Wednesday, October 9, 2024
Homeताज्या घडामोडीअगरवाल पिता-पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अगरवाल पिता-पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जामिनाचा मार्ग मोकळा, पोलीस चौकशीसाठी ताबा घेण्याची शक्यता

पुणे : राज्यभर गाजलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच विशाल अगरवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होता. आता, सुरेंद्र कुमार अगरवाल यांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे, दोन्ही बाप-लेकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विशाल अगरवाल यास जामीन मिळाल्यानंतरही पोलिस चौकशीसाठी त्याचा ताबा घेतला जाऊ शकतो.

पुण्यातील बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने बेजबाबदारपणे गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अगरवाल यांच्यावर ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता न्यायालयाने दोन्ही बाप-लेकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांस शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात या पिता-पुत्रास न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे, आता दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलिस विशाल अगरवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात, अशी माहिती आहे. त्यामुळे, जामीन मिळाल्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा विशाल अगरवालच्या पाठिशी असणार आहे.

विशाल अगरवालवर विविध गुन्हे

पुणे पोलिसांकडून विशाल अगरवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता, असे पोलिसांना खोटे सांग’ असे विशाल अगरवालने ड्रायव्हरला सांगितल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अगरवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -