Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससप्तरंगी बोस्टन फिल्म फेस्टिव्हल

सप्तरंगी बोस्टन फिल्म फेस्टिव्हल

फिरता फिरता – मेघना साने

अमेरिकेतील लोकांना उत्तमोत्तम भारतीय चित्रपट पाहायला मिळावेत, या उद्देशाने बोस्टनमधील सात फिल्मवेड्या महिलांनी मिळून, एका भव्य फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले. मूळ संकल्पना रजिया मशकूर हिची होती आणि तिला साथ दिली वेगवेगळ्या क्षेत्रांतील सहा उच्चशिक्षित महिलांनी. एक नाही, दोन नाही चक्क सात वर्षे हा फिल्म फेस्टिव्हल त्यांनी यशस्वी करून दाखवला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनची पूर्वतयारी आता बोस्टनमध्ये सुरू झाली आहे.

या चित्रपट महोत्सवासाठी भारतभरातून चित्रपट मागवले जातात. पंजाबी, मल्याळी, गुजराती, मराठी असे सर्व भारतीय भाषांतील चित्रपट आयआयएफएफबीच्या कमिटीकडे येतात. त्यांच्याजवळ आलेल्या एकूण सुमारे सत्तर- ऐंशी चित्रपटांतून उत्तम चित्रपट निवडण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमलेले असते. ते मंडळ तीस चित्रपटांची निवड करते आणि मग पुन्हा एकदा परीक्षण करून, चर्चा करून फेस्टिव्हलला वीस चित्रपट निवडले जातात. आयआयएफएफबी (IIFFB) साठी तीन दिवस थिएटर बुक केले जाते. निवडलेले उत्तम असे वीस चित्रपट तीन दिवसांच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवले जातात. निवडलेला चित्रपट सामाजिक प्रश्न, एलजीबीटीक्यू, विद्यार्थ्यांसाठी, पहिला चित्रपट निर्माता, अमेरिकन प्रीमियर, आंतरराष्ट्रीय प्रीमियर यापैकी कोणत्या प्रकारचा आहे, हे त्या चित्रपटाच्या जाहिरातीत लिहिले जाते. ते पाहून आपल्या आवडीप्रमाणे दर्शक चित्रपट निवडतात आणि त्या त्या वेळी तो पाहायला येतात.

व्यासपीठावर कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला की, त्याची संकल्पना आणि संहिता आधी तयार करावी लागते. रजिया मशकूर ही स्वतः एक उर्दू आणि हिंदी भाषेतील लेखिका असल्याने ती या फिल्म फेस्टिव्हलला चांगला आकार देऊ शकते. यापूर्वीही तिने अनेक स्वलिखित कार्यक्रमांचे आयोजन आणि सादरीकरण केले आहे. ‘मधुबाला’ या विषयावर कार्यक्रम सादर करण्यासाठी तिने लिहिलेली संहिता फारच आकर्षक होती. मधुबालाच्या चित्रपटांतील गाणी, नृत्ये आणि चित्रपटातील काही प्रसंग तिने यासाठी निवडले होते. ते अभिनित करण्यासाठी कलाकारांची तालीमही तिने घेतली होती.अमेरिकेतील कलाकार आठवडाभर नोकरीत व्यग्र असतात, तरी वीकेंडला म्हणजे शनिवार-रविवार तालमीसाठी वेळ देऊन, ते कार्यक्रम उभा करतात.

कोणत्याही कार्यक्रमाची संहिता लिहिण्यासाठी रजिया प्रथम त्या विषयावर रिसर्च करते. मान्यवर कलाकारांबद्दल अंदाजाने लिहिणे तिला आवडत नाही. मीनाकुमारीवर लिहिलेल्या कार्यक्रमातही तिने अशीच मेहनत घेतली होती. एकदा एका रसिकाने साहिर लुधियानवी यांच्यावर कार्यक्रम असावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. रजियाने संहिता लिहून साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या लेखनाचा त्यांच्या जीवनाशी कसा संबंध आहे, हे दाखवून दिले.

लघुकथा लेखिका हाजरा मसरूर हिच्याशी साहिर लुधियानवी यांचा विवाह होणार होता. पण काही कारणाने तो मोडला. रजियाने भारतात असताना ‘हजरा मसरूर के अफसानों का तझ्झीया’ हा विषय घेऊन मुस्लीम अलिगढ विद्यापीठातून एम.फील. केले होते. त्यामुळे साहिरच्या आयुष्यातील काही घटनांची सत्यता तिने सरळ हाजरा यांच्याशी संपर्क करून पडताळून पाहिली. साहिर लुधियानवी यांच्यावर कार्यक्रम करताना रजियाने त्यांची उत्तमोत्तम गाणी तर निवडली होतीच, पण साहिरच्या जीवनावर स्वतः लिहिलेला पंधरा मिनिटांचा एक निबंधदेखील व्यासपीठावर सादर केला. लोक मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत होते. या कार्यक्रमाला अमेरिकेतील अनेक प्रांतातील लोकांनी उपस्थित राहून गर्दी केली होती. थिएटर हाऊसफूल्ल होऊन काही लोक तीन तास उभे राहून, हा कार्यक्रम पाहत होते. इतका तो कार्यक्रम खिळवून टाकणारा होता.

या सर्व कार्यक्रमांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे, या फेस्टिव्हलचे आयोजन रजिया यशस्वीपणे करून दाखवीत आहे. रजियाने बोस्टन फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना मैत्रिणींसमोर मांडल्यावर तिच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील दिग्गज मैत्रिणी तिला मदत करायला पुढे आल्या. तपस्या श्रीवास्तव, मीरा सिद्धार्थ, सूरजा मेनन रॉयचौधरी, प्रिया सामन्थ, अनु शर्मा, सुगंधा गोपाल, शिबा मशकूर, अरुंधती दायते या सर्वांनी महोत्सवाची जबाबदारी घेतली. फेस्टिव्हलसाठी अनेक कामे करावी लागणार होती. थिएटर बुक करणे, चित्रपटांसाठी परीक्षक निश्चित करणे, फेस्टिव्हलला आलेल्या पाहुण्यांची सोय करणे, बॅकस्टेजची तयारी, तिकीटविक्री तसेच निरनिराळ्या प्रांतातील लोकांशी संपर्क करणे अशी अनेक कामे या मैत्रिणींनी समर्पित भावनेने केली. काही तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी पुरुष मित्रांनीही मदत केली. रोहित चंद्रा, सुहैब सिद्दीकी, रामकृष्ण पेनुमार्थी, सुरिंदर मगदादी, रमेश दादीगला, चिराग शहा या मंडळींनी (IIFFB)च्या उपक्रमांना कायम सक्रिय पाठिंबा दिला.

इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनच्या या फेस्टिव्हलमध्ये केवळ चित्रपट दाखवले जात नाहीत, तर चित्रपटातील कलाकारांना पुरस्कारही दिले जातात. ‘बेस्ट फिचर फिल्म’, ‘बेस्ट ॲक्ट्रेस’, ‘बेस्ट डिरेक्टर’ असे पुरस्कार तर असतातच, पण एखाद्या ज्येष्ठ कलाकाराचे काम पाहून, त्याला ‘जीवनगौरव’ पुरस्कारही घोषित केला जातो. त्याचप्रमाणे चार लक्षवेधी पुरस्कार असतात. एक म्हणजे ‘प्राइड ऑफ इंडिया’, दुसरा ‘फ्रेंड ऑफ अमेरिका’, तिसरा ‘कम्युनिटी प्राइड अवॉर्ड’ आणि चौथा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ गेल्या वर्षी, म्हणजेच २०२३मध्ये सन्माननीय कलाकार फरीदा जलाल या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांनी स्वतः या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून, सर्वांना आनंद दिला. २०२२ मध्ये आशा पारेख यांना या पुरस्काराने सम्मानित केले होते. अशा प्रकारच्या भव्य सोहळ्याला आर्थिक पाठबळ जरुरीचे असते; पण आजवर झालेल्या या फेस्टिव्हलला कोणीही मोठा प्रायोजक मिळालेला नाही. केवळ रसिक प्रेक्षकांच्या पाठबळावरच हा उपक्रम सुरू आहे.

meghanasane @gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -