मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच केरळमध्ये (Keral) मान्सूनचे आगमन झाले असून १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) येण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मात्र वाढता उन्हाचा कडाका पाहता मान्सून आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या कोकण (Konkan) भागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात तापमान ४६.९ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना वाढत्या उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणात तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले असून हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
‘या’ भागात उष्णतेचा यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आकाश निरभ्र राहणार असून उष्णतेचा दाह वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर राज्याच्या वर्धा, चंद्रपूर, नागपूरसह कोकणातील रत्नागिरी आणि रायगड भागांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाच्या सरींची शक्यता
दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील २४ तास ढगाळ वातावरणासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.