Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीसीबीआयचा तोतया अधिकारी गजाआड!

सीबीआयचा तोतया अधिकारी गजाआड!

नवी मुंबई : वनविभागाची ५०० एकर पडीक जमीन नावावर करून देण्याचा बहाणा करून दोन व्यक्तींकडून तब्बल ८० लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील हनुमंत धुमाळ (४८) असे या तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्याचे नाव असून त्याने वन विभागाचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तसेच दिंडोशी कोर्टाची बनावट ऑर्डर देऊन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या तोतयाने इतर अनेक लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

सीबीआय कार्यालयात चालक पदावर करत होता काम

या प्रकरणातील आरोपी सुनील धुमाळ हा सीबीआयच्या कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे सीबीआयची लाल दिव्याची गाडी त्याच्याकडे कायम राहत होती. याचाच फायदा उचलत त्याने सीबीआयमध्ये कामाला असल्याचे भासवण्यासाठी सीबीआयचे बनावट ओळखपत्र देखील बनवून घेतले होते.

लाल दिव्याच्या गाडीचा केला गैरवापर

त्यानंतर या तोतयाने लाल दिव्याच्या गाडीचा वापर करून कोल्हापूर येथील प्रसाद घोरपडे यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांना ७० ते ८० लाखात वनविभागाची पडीक जमीन त्यांच्या नावावर करून देण्याचा बहाणा केला होता.

घोरपडे व त्यांचा मित्र प्रसाद जैन या दोघांनी त्याच्यावर विश्वास ठेवून कोल्हापूर आजरा येथील ५०० एकर वनजमीन नावावर करून घेण्यासाठी आरोपी सुनिल धुमाळ याला ८० लाख रुपये दिले होते.

वन विभागाचे ना हरकत पत्र व कोर्टाचे आदेश पत्र दिले

त्यानंतर आरोपी धुमाळ याने त्यांना भारत सरकारच्या वन विभागाचे जमीन हस्तांतरणाचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाचे आदेशाचे पत्रही दिले होते. मात्र जमीन हस्तांतरणाचा अंतिम आदेश देण्यास आरोपी धुमाळ याने टाळाटाळ सुरू केल्यानंतर घोरपडे यांनी धुमाळ याने दिलेल्या वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची तसेच कोर्टाच्या आदेशाची खातरजमा केली.

दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले

तेव्हा ही दोन्ही कागदपत्रे बनावट असल्याचे तसेच तो सीबीआयच्या कार्यालयात कॉन्ट्रक्ट पद्धतीवर चालक म्हणून काम करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर सुनील धुमाळ विरोधात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -