मराठवाड्यात ८.९२ टक्के तर खडकवासला धरणात ५ टीएमसी पाणी शिल्लक
पुणे : यंदा मुंबईकरांसह पुणेकरांना (Mumbai-Pune) देखील उन्हाच्या तीव्र झळांसोबत भीषण पाणी टंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुंबई पुणे यासह अनेक जिल्ह्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याचे प्रमाण ९ टक्क्यांनी कमी झाल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्यासोबतच भीषण पाणी टंचाईचा देखील ठरत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा केला जाणाऱ्या खडकवासला (Khadakwasla) धरणात केवळ ५ टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वात कमी ८.९२ टक्के पाणीसाठा उरला असल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.
पुण्यात केवळ ५.३२ टीएमसी पाणीसाठा
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या फक्त ५.३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे प्रमाण अवघे १८.२५ टक्के इतके आहे. खडकवासला धरणक्षेत्रात पानशेत वरसगाव टेमघर या धरणक्षेत्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तर खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षी आजच्या तारखेला ७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी आणि या वर्षीच्या आजच्या तारखेच्या टक्केवारीची तुलना केल्यास पाणी साठा कमी आहे.
महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणेकरांना जेमतेम महिनाभर हा पाणीसाठा पुरू शकणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस न पडल्यास पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय शिल्लक पाण्यातून पुणे शहर, दौंड शहराला पाणी पुरवठा करण्याचा जलसंपदा विभागाने प्रस्ताव मांडला आहे.