मुंबई: टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेची सुरूवात १ जूनपासून होत आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एक वॉर्मअप सामना खेळणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेत ९ तास ३० मिनिटांचा फरक आहे. वेस्ट इंडिजमध्येही हेच आहे. भारतीय संघ आपले चारही लीग सामने अमेरिकेत खेळणार आहे. त्यामुळे लोकांना ही उत्सुकता आहे की भारतीयांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी आपली झोप खराब करावी लागेल का? किती वाजता वर्ल्डकपचे सामने सुरू होणार.
टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये एकूण ५५ सामने खेळवले जातील. स्पर्धेचा पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला जाईल. फायनलचा सामना २९ जूनला बारबाडोस येथील ब्रिजटाऊनच्या केनसिंग्टन ओव्हलमध्ये खेळवला जाईल. २० संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.
चारही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर ८साठी क्वालिफाय करतील. यानंतर पॉईंट्स टेबलमधील चौथ्या स्थानावरील संघ पहिल्या स्थानाच्या संघासोबत सेमीफायनलमध्ये लढेल. तर दुसऱ्या स्थानावरील संघ तिसऱ्या स्थानाच्या संघाशी लढेल. या दोन्ही सेमीफायनलमधील विजेते संघ फायनलमध्ये भिडतील.
भारतीय संघ ग्रुप स्टेजमधील आपले चारही सामने अमेरिकेत खेळत आहे. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये चार सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळणार आहे. वर्ल्डकपचे इतर सामने सकाळी ६ वाजता, रात्री ९ वाजता, सकाळी ५ वाजल्यापासून, रात्री उशिरा साडेबारा वाजता, रात्री १० वाजल्यापासून आणि रात्री १०.३० वाजल्यापासून खेळवले जातील.