Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सगेली ‘स्क्रिप्ट’ कुणीकडे...?

गेली ‘स्क्रिप्ट’ कुणीकडे…?

राजरंग – राज चिंचणकर

कोणत्याही नाटकासाठी त्या नाटकाची संहिता म्हणजेच स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाची असते. स्क्रिप्ट हातात पडली की, दिग्दर्शकासह कलाकारांचे काम सुरू होते. काहीजण स्क्रिप्टशिवाय, केवळ इम्प्रोव्हायजेशनच्या तंत्राने नाटक उभे करतात. ती गोष्ट वेगळी! परंतु नाटकाची स्क्रिप्ट एकूणच नाट्यप्रवासातली प्राथमिक व महत्त्वाची बाब असते. रंगभूमीवर येऊ घातलेल्या एका नाटकाच्या स्क्रिप्टच्या बाबतीत तर एक रंजक घटनाच घडली आहे. मराठी रंगभूमीवर ‘गेला माधव कुणीकडे’ हे प्रशांत दामले यांचे नाटक पुन्हा येत आहे. पण या नाटकाची जुळवाजुळव करत असताना, या नाटकमंडळींना या नाटकाची स्क्रिप्ट कुठे मिळालीच नाही. बरीच शोधाशोध केल्यानंतरही स्क्रिप्ट काही हाती लागली नाही; पण त्यांचा हा भार या नाटकातल्या एका अभिनेत्रीनेच हलका केला.

‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक १९९२ मध्ये जेव्हा पहिल्यांदा रंगभूमीवर आले होते, तेव्हा त्या नटसंचात अभिनेत्री नीता पेंडसे या भूमिका रंगवत होत्या. आता नव्याने रंगभूमीवर येत असलेल्या, या नाटकातही त्या भूमिका साकारत आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी या नाटकाचे प्रयोग केले असल्याने, त्यांना हे नाटक तोंडपाठ होते. हे नाटक नव्याने करताना नाटकाची स्क्रिप्टच उपलब्ध नाही, असे जेव्हा त्यांना समजले; तेव्हा त्यांनी चक्क स्क्रिप्ट तयार करण्याचे काम हाती घेतले आणि नाटकाची ८० टक्के स्क्रिप्ट त्यांनी हाताने अक्षरशः लिहून काढली. स्क्रिप्टचे उर्वरित २० टक्के काम त्यांनी उपलब्ध क्लिप्सचा आधार घेऊन केले. साहजिकच हे नाटक नव्याने उभे राहत असताना, नीता पेंडसे यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली स्क्रिप्टच या नटमंडळींच्या मदतीला आली आहे. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी ही स्क्रिप्ट लिहून काढत, या नाटकासाठी मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर आता हे नाटक रंगभूमीवर ताल धरणार आहे.

‘श’ अक्षराची गोष्ट…!

अभिनेत्री अतिशा नाईक यांनी आतापर्यंत विविध माध्यमांद्वारे त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मात्र एक लक्षणीय बदल झाला आहे. सध्या त्यांच्या गळ्यात ‘श’ हे अक्षर असलेले लॉकेट आणि हाताच्या बोटात ‘श’ हेच अक्षर असलेली अंगठी ठळकपणे दिसून येत आहे. कुणी म्हणेल की, कदाचित अक्षरशास्त्र वगैरे पाळत, त्यांनी तसे केले असेल. मात्र हा अंदाज साफ चुकीचा ठरला आहे. त्यांच्या गळ्यात व बोटात लक्ष वेधून घेणारे ‘श’ हे अक्षर ‘शशिकला’ या नावाकडे निर्देश करणारे आहे, असे त्यांच्याशी संवाद साधल्यावर स्पष्ट होते. आता अतिशा नाईक व कुणा शशिकला यांचा काय संबंध, हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर मात्र ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरच्या एका मालिकेत
दडले आहे.

‘येडं लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर वर सुरू झाली आहे आणि या मालिकेत अतिशा नाईक या ‘शशिकला’ ही श्रीमंती थाटाची व्यक्तिरेखा रंगवत आहेत. ‘श’ हे अक्षर धारण करण्याच्या उद्देशाबाबत बोलताना अतिशा नाईक म्हणतात, “या मालिकेतल्या शशिकलाला असे वाटते की, तिच्याकडे प्रचंड पैसा आहे, तरी समोरची व्यक्ती तिच्यापुढे नमत कशी नाही. अत्यंत कावेबाज आणि आतल्या गाठीची ही बाई आहे. ती फक्त आणि फक्त स्वतःलाच महत्त्व देणारी आहे. त्यामुळे तिचे जागोजागी ‘शशिकला’ असणे, हे ठळकपणे दाखवणे गरजेचे होते. तिचे अस्तित्व ठसवण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करता करता ‘श’ या अक्षराची कल्पना सुचली.”

आता अतिशा नाईक यांना ‘श’ हे अक्षर किती लाभते, ते नजीकच्या काळात दिसून येईलच. विठुरायाच्या पंढरपुरात या मालिकेची गोष्ट आकार घेत आहे. राया व मंजिरी अशा प्रमुख व्यक्तिरेखा या मालिकेत आहेत. अतिशा नाईक यांच्यासह नीना कुळकर्णी, विशाल निकम, पूजा बिरारी, जय दुधाणे आदी कलावंत या मालिकेत भूमिका रंगवत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -