Thursday, July 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे ‘मेगा’हाल

ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे ‘मेगा’हाल

मुंबईकडे येण्यासाठी परतीचा प्रवास कठीण, आर्थिक भुर्दंडाची बसली झळ

अल्पेश म्हात्रे

मुंबई : उन्हाळ्याचा सुट्ट्या आणि लग्न सराईसाठी गावी गेलेले प्रवासी आता कुटुंबासोबत मुंबईत परतू लागले आहेत. परतीच्या प्रवासासाठी या प्रवाशांनी चार महिन्यापूर्वी मेल-एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण केले होते. परंतु, मध्य रेल्वेच्या महा मेगाब्लॉकने त्यांच्या परतीचा प्रवास कठीण करुन टाकला. ब्लॉकमुळे अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक आणि पुणेला शॉर्टटर्मिनेट केल्यामुळे मुंबई गाठतांना या प्रवाशांना हाल सहन करावे लागले. शिवाय, आर्थिक भुर्दंडही बसला.

ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणाच्या कामासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक तर दुसरीकडे सीएसएमटीच्या १०,११ फलाटांच्या विस्तारीकरणांच्या कामासाठी ३६ तासांचा ब्लॉक सुरु झाला. या दोन्ही ब्लॉकचा सर्वात जास्त फटका लांब पल्लाच्या गाड्यांवर झाला आहे. या दोन्ही ब्लॉकमुळे एकूण ७२ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या तर, अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल,नाशिक आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

१ जून २०२४ – रेल्वेच्या मेगाहालचे हाल दुसऱ्या दिवशीही कायम होते. एकीकडे लोकल सेवा बंद तर दुसरीकडे वाहतुकीची प्रचंड कोंडी. त्यात वरतून आग ओकणारा सूर्यनारायण अशी अत्यंत दयनीय अवस्था प्रवाशांची झाली होती . त्यामुळे मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला बऱ्याच कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना जरी वर्क फ्रॉम होम दिले असले व शनिवार असल्याने काही कर्मचाऱ्यांना सुट्टी असली तरी ज्यांची अत्यावश्यक सेवा असते. त्यांना मात्र कार्यालयात जावेच लागले. मध्य रेल्वेच्या ब्लॉकमध्ये हार्बरवरील गाड्या फक्त वडाळापर्यंत धावत होत्या तर मध्य रेल्वे वरील गाड्या भायखळा व काही गाड्या दादरपर्यंत धावत होत्या. मात्र तिथे इंटर चेंजिंग सिस्टीम कमी प्रमाणात असल्याने अर्ध्या तासाने एक गाडी धावत होती . त्यामुळे त्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे येणाऱ्या स्थानकात चढण्यासाठी अजिबात जागा मिळत नव्हते. यात महिला वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मध्य रेल्वेने शनिवारी दिवसभरात ५३४ लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही संख्या त्याहूनही अधिक होती.

मुंबई गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार

उन्हाळ्याचा सुट्ट्या, लग्न समारंभासाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात गावी गेलेले प्रवासी मुंबईत परतू लागले होते. त्यातच दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागल्यानंतर मुलांच्या प्रवेशासाठी कुटुंब मुंबईत येत आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे या प्रवाशांना परतीच्या प्रवासात प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत. उन्हाळ्यात मेल-एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण असते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन चार महिन्यापूर्वी करतात. मात्र मेगॉब्लॉकमुळे अनेक प्रवाशांना पर्यायी रेल्वे गाड्यांतून जनरल डब्यातून प्रवास करावा लागला आहे. नाशिक, पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना पर्यायी मार्ग शोधून प्रवास करावा लागत आहे. ब्लॉकमुळे मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत धावत आहे. त्यामुळे पनवेलमधून मुंबई गाठण्यासाठी प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. त्यातच हार्बर मार्गावरील लोकल सेवा शनिवारी वडाळ्यापर्यंत धावत आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचा सामना करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पनवेलवरुन मुंबई गाठण्यासाठी अनेक प्रवाशांनी खासगी वाहने घेतली. त्यामुळे अतिरिक्त पैशाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.

ठाणे, सीएसएमटीवर काम युद्धपातळीवर

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू केल्या असून ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र. ५ आणि ६ चे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ च्या विस्तारासंदर्भात नॉन-इंटरलॉकिंग काम काल व शनिवारी सुरू झाले. ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा विशेष ब्लॉक सुरू करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ च्या विस्ताराच्या संदर्भात नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ३६ तासांचा विशेष ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शुक्रवार मध्यरात्रीपासून अखंड सुरू करण्यात आला आहे.

वेळेअगादर काम पूर्ण करण्याचा मानस

मुंबईचे तापमान जास्त असूनही व भर उन्हातही २४ तास हे काम सुरू असून ठाणे येथील काम रविवारी दुपारी ३.३० पर्यंत व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील काम दुपारी साडेबारापर्यंत हे काम सुरू राहणार असून वेळे अगोदरच हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने बेस्ट ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जादा बस गाड्या सोडल्या त्यात बेस्टच्या ताब्यातील वातानुकूलित दुमजली बस गाड्या सोडण्यात आल्या. त्या बस प्रथमच जे. जे उड्डाण पुलावरून धावल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -