
एसटीसह बेस्टकडून जादा गाड्यांची सोय
मुंबई : गुरुवार मध्यरात्रीपासून ठाणे (Thane) स्थानकात मध्य रेल्वेवरील (Central Railway) ६३ तासांचा विशेष मेगाब्लॉक (Megablock) सुरू झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (CSMT) ३६ तासांचा मेगाब्लॉक शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. या ब्लॉक दरम्यान प्रवाशांची होणारी गैरसोय व खोळंबा होऊ नये यासाठी काही विशेष पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी (ST) महामंडळाने विशेष सोय केली आहे. एसटी महामंडळाकडून ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बेस्ट (Best) प्रशासनाकडूनही जादा फेऱ्या चालवण्या जाणार आहेत. बेस्टच्या ५५ बसच्या ४८६ अधिक फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
एसटीने केली विशेष सोय
मुंबईमध्ये सीएसएमटी आणि ठाणे रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात आलेल्या ब्लॉक दरम्यान, मुंबईत ३ दिवसात ९५३ लोकल, ७२ मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे प्रवाशांचे हाल कमी करण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी मागणी लक्षात घेता यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिली आहे.
बेस्टच्या ४८६ जादा गाड्या
रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कुलाबा, वडाळा, भायखळा स्थानक, दादर आदी ठिकाणांहून ५५ बसच्या ४८६ फेऱ्या जादा चालवल्या जाणार आहेत. कुलाबा बस स्थानकातून १२ जादा बसद्वारे २३२ अधिक फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. तर इतर ठिकाणाहून ४३ जादा बसच्या २५४ अधिक फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
तीन दिवसीय ब्लॉकदरम्यान अशा असतील बस फेऱ्या -
३१ मे, १ जून व २ जून दुपारी १२.३० वाजेपर्यंत सकाळ व संध्याकाळ प्रवर्तन
- १ इलेक्ट्रिक हाऊस ते खोदादाद सर्कल दरम्यान ५ बस व ३० बस फेऱ्या असणार आहेत.
- ए २ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्था [ प ] दरम्यान ५ बस ४० बस फेऱ्या.
- २ मर्यादित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा स्था [ प ] दरम्यान ३ बस २४ बस फेऱ्या.
- ए सी १० इलेक्ट्रिक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम दरम्यान ५ बस ३० बस फेऱ्या.
- ११ मर्यादित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धारावी आगार दरम्यान ५ बस ३० बस फेऱ्या.
- १४ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर आगार दरम्यान ५ बस २० बस फेऱ्या.
- ए सी ४२ राणी लक्ष्मी बाई चौक ते बाळकूम [ दादलानी पार्क ] दरम्यान ५ बस २० बस फेऱ्या.
- ए ४५ बॅकबे आगार ते एमएमआरडीए वसाहत विस्ता [ माहुल ] दरम्यान ५ बस २० बस फेऱ्या.
- ए १७४ अँटॉप हिल ते प्लाझा दरम्यान ५ बस ४० बस फेऱ्या.
१ जून रात्री ००. ३० वाजल्यापासून २ जून दुपारी १२. ३० वाजेपर्यंत असं असेल जादा बस गाड्यांचे प्रवर्तन
- १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर स्थानक पूर्व दरम्यान ४ बस व ८० बस फेऱ्या आहेत.
- २ मर्यादित इलेक्टिक हाऊस ते भायखळा स्थानक पश्चिम दरम्यान ४ बस ८० बस फेऱ्या आहेत.
- ए सी १० इलेक्टिक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम दरम्यान ४ बस ७२ बस फेऱ्या आहेत.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई
विशेष काही दिवसांमध्ये प्रवाशांकडून टॅक्सी तसेच रिक्षा चालकांकडून अधिक भाडे आकारण्याचे प्रकार घडतात. मात्र या मेगाब्लॉकदरम्यान जास्त भाडे आकारणे रिक्षा तसेच टॅक्सी चालकांना महागात पडू शकणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीमध्ये प्रवाशांना न बसवणाऱ्या किंवा जास्त पैशांची मागणी करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी आरटीओची विशेष पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.