पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, बिहारमध्ये सर्वाधिक कमी मतदान, आता प्रतिक्षा ४ जूनची
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. १ जून रोजी ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३४ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ६९.८९% मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले आणि सर्वात कमी ४८.४६% मतदान बिहारमध्ये झाले. याशिवाय ओडिशातील विधानसभा निवडणुकीसाठी ६२.४६% मतदान झाले. ४ राज्यांतील विधानसभेच्या ९ जागांवरही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणौत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत कौर बादल आदी विरोधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत.
बलिया येथे मतदानासाठी आलेल्या एका वृद्धाचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. उष्णतेमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बलिया येथे मतदानासाठी आलेल्या एका वृद्धाचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. उष्णतेमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सातव्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आहे. पश्चिम बंगालच्या भांगरमध्ये सीपीआय(एम) आणि आयएसएफ कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांवर बॉम्ब हल्ल्याचा आरोप केला आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ट्विट केले की जमावाने जयनगरमधील बेनिमाधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसरचे राखीव ईव्हीएम आणि कागदपत्रे लुटली. १ CU, १ BU आणि २ VVPat मशिन तलावात टाकण्यात आल्या.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलतली भागात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तलावात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. संतप्त जमावाने येथील एका मतदान केंद्रावर हल्ला करून येथील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हिसकावल्या आणि पाण्यात फेकून दिल्या आहेत. कुलतली यथील बूथ क्रमांक ४० आणि बूथ क्रमांक ४१ वर ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलेरहाट भागातही हिंसाचार झाला आहे.
या हिंसाचारात आयएसएफ आणि सीपीआयएमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. आयएसएफ आणि सीपीआयएमच्या समर्थकांनी दावा केला आहे की, त्यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. दरम्यान, या भागातील हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी पोलेरहाटमध्ये दाखल झाली आहे. बशीरहाट लोकसभा मतदारसंघातील संदेशखाली येथे शुक्रवारी रात्रीपासून हिंसाचार सुरू झाला आहे. आज सकाळी सात वाजता मतदान सुरू झालं, तेव्हादेखील या भागात हिंसाचार चालू होता. हा हिंसाचार रोखण्यासाठी, मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या भागात पोलिसांच्या अधिक तुकड्यांना पाचारण करण्यात आलं असून मागील काही तासांपासून येथील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे.