Saturday, July 20, 2024
Homeक्राईमNagpur crime : नागपुरात महिलेला उडवणाऱ्या कारचालकाची केवळ नोटीस देऊन सुटका!

Nagpur crime : नागपुरात महिलेला उडवणाऱ्या कारचालकाची केवळ नोटीस देऊन सुटका!

नियमाप्रमाणे कारवाई केल्याचा नागपूर पोलिसांचा दावा

नागपूर : पुण्यात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांना चिरडल्याचे प्रकरण (Pune Car Accident) अवघ्या राज्याने उचलून धरलं आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापत असताना राज्याच्या इतर भागांतून देखील ‘हिट अॅण्ड रन’च्या (Hit and run) घटना सातत्याने समोर येत आहेत. पुणे अपघात प्रकरणात बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याबाबत सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. त्याच दरम्यान आता नागपुरातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. नागपुरात एक महिला मॉर्निंग वॉकला गेली असता एका कारचालकाने तिला उडवले आणि तो पळून गेला (Nagpur crime). या कारचालकाचा पोलिसांना २३ दिवसांनी शोध लागला, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याला केवळ नोटीस देऊन सोडलं आहे. तर महिलेची अवस्था सध्या गंभीर असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

घडलेल्या घटनेनुसार, नागपुरात ७ मे रोजी ममता आदमने या ४५ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मात्र, त्याच दरम्यान एका भरधाव गाडीने त्यांना मागून उडवले. त्यांची मदत न करता तो कारचालक तिथून पळून गेला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या शरीराची अनेक हाडे मोडली. शर्थीचे प्रयत्न करून, अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचवला. मात्र, अजूनही तीन महिने त्यांना अंथरुणावर राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे, अपघाताच्या तीन आठवड्यांनंतरही नागपूर पोलीस संबंधित कार आणि दोषी कारचालकाचा शोध लावण्यात यशस्वी ठरले नव्हते.

अखेर हा आरोपी कारचालक २३ दिवसांनी हाती लागल्यानंतर पोलिसांनी त्याला केवळ नोटीस बजावून त्याची सुटका केली आहे. या अपघातात नियमाप्रमाणे कारवाई केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. कायद्यात असलेली प्रक्रिया पूर्ण करून दोषी कारचालकाला नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ममता आदमने मात्र अंथरुणाला खिळून

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांना टप्प्याटप्प्याने दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीराची अनेक हाडे या अपघातात तुटली. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवला, मात्र प्रचंड वेदनेत ममता आदमने सध्याही अंथरुणाला खिळून आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील तीन महिने त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकणार नाहीत आणि चालूही शकणार नाहीत. पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -