Monday, April 21, 2025
HomeदेशExit Poll : मोदींची हॅटट्रीक! भाजपा पूर्ण बहुमतासह सत्तेवर येणार

Exit Poll : मोदींची हॅटट्रीक! भाजपा पूर्ण बहुमतासह सत्तेवर येणार

मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहेत. टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास देशातील ५४३ जागांपैकी ३५३ ते ३६८ जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खात्यात ११८ ते १३३ जागा जाण्याची शक्यता आहे. तर इतर पक्ष ४३ ते ४८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

या एक्झिट पोलममध्ये महाराष्ट्रासाठी मात्र धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार देशात जोरदार मुसंडी मारणाऱ्या भाजपा आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीला २२ आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतरांच्या खात्यात एक जागा जाऊ शकते.

याबरोबरच रिपब्लिक-पीएमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनजीएला ३५९ आणि इंडिया आघाडीला १५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला २७ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना एक जागा मिळू शकते.

उत्तरप्रदेशात भाजप मुसंडी मारण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत सर्वांत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना दिसत आहे. उत्तरप्रदेशात राम मंदिराच्या मुद्दाही महत्वपूर्ण ठरला होता. या राज्यात भाजपाला ६२ ते ६६ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला उत्तरप्रदेशमध्ये १५ ते १७ जागा मिळू शकतात. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजपची मुसंडीच मारण्याची शक्यता आहे.

बिहारमध्येही भाजपचा करिश्मा

बिहारमध्येही एनडीएला मोठी आघाडी मिळताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी भाजपासमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपला ३४ ते ३८ जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला ३ ते ५ जागांवर समाधान मानावे लागेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

कर्नाटकमध्ये इंडिया आघाडीला फटका?

कर्नाटकमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकातील २८ जागांपैकी २३ ते २५ जागांवर एनडीएला आघाडी मिळू शकते. तर इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळू शकतात, असा एक्झिटपोलचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात अटीतटीची लढत

एबीपी आणि सी व्होटर्सच्या एक्झिटपोलनुसार , महाविकास आघाडीला २३ ते २५ जागा मिळू शकतात. तर महायुतीला २२ ते २६ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने २१, काँग्रेस पक्षाने १७ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या होत्या. तर दुसरीकडे महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने २८, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने १५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४ जागा लढवल्या होत्या. तर रासपच्या महादेव जानकरांनी परभणीची जागा लढवली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -