
आपल्या मातीतला व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील मतदानाचा (Voting) शेवटचा टप्पा पार पडला आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांचे कुटुंबिय शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjayt Raut) देखील लंडनला रवाना झाले. त्यामुळे यांचं महाराष्ट्रप्रेम बेगडी आहे, अशी टीका सत्ताधार्यांनी केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सातारा (Satara) जिल्ह्यातील दरे या आपल्या गावचा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. 'परदेशी कशाला जायचं? गड्या आपला गाव बरा!', असं कॅप्शन देत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना परदेश दौर्यावरुन डिवचलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. तीन दिवस ते साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी मुक्काम करणार आहेत. या गावभेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गावातील शेतीची पाहणी केली. या गावभेटीचा सुंदर व्हिडिओ त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री त्यांच्या शेतीत रमल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या शेतातील आंबा, फणसाच्या फळबागा, भाज्यांचे मळे तसेच पशुपालनाची पाहणी करत त्याची माहिती घेताना दिसत आहेत. "परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी,वसे जिथे विठूरायाची पंढरी," असा सुंदर कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिला आहे.
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी...
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला… pic.twitter.com/hD5NY0vYey
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2024
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
"लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते", अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.