Monday, July 8, 2024
HomeदेशLS Election : अखेरच्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान

LS Election : अखेरच्या टप्प्यात ५७ जागांसाठी आज मतदान

वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघात शनिवारी (दि.१) रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे. मतदान होणाऱ्या ठिकाणी मतदानकेंद्रे तयार करण्यात आली असून तिथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १३ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल (९), बिहार (८), उडिसा (६), हिमाचल प्रदेश (४), झारखंड (३), चंडीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा “एक्झिट पोल’ कडे लागणार आहे.
शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून तर, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत या टप्प्यात भाजपाने २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील ९, बिहारमधील ५, हिमाचलप्रदेश ४, झारखंड, ओडिसा आणि पंजाबमधील प्रत्येकी २ आणि चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तरप्रदेशातील सर्वात जास्त १३ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा या सर्व जागा जातीय समीकरणात अडकल्या आहेत. कुशीनगर, देवरिया, सलेमपूर, बलिया, महाराजगंज आणि रॉबर्टसगंज मतदारसंघात जातीच्या आधारावर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये भाजपा स्वबळावर

बिहारमधील पाटलीपुत्र, आरा आणि बक्सरमध्येही जातीय समीकरणामुळे भाजपाची वाट अवघड बनली आहे. आरा येथून केंद्रीय मंत्री आर.के. सिंह निवडणूक लढवत आहेत. पाटलीपूत्र येथून राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती नशीब आजमावत आहेत. मीसा भारती यांची भाजपाचे खासदार रामकृपाल यादव यांच्याशी टक्कर आहे. पंजाबमध्ये गेल्यावेळी भाजपाने अकाली दलासोबतच्या युतीत २ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजपा स्वबळावर निवडणूक लढत आहे.

हरसिमरत कौर बादल हे सर्वात श्रीमंत उमेदवार

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सातव्या टप्प्यात ९०४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी ८०९ पुरुष आणि ९५५ महिला उमेदवार आहेत. या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हरसिमरत कौर बादल या पंजाबमधील भटिंडा येथील उमेदवार आहेत. त्यांच्याकडे १९८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभेच्या ५४२ जागांपैकी सहाव्या टप्प्यापर्यंत ४८५ जागांवर मतदान झाले आहे. शेवटच्या ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे केवळ ५४२ जागांवर मतदान होत आहे.

१९९ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल

एडीआरच्या अहवालानुसार, १९९ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. १५५ उमेदवारांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १३ उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. ४ उमेदवारांवर खुनाचे गुन्हे, तर २१ उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. २७ उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. ३ उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रक्षोभक भाषणे दिल्याप्रकरणी २५५ उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -