
मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane) स्थानकातील फलाटाची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी तब्बल ६३ तासांचा मेगाब्लॉक (Megablock) जारी केला आहे. गुरुवारी मध्य रात्रीपासून या मेगाब्लॉकला सुरुवात झाली असून यामुळे लोकल ट्रेनच्या ९००हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या कारणामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून वाहतुकीचीही (Traffic) कोंडी झाली होती. मध्य रेल्वेने घेतलेल्या या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांसह मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षांवरही (Exams)पडला आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये सध्या परिक्षांचे सत्र चालू असून काल काही परीक्षा पार पडल्या. मात्र, यावेळी मेगाब्लॉकमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून आजच्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
'या' तारखेला होणार रद्द झालेल्या परिक्षा
आज बीएमएस (५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र ८ ची एक परीक्षा आणि अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक परीक्षा अशा दोन परीक्षा होणार होत्या. मात्र, मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आता या परीक्षा १ जून ऐवजी ८ जून रोजी होणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली आहे.