Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखप्लास्टिकमुक्तीचा नवा मार्ग

प्लास्टिकमुक्तीचा नवा मार्ग

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक

जगभर प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. माणसासह अन्य प्राणी जीवनही धोक्यात आले आहे. प्लास्टिकचे विघटन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जगभर विविध दावे केले जात असले आणि प्लास्टिकच्या निर्मितीवर बंधने येत असली तरी प्लास्टिकमुक्तीचे आव्हान कायम आहे. अशा स्थितीत भारतीय शास्त्रज्ञांना लागलेला नवा शोध आशेचा किरण आहे. या शोधाने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा आहे.

आज जगात वाढता प्लास्टिक कचरा हे एक मोठे आव्हान बनले आहे. ‘सगल यूज प्लास्टिक’ने यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कमी घनतेचे पॉलीथिलीन डिस्पोजेबल किराणा सामानासाठी लागणाऱ्या पिशव्या तसेच अन्न पॅकेजमध्ये वापरले जाते. एवढेच नव्हे तर, पर्यावरणात सातत्याने वाढणाऱ्या कचऱ्यामुळे असंख्य समस्या निर्माण होत आहेत. शास्त्रज्ञांना गंगा-यमुनादी पवित्र नद्यांच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणावर मायक्रोप्लास्टिक असल्याचे पुरावे मिळाले होते. अशा प्रकारे प्लास्टिकच्या अति सूक्ष्म कणांनी आपल्या शरीरात प्रवेश केला आहे. आणखी एका संशोधनामध्ये लोक दर आठवड्याला अंदाजे पाच ग्रॅम मायक्रोप्लास्टिक कण गिळत आहेत, असे म्हटले आहे. मात्र दररोज ग्रहण केले जाणारे हे प्लास्टिक एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके आहे. यावरूनच आपण समस्येचे गांभीर्य ओळखू शकतो.

२०२२ मध्ये प्रथमच मानवी फुप्फुसात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले होते. त्याचप्रमाणे, आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना मानवी रक्त, फुप्फुस आणि नसांमध्येही मायक्रोप्लास्टिकचे अंश सापडले आहेत. ‘जर्नल एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशनल’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात न जन्मलेल्या बालकांच्या नाळेमध्येही मायक्रोप्लास्टिक्स असल्याचा पुरावा आढळला आहे. म्हणजेच आता पृथ्वी, आकाश, समुद्र, उंच पर्वत आणि अगदी दूरच्या ध्रुवापर्यंतही प्लास्टिक पोहोचले आहे. एवढेच नाही तर, शास्त्रज्ञांनी प्लास्टिकमध्ये तब्बल १६ हजार ३२५ रसायने आढळत असल्याची पुष्टी केली आहे. यातील २६ टक्के रसायने मानवी आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी हानिकारक असणे ही खरी चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत प्लास्टिकचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहता यापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहेत.

अलीकडेच, प्लास्टिक प्रदूषणावरील आंतरराष्ट्रीय करारासाठी कॅनडाची राजधानी ओटावा येथे गांभीर्यपूर्वक विचारमंथन केल्यानंतर सर्व राष्ट्रांसाठी बंधनकारक कराराचा मसुदा मान्य करण्यात आला. तो या वर्षाच्या अखेरीस बुसान येथे पार पडणाऱ्या बैठकीत सहभागींपुढे सादर केला जाईल. आज जगातील कोणतेही राष्ट्र प्लास्टिक प्रदूषणापासून अस्पर्शित राहिलेले नाही. हे लक्षात घेऊनच संयुक्त राष्ट्रांनी अशा एका बंधनकारक करारासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे संपूर्ण मानवजात आणि जैविक सभ्यता सातत्याने प्रभावित होत आहे. प्लास्टिक ही विसाव्या शतकातील सर्वात मोठी उपलब्धी असली तरी ती आता संपूर्ण मानवी जीवन आणि निसर्गासाठीही एक मोठे संकट बनले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक सामग्रीवर निर्बंध लादले असले तरी दर वर्षी ६०० अब्ज डॉलर किमतीचे सुमारे चारशे दशलक्ष टन प्लास्टिक तयार होते, हे विसरून चालणार नाही. २०५० पर्यंत हेच उत्पादन वर्षाला सुमारे १०० कोटी टनांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच ही बाब चिंता वाढवणारी आहे.

सध्या उत्पादित होणाऱ्या प्लास्टिकपैकी केवळ नऊ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार, बहुतेक प्लास्टिक एक तर उघड्यावर जाळले जाते किंवा इकडे तिकडे टाकले जात आहे. साहजिकच प्रदीर्घ काळ टिकत असल्यामुळे त्याचा वापर किंवा गैरवापर सुरूच आहे. तो कमी करण्यासाठी २०४० पर्यंत सर्व प्रकारच्या प्लास्टिकचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्लास्टिक समर्थकांचा युक्तिवाद आहे की ते केवळ ३.५ टक्के कार्बन उत्सर्जन करते; परंतु प्लास्टिकची सहज उपलब्धता आणि व्यापकता पाहता असा अंदाज लावला जाऊ शकतो की, ते पश्चिम प्रशांत महासागरात ३६ हजार फूट खोलीवर, तर माऊंट एव्हरेस्ट सारख्या २९ हजार फूट उंचीवरही विपुल प्रमाणात आढळते. त्यामुळेच व्यापक जनजागृती आणि नानाविध अंगाने प्रयत्न करूनही आपल्यातील अनेकजण शरीरात प्रवेश करणाऱ्या प्लास्टिकबद्दल अनभिज्ञ आहेत.

प्लास्टिकसोबतच आरोग्याला घातक असणारी अनेक रसायने सजीवांच्या शरीरात शिरली असून आपल्याला त्यांची कल्पना नाही. बहुधा या पृथ्वीवर प्लास्टिक नसणारे एकही ठिकाण आता उरले नसेल. प्लास्टिकचे सूक्ष्म कण अन्न, पाणी, कपडे इत्यादींमधून शरीरात प्रवेश करतात. सध्या सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य सेवेसाठीही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. २० वर्षांपूर्वी प्रथमच लहान म्हणजेच दोन ते पाच मिलिमीटर आकाराचे प्लास्टिकचे कण सापडले. ते प्लास्टिकच्या मोठ्या तुकड्यांमधून तयार झाले होते.

यथावकाश ‘नॅनो प्लास्टिक’चा शोध लागला. हे प्लास्टिक अत्यंत सूक्ष्म आकाराचे आहे. या सूक्ष्म आकारामुळेच नॅनो प्लास्टिक सामान्य नजरेपासून लपून राहते आणि विविध माध्यमांद्वारे आपल्या शरीरात पोहोचल्यानंतर ऊतकांमध्ये जमा होते. पुढे याचेच दूरगामी परिणाम करतात. कर्करोग आणि मेंदूतील रक्तस्त्रावांसारख्या गंभीर परिस्थितीला शरीरात प्रवेश केलेले प्लास्टिक हे एक प्रमुख कारण आहे. आता ही बाब विविध अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. मात्र प्लास्टिकमुक्त पर्यावरणाच्या संकल्पनेतील सर्वात मोठा अडथळा अर्थपूर्ण पर्यायाचा अभाव हा आहे. काही पर्याय सुचवले असले तरी, ते वापरण्याच्या दृष्टीने सोपे नाहीत. मात्र या गंभीर समस्येतून सुटका मिळवण्यासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे.

स्वच्छ भारत अभियानानंतर भारतात प्लास्टिकच्या वापरात लक्षणीय घट झाली आहे. अनेक ‘स्टार्ट अप्स’च्या माध्यमातून प्लास्टिक संकलन, पृथक्करण आणि पुनर्वापराच्या कामाला गती मिळाली आहे. पण हे सर्व प्रयत्न सूक्ष्म आणि ‘नॅनो प्लास्टिक’ला रोखण्यासाठी प्रभावी ठरत नाहीत. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक पातळीवर प्लास्टिक वापरण्यापासून परावृत्त होत नाही, तोपर्यंत या समस्येपासून मुक्ती मिळणे अशक्य आहे. प्लास्टिक उत्पादन कमी करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर कठोर पावले उचलावी लागतील. प्लास्टिकला योग्य पर्याय मिळेपर्यंत पुनर्वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारावे लागेल. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही बाबही अभ्यासपूर्वक ठरवावी लागेल. कारण उघड्यावर टाकले जाणारे प्लास्टिक सर्वाधिक विनाशकारी ठरत आहे.

थोडक्यात, या माध्यमातून होऊ पाहणारा विश्वाचा विनाश टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जबाबदार राहावे लागेल. शेवटी प्लास्टिकचा कमीत कमी किंवा प्रतिबंधित वापरच आपल्या हिताचा आहे. हे सगळे लक्षात घेता भारतीय शास्त्रज्ञांनी एक प्रकारची बुरशी शोधून काढली असून ती कमी जाडीचे प्लास्टिकही लवकर नष्ट करू शकते. चेन्नईच्या भारतीदासन आणि मद्रास विद्यापीठाच्या संशोधकांनी हा शोध लावला असून त्याचे परिणाम ‘नेचर सायंटिफिक रिपोर्टस’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांनी ‘क्लाडोस्पोरियम स्फेरोस्पर्मम’ नावाच्या या बुरशीला सूक्ष्म जीवांचा संसर्ग झालेल्या मायक्रोप्लास्टिक्सच्या तरंगत्या ढिगाऱ्यापासून वेगळे केले. ही बुरशी डिस्पोजेबल प्लास्टिक पिशव्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिमरचे त्वरित विघटन करण्यास तसेच त्याचे वजन कमी करण्यास मदत करू शकते, असे दिसून आले आहे.

प्लास्टिक नष्ट करण्यास मदत करणाऱ्या अशा बुरशीची ओळख याआधीही झाली असली तरी त्यांचा प्लास्टिक तोडण्याचा वेग कमी होता. अशा परिस्थितीत, शास्त्रज्ञांनी शहरी कचऱ्याच्या ढिगांवर तसेच दूषित पाण्यात तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या तुकड्यांवर आढळलेल्या ३३ बुरशीच्या प्रजातींचे परीक्षण केले आहे. याद्वारेच प्लास्टिकचा जलद नाश होण्यास मदत होणारी बुरशी ओळखली जाते. यासंबंधीच्या अभ्यासात २८ प्रकारच्या बुरशीमध्ये अत्यंत कमी घनतेचे पॉलीथिलीन (एलडीपीई) तोडण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे. चाचणीमध्ये ‘क्लाडोस्पोरियम स्फेरोस्पर्मम’ नावाच्या बुरशीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याचे समोर आले. हा शोध किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

प्लास्टिकमध्ये १६ हजारांहून अधिक रसायने आहेत. केवळ माणसांमध्ये नव्हे, तर उत्तराखंडच्या जंगलात हत्तींच्या शेणातही प्लास्टिकचे अंश सापडले. ही मोठ्या धोक्याची चिन्हे आहेत. आजही भारतातील ६७ टक्के ग्रामीण कुटुंबे प्लास्टिक कचरा जाळतात. असे असताना प्लास्टिकचे लवकर विघटन करणाऱ्या या बुरशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही बुरशी विघटनासाठी विशेष एंजाइम सोडते. त्यामुळे प्लास्टिकचे अतिसूक्ष्म तुकडे होतात. एकदा प्लास्टिकच्या तुकड्याची रचना कोलमडून त्यामध्ये भेगा, खड्डे आणि छिद्रे निर्माण झाली की पृष्ठभागही खडबडीत होतो. या बदलांमुळे प्लास्टिकच्या तुकड्यांचे वजन एका आठवड्यात १५.२ टक्क्यांनी कमी होते, तर ३१ दिवसांमध्ये त्यात तब्बल ५० टक्क्यांनी घट होऊ शकते. याचा अर्थ बुरशी प्लास्टिकचे तुकडे नष्ट करण्यास मदत करते. त्यामुळेच तिचा वापर वाढला, तर पृथ्वीवरील प्लास्टिक नष्ट करण्यास मोठी मदत होऊ शकेल, यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -