पंढरपूरचे विठ्ठल मंदिर चांदीने चकाकणार
पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिराचे रुप पालटणार आहे. त्यामुळे भक्तांना आता ज्ञानोबा तुकारामांच्या काळातील विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचे रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मूळ रूपात येणार आहे. मंदिरातील पुरातन रुप परत येण्यासाठी तब्बल ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम केले असून नव्याने तयार झालेले मंदिर भाविकांना सातशे वर्ष मागे घेऊन जाणार आहे.
८०० ते ९०० किलो चांदीचा वापर
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे ८०० ते ९०० किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.
पाषाणावरही केले सुबक नक्षीकाम
प्राचीन विठ्ठल मंदिराप्रमाणे, पाषाणातील असणारे नक्षीकाम, खांबा वरील विविध मूर्ती, देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम करण्यात आले आहे.त्यामुळे विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन रूपांमुळे अधिक मनमोहक दिसणार आहे.
२ जूनपासून भाविकांना मिळणार चरणस्पर्श
विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याच्या कामासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विठुरायाचे चरणदर्शन १५ मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद केले होते. या काळात भाविकांना केवळ मुखदर्शन मिळत होते. मात्र तब्बल ७९ दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास २ जूनपासून सुरुवात होणार आहे. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.