
टर्निंग पॉइंट - युवराज अवसरमल
एखादं नृत्य आपल्या चांगलच लक्षात राहतं, परंतु ते नृत्य बसविणारा कोरिओग्राफर लक्षात राहत नाही. तो मात्र आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणे त्याचे नृत्याचे शिवधनुष्य पेलत असतो. प्रसिद्धीपासून दूर आपल्या कामात तो मग्न असतो. असाच एक कोरिओग्राफर व अभिनेता आहे, त्याचे नाव अनिल सुतार. ‘वाटूळ’ या काव्यलघुपटासाठी त्यांनी आवाज (व्हॉइस ओव्हर) देखील दिला आहे.
अनिल हे मूळचे रत्नागिरीचे, जन्म मुंबईचा, ताडदेवच्या मुन्सिपल सेकंडरी शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. ते चौथीत असताना एका कवितेवर त्यांनी नृत्य बसविले होते. कार्यक्रम झाल्यानंतर बीएमसीच्या लेडी ऑफिसरने स्टेजवर त्यांना बोलावून, त्यांचा मुका घेतला होता. त्यावेळी त्यांना प्रभाकर दादा वरळीकर नृत्य शिकवायला यायचे. गावी नमनमध्ये ते गणपती नाचवायचे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी निवृत्ती पवारांचं ‘काठीन घोंगडं घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर’ हे गाणं केलं. ते गाण खूप गाजलं. त्या गाण्यापासून अनिल सुतार खूप प्रसिद्ध झाले. काठीन घोंगडं फेम अनिल सुतार अशी त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांना अभिनयाची देखील आवड होती. त्यानंतर त्यांच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला.
‘स्थलांतर’ या नाटकात त्यांनी भूमिका केली. त्यामध्ये एका म्हाताऱ्याची भूमिका त्यांनी केली होती. त्यानंतर ‘इजा बिजा तिझा’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. या चित्रपटांमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले व इतरही कलावंत होते. त्यानंतर ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी ते प्रीमियर कंपनीत कामाला होते. अचानक ती कंपनी बंद पडली. डोळ्यासमोर अंधार पडला. पुढे काय करायचे सुचेना. दीड वर्षं कंपनी सुरू होण्याची वाट पाहिली. त्यांच्या मनात नको ते विचार येत होते. तो काळ त्यांच्यासाठी मोठा संघर्षाचा ठरला. कामाच्या शोधात असतानाच ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी त्यांना ‘रणांगण’ या नाटकात सूत्रधाराचे काम करण्याची संधी दिली. त्या नाटकात त्यांनी नृत्य देखील बसविले. ते नाटक त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरले. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभे राहण्याचे बळ या नाटकाने त्यांना दिले. त्या नाटकामध्ये अशोक समर्थ, अविनाश नारकर, प्रसाद ओक हे कलावंत होते. त्या नाटकाचे ३९८ प्रयोग झाले, त्यानंतर ते नाटक बंद झाले.
त्यानंतर प्रसाद ओकने ‘दामिनी’ मालिकेतील हवालदाराच्या भूमिकेसाठी त्यांना विचारले. सुरुवातीला ते एका दिवसाचे काम होते. त्यानंतर हळूहळू महिन्यातून ८ ते १० दिवस त्यांना ते काम करायला मिळाले. जवळ जवळ अडीच वर्षं त्यांनी ‘दामिनी’ मालिकेत राणे हवालदाराची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी कुणाल म्युजिकसाठी अल्बममध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केले. लहान मुलांच्या गाण्याची एक सीडी केली होती. ती प्रचंड गाजली. त्यांनीं ‘गंध गारवा’ हा स्वतःचा पहिला अल्बम केला. त्यामध्ये अमोल कोल्हे, सुबोध भावे, अविनाश नारकर, स्नेहा वाघ हे कलावंत होते. तो अल्बम गाजला. त्या अल्बममुळे त्यांना चित्रपटसृष्टीची कोरियोग्राफरसाठी दारे खुली झाली.
अभिनेते व दिग्दर्शक अजय फणसेकर यांच्या ‘एक होती वादी’, ‘एन्काऊंटर दी किलिंग’, ‘यही है जिंदगी’ या चित्रपटांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विवेक देशपांडे, अजित भगत, वामन केंद्रे, अजय फणसेकर यांना ते गुरुस्थानी मानतात. ‘यशवंत’ चित्रपटांमध्ये अभिनेता नाना पाटेकरांचा पोतराजचा संपूर्ण गेटअप त्यांनी केला होता. आतापर्यंत जवळपास सत्तर चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. सध्या भरपूर नवीन कोरिओग्राफर येत आहेत, परंतु निर्माते नृत्यासाठी बजेट ठेवत नाही, नृत्य घाईने उरकायला सांगतात. त्यामुळे काम करण्याचे समाधान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाधानकारक नृत्याची कोरिओग्राफी करायला मिळाली, तर ते करणार आहेत. नाही तर आता त्यांनी सर्व लक्ष अभिनयाकडे वळविले आहे. अनिल सुतरांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !