पुणे : गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळं सर्वसामान्यांना घर घेणं अवघड होत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्य लोक म्हाडा (Mhada) आणि सिडकोकडून (CIDCO) उपलब्ध होणाऱ्या घरांची वाट पाहात असतात. अशातच पुण्यात घर घेण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती मिळत आहे. पुणे (Pune) विभागीय मंडळानं मार्च २०२४ मध्ये म्हाडा लॉटरी जाहीर केली होती. याची मुदत ३० मे रोजी संपली होती. मात्र आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करुन दिली आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार
म्हाडानं मार्च महिन्यात ४,८७७ घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. यासाठी अर्ज प्रक्रिया ७ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत होती. मात्र म्हाडाने ही मुदत वाढवून ३० मे २०२४ पर्यंत केली. आता पुन्हा या मुदतीत वाढ करण्यात आली असल्याचे म्हाडाने सांगितलं आहे.
शासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतलेले असल्यामुळे नागरिकांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याचे अनेकांनी म्हटले होते. त्यामुळे नागरिकांची ही मागणी लक्षात घेता पुणे मंडळाने या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला. आता ही मुदत ६ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.