वेगाचे आकर्षण, यमराजाचे निमंत्रण

Share

देशाच्या कानाकोपऱ्यांत अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामुळे व त्यानंतर अपघात दडपण्यासाठी झालेल्या घडामोडींनी देशभर अपघाताला प्रसिद्धी मिळालेली आहे. अर्थात अल्पवयीनांकडून होणारे अपघात तसेच ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या घटनांमधील अपघात हे अधूनमधून घडतच असतात. पण चालकांना वाहन चालविताना वेगाचे आकर्षण म्हणण्यापेक्षा व्यसनच जडल्याने अपघातांचा आलेख वाढतच चालला आहे. वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात यावी, वाहनचालकांसह प्रवाशांना वेळेवर इच्छितस्थळी पोहोचता यावे यासाठी केंद्र सरकारकडून व त्या त्या राज्यातील राज्य सरकार यांच्याकडून रस्ते रुंदीकरण, चौपदरी रस्ते, सहा पदरी रस्ते आदी कामे वेगाने केली जात आहेत. वेळ पडल्यास डोंगर फोडून, बोगदे तयार करून रस्ते बनविले जात आहेत. सुविधांसाठी बनविण्यात आलेले रस्तेच आज मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत. तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात, उपनगरात अपघाताच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत.

वाहने वेगाने हाकण्याचे वाहनचालकांना जडलेले आकर्षणरूपी व्यसनच आज अपघातांना कारणीभूत ठरत आहे. मुंबई-पुणे अंतर कापण्यास पूर्वी पाच ते सहा तास लागायचे; परंतु एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर हे अंतर आता तीन ते चार तासांत पार करणे शक्य झाले आहे. पूर्वीसारखा वाकड्या वळणाचा खंडाळा घाट ही प्रवासाची ओळख आता पुसली जाऊन तीन पदरी एक्स्प्रेस वे आता गेल्या काही वर्षांमध्ये परिचित झालेला आहे. त्यातच आता मिसिंग लिंक शोधून अंतर कमी करण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात आला आहे; परंतु वाहनांची स्पर्धा आणि चालकांना अतिवेगाने वाहने दामटण्याची लागलेली सवय यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर कोठे ना कोठे आपणास अपघात झालेले पाहावयास मिळत आहेत. या अपघातांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वांनाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांसाठी ताशी किमी ८०, तर हलक्या वाहनांसाठी १००ची मर्यादा घालूनही या एक्स्प्रेस वेवर एकशे वीस ते दीडशेच्या वेगाने वाहने हाकताना चालकांना अभिमान वाटत आहे. एक्स्प्रेस वे मार्गावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही, दोन हजारांचे आर्थिक दंड होऊनही चालकांमधील वेगाचे आकर्षण कमी होत नाही.

नवी मुंबईमध्ये देखील वाशी ते बेलापूर दरम्यान सिडकोने निर्माण केलेल्या पाम बीच मार्गाचीही अवस्था थोड्या फार फरकाने तशीच झालेली आहे. १९९८-९९ च्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने वाशी सेक्टर १७ ते बेलापूर किल्ला चौकापर्यंत पामबीच मार्गाची खाडीमार्गालगतच निर्मिती केली. मार्गासभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य, खाडीकिनारा, तीन पदरी मार्ग, एनआरआय वसाहतीचा शेजार, फ्लेमिंगोचे होणारे दर्शन हे वातावरण पाहून या मार्गाला ‘क्विन ऑफ नेकलेस’ असे संबोधले जाऊ लागले; परंतु हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर या मार्गावर अपघाताचे जे प्रमाण सुरू झाले आहे, ते आजही कायम आहे. त्यामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा म्हणून कलंकित व्हावे लागले. या मार्गावर ताशी ६० किमीची मर्यादा असावी, असे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले असले तरी दुचाकी वाहनदेखील या मार्गावरून ८० ते १००च्या वेगमर्यादेने धावताना पाहावयास मिळत आहे.

कधीतरी वाहतूक पोलिसांची वाहने वेग मोजणारी मशीन घेऊन पामबीच मार्गावर हजर असतात. पण केवळ महिन्या-दोन महिन्यांनी वाहतूक पोलीस वेग मोजत असल्याने वाहनचालकांना त्याचे फारसे सोयरसुतक राहिलेले नाही. आता सरकारने नव्याने कोस्टल रोडची मुंबई शहरात निर्मिती केली आहे. या मार्गावरही अपघात घडत आहेत. शिवडी ते वरळीदरम्यान सी ब्रिजची अर्थात सागरी सेतूची सरकारने निर्मिती केली आहे. सागरी सेतूमुळे मुंबई ते थेट पनवेल-उरण भागाशी विनाअडथळा संपर्क साधता यावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावी हा राज्य सरकारचा हेतू होता. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर तेथेही अपघाताचा श्रीगणेशा झाला आहे. या मार्गाचा प्रवासासाठी कमी व पर्यटकांसाठी आकर्षणाचा अधिक वापर सुरुवातीच्या काळात झाला. या मार्गावर केवळ मार्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाहने धावू लागली आहेत. रस्त्यावर थांबून सेल्फी काढण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

वाहतूक पोलिसांनी दंड आकारूनही त्या मार्गावर सेल्फी काढण्याचा मोह आजही कमी झालेला नाही. वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास, ब्रेक फेल झाल्यास, इंजिनमध्ये बिघाड झाल्यास, टायर फुटल्यास अपघात झाले, तर एक वेळ समजण्यासारखे आहे. अशा घटनांना कोणीही आळा घालू शकत नाही; परंतु अशा प्रकारांनी अपघात घडण्याचे प्रकार अत्यल्प आहे. अधिकाधिक अपघात हे चालकांनी वाहनावरील नियत्रंण गमविल्यानेच होत आहेत. त्याखालोखाल मद्य पिऊन वाहने चालविल्याने अपघात होण्याचे प्रमाण आहे. अपघात झाल्यावर वाहनाचे नुकसान होते, हे वाहनाचे झालेले नुकसान एक वेळ विमा कंपन्यांकडून भरून निघेल. पण अपघातात जीवितहानी झाल्यास त्या घराचे न भरून येणारे नुकसान होते. कोणाला अपघातात अपंगत्व आल्यास त्याला कायमस्वरूपी सांभाळण्याची वेळ परिवारावर येते. घरातील वयोवृद्ध मातापित्यांना आपला मुलगा गमवावा लागतो, पत्नीला आपला पती, तर मुलांना आपले वडील गमवावे लागतात. चालकांना अति वेगाचे असलेले आकर्षण अनेक परिवारांचे नुकसान करत असते.

अपघाताची चौकशी केल्यावर अनेक चालक हे विनापरवानाही वाहने चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आलेले आहेत. वेगाने वाहन चालविण्यापेक्षा सुरक्षित वाहन चालविणे आज काळाची गरज आहे, हे वाहनचालकांना पटवून देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. अपघाताच्या घटना पाहिल्यावर चालकांचे समुपदेशन करण्याची वेळ आज आलेली आहे. वेगाचे आकर्षण एका मर्यांदेपर्यंत ठीक आहे. नियंत्रणात करता येईल इतपतच वेगाने वाहन हाकणे आवश्यक आहे. ‘अतिघाई संकटात नेई’ या सुभाषिताचे गांभीर्य समजून घेण्याची वेळ आलेली आहे. स्वत:ला जपा, वाहनाला जपा आणि प्रवाशांनाही जपा हे आज चालकांनी स्वत:हून मनावर बिंबविले, तर नक्कीच अपघाताच्या घटनांना आळा बसेल, अन्यथा वेगाचे आकर्षण म्हणजे यमराजाच्या घरचे निमत्रंण हे चालकांना समजावून सांगण्याची वेळ आज आलेली आहे.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

34 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

43 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

52 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago