जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वराबद्दलच्या चुकीच्या धारणा, निसर्गनियमांबद्दल अनभिज्ञता आणि त्याबद्दलचे एकंदरीत अज्ञान व इतर प्रचलित गैरसमजुती यांमुळे आज अनेक लोकांना स्वर्गात जाण्याची फार घाई असते. दहशतवादी लोकांना असे सांगितले जाते की, तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात गेलात की, तुम्हाला सर्व काही मिळेल. मात्र हे मेल्याशिवाय कळत नाही. जीवनविद्येने हा सिद्धांत मांडला आहे की, तुमची प्रत्येक कृती ही दुसऱ्याला सुख देणारी असली पाहिजे. कोणालाही दुःख होता कामा नये. तुम्हाला जर कोणाचे कौतुक करता येत नसेल, तर शांत राहा. ‘शुभ बोल रे नाऱ्या’ असे सांगितले जाते. विचार आपल्या मनात येतात, आपण कितीही म्हटले की, विचार बंद तरी असे विचार बंद करता येत नाहीत. विचारात तुम्ही इतके अडकता की बाहेर पडणे शक्य होत नाही.
आज माणसाला अनिष्ट विचार करायची एवढी सवय झालेली आहे की, त्याला आपण अनिष्ट विचार करतो, हे ही माहीत नाही. सहज तुमचे विचार चाललेले असतात, जसा श्वासोच्छ्वास चालू असतो. एक गेला की दुसरा आला, दुसरा गेला की तिसरा आला असे हे जे अनिष्ट विचार चाललेले असतात. हेच विचार माणसाच्या सर्व दुःखाचे मूळ आहे, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा एकच सिद्धांत जरी समजला, तरी मानवी जीवनात क्रांती होईल. मानवी जीवनात जर क्रांती घडवून आणायची असेल, तर हा एक सिद्धांत सर्व लोकांनी आचरणात आणला पाहिजे. १०० टक्के नाही जमलं, तरी १० टक्के तरी नक्कीच जमेल. सुरुवातीला १० टक्के मग २० मग ३० टक्के मग हळूहळू जमायला लागेल. एवढे जरी केले, तरी माणूस सुखी होईल, जग सुखी होईल.
आज लोकांना काय वाटते की, “संसार दुःखमूळ, चोहीकडे इंगळ.” , “संसारी सुख मानी तो एक पढतमुर्ख”, “संसाराच्या तापे मी तापलो मी देवा, करता या सेवा कुटुंबाची” असे म्हणणारे लोक संसार सोडतात. त्यांना संसाराचा ताप वाटत असतो. संसाराचा ताप का होतो? कारणीभूत कोण? “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” तू भारंभार मुलांना जन्म दिलास, तर तुला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवातही नाही, तर मग बुवाबाबांमध्ये ते कुठून असणार? मुलांची रांग लावणे पहिले थांबवा. मी नेहमी सांगत असतो की, आपल्या राष्ट्राची महत्त्वाची समस्या आहे-लोकसंख्या वाढ.भ्रष्टाचार कुठून आला? लोकसंख्या वाढीतूनच. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करायचे असेल, तर सर्वप्रथम लोकसंख्या वाढीवर नियंत्रण यायला हवे. हे का ते सांगतो. बाजारात वस्तूचा पुरवठा कमी व मागणी जास्त असेल तर काय होईल? महागाई वाढेल. तसेच लोकसंख्या वाढली की, टंचाई वाढते. महागाई वाढते व भ्रष्टाचार होतो.
एक काळ असा होता की, लोक जागा घ्यायला या, असे म्हणायचे. आम्ही पूर्वी गिरगावामध्ये आंगरेवाडीत राहायचो. तिथून दादरला आलो. तो माणूस आम्हाला जवळ जवळ ओढूनच घेऊन गेला. आता अशी जागा देतील? मिळतील? त्यावेळी मागणी कमी आणि पुरवठा जास्त होता. आता याला उपाय काय? आता लोकसंख्या किती आहे? पूर्वी मुंबईची लोकसंख्या केवळ ८ लाख एवढीच होती. आता तीच कोटींमध्ये आहे. आणखी किती वाढेल कोणास ठाऊक? अशा परिस्थितीत सामान्य माणूस भरडला जातो. यासाठी जीवनविद्या सांगते की, मुळाला हात घातला की, तुमचे सर्व प्रश्न सुटतील. हे करायचे की नाही, हे कोणाच्या हातात आहे, तर ते तुमच्याच हातात आहे. म्हणूनच ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’