Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीMonsoon Update : वरुणराजा बरसणार! केरळनंतर 'या' मार्गाने मान्सून महाराष्ट्रात धडकणार

Monsoon Update : वरुणराजा बरसणार! केरळनंतर ‘या’ मार्गाने मान्सून महाराष्ट्रात धडकणार

मुंबई : वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये (Keral) मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्याने आता मुंबईकर देखील मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून दोन दिवस आधीच पोहोचल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असल्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक, रत्नागिरी, सिंधुदुर्गमार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे. सामान्यत: हा प्रवास पूर्ण करण्यासाठी १० दिवस लागतात. मात्र वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार असल्याच हवामान विभागाने म्हटले आहे.

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम

हवामान विभागाने यापूर्वी ३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु चक्रीवादळ रेमलमुळे (Remal Cyclone) मान्सून वेगाने पुढे गेला आहे आणि केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतेक भागात वेळेपूर्वी पोहोचला आहे.

सामान्य पावसाचा अंदाज

‘मान्सूनचा पॅटर्न कधीच सारखा नसतो’, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर पर्यावरणीय परिस्थितीनुसार मान्सूनचा पॅटर्न बदलत राहतो. ज्याप्रमाणे केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. तर यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

दरम्यान, येत्या दोन तीन दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सूनचा आणखी विस्तार होण्यास अनुकूल परिस्थिती असल्यामुळे खाली दिलेल्या भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

  • मध्य अरबी समुद्राचे इतर काही भाग.
  • दक्षिण अरबी समुद्राचे उर्वरित भाग.
  • लक्षद्वीप प्रदेश आणि केरळचा काही भाग.
  • कर्नाटकातील काही भाग.
  • तामिळनाडूचे इतर काही भाग.
  • दक्षिण-पश्चिम आणि मध्य बंगालचा उपसागर.
  • ईशान्य बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग.
  • आसाम आणि मेघालय.
  • पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचे उप-हिमालयी भाग.
  • तर आठवड्याच्या उर्वरित दिवसांमध्ये, नैऋत्य मान्सून दक्षिण भारताच्या उर्वरित भागांमध्ये आणि पूर्व भारतातील आणखी काही भागात पसरू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -