पुरातत्व विभागाकडून होणार पाहणी
पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukmini Mandir) सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुने रुप समोर आणले जात आहे. अशातच मंदिरासंदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सुशोभिकरण करताना खोदकामा दरम्यान कानोपात्रा मंदिराजवळ एक भुयार आढळून आले आहे. सात ते आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये देवीची मूर्ती असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम या खोलीची पाहणी करणार आहेत.
गुप्त खोलीची पाहणी
विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम सुरु असताना काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली आढळून आली आहे. सात ते आठ फूट रुंद असणाऱ्या या खोलीत मूर्तीसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली आहे. पुरातत्व विभागाची खोलीची पाहणी करण्यास आत उतरणार आहे. त्याचबरोबर या खोलीत नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुरातत्व विभागाच्या टीमने खोलीच्या आत उतरुन तपासणी केली असता तीन दगडाच्या मूर्त्या आणि पादुका सापडल्या असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर नाणी आणि बांगड्यांचे अवशेषही सापडले आहेत. याप्रकरणी पुरातत्व विभाग अधिक पाहणी करणार आहे.