिरी करताना कधीच घाई केली नाही. पूर्ण खात्री पटल्याशिवाय, पुरावे गोळा केल्याशिवाय कोणावरही संशय घेऊ नये, हा महत्त्वाचा धडा या घटनेतून अमित शिकला होता!