तीन दिवसांत कारवाई करणार असल्याचा शंभूराज देसाई यांचा इशारा
पुणे : पुणे अपघात प्रकरणी (Pune Accident) सध्या राज्यभर वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, अंधारे व धंगेकर यांनी पुण्यातील एक्साईज कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी, मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांचेही नाव घेतल्याने आता मंत्री महोदयांनी इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील ७२ तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.
रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी उत्पादक शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चक्क भ्रष्टाचारी हफ्त्याचं रेटकार्डच वाचून दाखवलं होतं. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यावर, आता उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई आक्रमक झाले आहेत. मंत्री देसाई म्हणाले की, विधानसभा सदस्य पुणे रविंद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे शासकिय कार्यालयात जाऊन जाब विचारला. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलिस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, आंदोलन करताना खोक्यावर व हातात पैसे घेऊन आंदोलन केले. माझा फोटो त्यावर होता, मला ते व्हिडिओ आले मी प्रवासात पाहिलं. त्यामुळे, मी त्यांना नोटीस बजावणार आहे.
पुढे ते म्हणाले, यापूर्वी ललित पाटील प्रकरणात माझं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं. त्याचवेळी मी स्पष्ट केलं होतं की अंधारे यांनी वक्तव्य मागे घ्यावे. त्यांनी ते मागे घेतलं नाही. सध्या पाटण कोर्टात याप्रकरणी तारीख पडत आहे. न्यायालयाची सुट्टी संपली की मी कोर्टाला विनंती करणार आहे की, लवकरच ललित पाटील प्रकरणी तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकून घ्यावी.
ही केस पाटण न्यायालयात असताना अंधारे यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला, त्यामुळे अवमानकारक याचिका प्रलंबित असताना परत परत उल्लेख करून न्यायायलयीन प्रक्रियेला जुमानत नाही असं दाखवून दिलं आहे. आजच माझ्या वकिलांच्या मार्फत नोटीस बजावली आहे. या प्रकरणात माझा उल्लेख केला आहे, याबाबतीत विधान मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई केली जाईल. केवळ स्टंटबाजी सुरू आहे. त्यांनी तीन दिवसांत यात खुलासा केला नाही तर ललित पाटील प्रकरणात कायदेशीर कारवाई न्यायालयात केली तसंच या बाबतीतही कारवाई करेन, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.