Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीWater Shortage : धक्कादायक! एकीकडे पाणीबाणी तर दुसरीकडे पाणी चोरी

Water Shortage : धक्कादायक! एकीकडे पाणीबाणी तर दुसरीकडे पाणी चोरी

शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली मोठी माहिती

मुंबई : मुंबईत उकाडा वाढत असताना मुंबईकरांवर आजपासून पाणीकपात (Mumbai Water Shortage) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या पाणीसाठा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच पाणीसाठ्याबाबतीत एक मोठी माहिती उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात मान्सून दाखल होण्यासाठी १० ते १२ दिवसांचा अवधी असताना सद्यस्थितीनुसार अप्पर वैतरणा धरणात वापरातील पाणीसाठा शून्य टक्क्यावर पोहोचला आहे. तर इतर ६ धरणांमध्ये केवळ ८ टक्के साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्यक्षात मान्सून सुरू होऊन या पावसाळी दिवसांमध्ये उपयुक्त साठ्यात सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.

पालिकेच्या निर्णयानुसार शहरात ३० मे पासून ५ टक्के आणि ५ जून पासून १० टक्के पाणीकपात लागू असेल. थोडक्यात पाणीकपातीच्या या टक्केवारीमध्ये वाढ होणार असून, नागरिकांपुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी राहण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

दिवसाढवळ्या पाण्याची चोरी

गेल्या दोन वर्षांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी मोठ्या प्रमाणात घटला असून, पालिका प्रशासनापुढे गंभीर पाणीप्रश्न उभा राहिला आहे. त्यातच शहर या परिस्थितीचा सामना करत असताना दुसरीकडे मुंबईतील विहिरींमधून लाखो कोटी रुपयांच्या पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यादेखत पाणीविक्रीचा हा काळा धंदा सुरू आहे. मुंबईतील अनेक भागांतील इमारतींमध्ये जुन्या विहिरी आहेत. या विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याची परवानगी असताना सर्रास या पाण्याची व्यावसायिक कारणासाठी विक्री होताना दिसत आहे.

शहरातील दोन विहिरींमधून ११ वर्षांमध्ये तब्बल ७३ कोटींच्या पाण्याची विक्री झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई महापालिका हद्दीमध्ये अशा तब्बल २१ हजार विहिरी आहेत त्यामुळे या पाणीविक्रीचा कारभार आणखी किती कोटींचा असेल, याकडेच आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -