आज मतदानाचा शेवटचा टप्पा, आता उत्सुकता निकालाची

Share

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून केवळ आपल्या भारत देशाचा उल्लेख होत आहे. त्याच लोकशाही राष्ट्राचा कारभार कोणी चालवायचा याचा निर्णय घेण्यासाठी होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा गुरुवारी सायंकाळी विसावला. आता अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.

पंजाबमधील भंटिडा मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर, हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजपा उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत, काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह हे महत्त्वाचे उमेदवार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकीकडे भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षांची एनडीए आणि काँग्रेस व काँग्रेसच्या मित्रपक्षांची इंडिया आघाडी अशी अटीतटीची झुंज होईल, असे चित्र निर्माण झाले होते. तथापि प्रचारामध्ये इंडिया आघाडीच्या लोकांचा संयम ढासळत गेला व त्यांनी प्रचारामध्ये पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक राहुल गांधी, खरगेंपासून केजरीवालांपर्यंत सर्वांनीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली असल्याची टीका करत पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेतले.

पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच मनमोहन सिंग यांच्या कारभाराची व त्यांच्या प्रतिमेची प्रशंसा केली आहे. काँग्रेसचे मंत्री व नेतेमंडळी वर्षानुवर्षे सत्तेचा उपभोग घेताना भ्रष्टाचाराच्या दलदलीत नखशिखांत बुडाले होते. त्या तुलनेत काँग्रेसमध्ये राहूनही मनमोहन सिंग यांची प्रतिमा स्वच्छच होती. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत तर जाहीरपणे भ्रष्टाचाराच्या वर्षावात मनमोहन सिंग रेनकोट घालून स्नान करत असल्याने भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यांच्या अंगावर कधीही उडाले नाहीत, असे सांगितले होते. पंतप्रधान मोदी यांनी देशहितासाठी दहा वर्षांच्या कालावधीत धाडसी निर्णय घेतले आहेत व त्याची त्यांनी प्रामाणिकपणे पारदर्शकरीत्या अंमलबजावणीही केलेली आहे. दहा वर्षांच्या मोदी सरकारच्या कालावधीत मोदी सरकारच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. याउलट मनमोहन सिंग सरकारच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला जात आहे.

मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या बिछान्यातील गादीमध्ये करोडो रुपयांची रोख रक्कमही सापडली होती. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून २३ वर्षे काम केले; २३ वर्षांत विरोधकांना मोदींवर २५ पैशांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही. ते पारदर्शकतेचे देशात रोल मॉडेल आहेत. देशातील आजवरच्या केंद्र सरकारांमध्ये मनमोहन सिंग यांचे सरकार सर्वात दुबळे सरकार म्हणून गणले जात होते. ते पडद्यावर नामधारी पंतप्रधान होते, पडद्याआडून खरा कारभार सोनिया गांधी व राहुल गांधीच चालवत असल्याचे अनेकदा उघडही झाले होते. काँग्रेसच्या काळात देशामध्ये खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार फोफावला होता, याउलट मोदी सरकारच्या राजवटीत दशकभराच्या कालावधीत कोठेही जातीय, धार्मिक दंगली झाल्या नाहीत.

मोदी अथवा त्यांच्या मंत्र्यांवर कोणाला भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. याउलट काँग्रेस सरकारच्या विशेषत: मनमोहन सिंग सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांना, नेत्यांना भ्रष्टाचारावरून जेलवारी करावी लागलेली आहे. त्याच मनमोहन सिंग यांनी मोदींवर टीका करावी, यावर मनमोहन सिंग यांना एकच प्रश्न भारतवासीयांना विचारावासा वाटतो की, राधासुता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? आपचे केजरीवाल हे सध्या इंडिया आघाडीच्या छावणीतले आणखी एक कलाकार आहेत. ते सध्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान इंडिया आघाडीचे आक्रमक, स्टार प्रचारक असून त्यांनीही मोदींवर तोंडसुख घेण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे. मुळातच जो माणूस भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निवडणुकीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुरुंगात होता, ज्या माणसाची भ्रष्टाचारावरून चौकशी सुरू आहे. जो केवळ प्रचारासाठीच जामिनावर आहे व प्रचार संपल्यावर निकालापूर्वीच ज्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे, अशा माणसाने स्वत:च्या स्वच्छ कारभाराचे गोडवे गात मोदींवर टीका करावी म्हणजे सौ चुहे खॉ के बिल्ली चले हज को, अशातला हा प्रकार आहे.

दोन दिवसांनी केजरीवाल यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. परवा (रविवार) सरेंडर करावं लागणार आहे. मी तिहार जेलमध्ये जाईन, मला माहीत नाही की ते मला तिहार जेलमध्ये किती काळ ठेवतील. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी जेलमध्ये जात आहे. पण मी झुकणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या, जेलमध्ये मला तुमची खूप काळजी वाटत असते, अशा प्रकारची भाषणे प्रचारादरम्यान करत जनतेचे काही काळ राजकीय मनोरंजनही केले. त्यावर सर्वात मोठी कडी म्हणजे काँग्रेसकडून मोदी संविधान बदलणार असल्याचे सांगत मते मिळविण्यासाठी देशवासीयांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ज्या काँग्रेसने त्यांच्या सत्ताकालावधीत एक-दोनदा नव्हे, तर तब्बल ८० वेळा देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

देशामध्ये आणीबाणी लादून लोकशाहीची चिरफाड करण्याचा व स्वत:चीच मनमानी चालविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केल्याचे देशातील नागरिकांनी जवळून पाहिले व अनुभवले आहे. देशामध्ये आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने देशाला मोदी घटना बदलणार असल्याची भीती दाखवावी, यातूनच काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मोदींच्या व भाजपाच्या नेतेमंडळींच्या भाषणामध्ये केलेली कामे व पुढील प्रगतीचे नियोजन याचा ऊहापोह केला जात असतानाच इंडिया आघाडीकडून केवळ मोदी टीकेचाच शंख वाजवला जात होता. प्रचाराचा धुराळा संपताच मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला निघून गेले. इकडे मात्र इंडिया आघाडीवाले अजूनही मोदींविरोधाची माळ जपत आहेत. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल आणि ४ जून उजाडण्याची देशातील जनतेला प्रतिक्षा आहे.

Recent Posts

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

44 mins ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

1 hour ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

1 hour ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

2 hours ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

2 hours ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

3 hours ago