नवी दिल्ली: देशभरात उष्णतेचा कहर सुरू आहे. उन्हाळा इतका भीषण झाला आहे की लोकांचे बळी जाऊ लागले आहे. बिहार-झारखंड असो ओडिशा…अनेक राज्यांमध्ये उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे.
बिहारच्या अनेक ठिकाणी गुरूवारी पारा ४४ अंश सेल्सियसहून अधिक वर गेला होता. राज्यातील ३ जिल्ह्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आरोग्य विभागाच्या माहितीनुसार भीषण उन्हामुळे १२ जणांचा मृत्यू झाला तर २०हून अधिक लोक विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला. तर ओडिशामध्येही अनेकांनी आपला जीव गमावला.
देशातील अनेक राज्यांप्रमाणेच बिहार, झारखंड, ओडिशामध्ये उष्णतेची भीषण लाट पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा ४४ अंशाहून अधिक होता. तर पलामू जिल्ह्यात सर्वाधिक तापमान गुरूवारी ४७.४ अंश सेल्सियस इतके होते.
ओडिशामध्ये १० जणांचा मृत्यू
ओडिशा येथील राऊरकेला सरकारी रुग्णालयाचे प्रभारी संचालक डॉ. सुधारानी प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मृत्यू दुपारी दोन वाजल्यापासून ते सहा तासांच्या आत झाले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत ८ जणांचा जीव गेला होता. बाकी लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
झारखंडमध्ये ५ जणांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत झारखंडमध्ये एक एक करून ५ जणांचा मृत्यू झाला. तर बिहारच्या विविध जिल्ह्यातूनही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे बिहारच्या औरंगाबादमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर २०हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. बक्सरमध्ये दोन मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर आरामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला.