Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीNashik Water Crisis : नाशिककरांवर दुष्काळ! नागरिकांना भोगावी लागतेय पाण्याची चणचण

Nashik Water Crisis : नाशिककरांवर दुष्काळ! नागरिकांना भोगावी लागतेय पाण्याची चणचण

महिन्यातून केवळ एकाच दिवशी होतोय पाणीपुरवठा

नाशिक : नागरिकांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीबाणीच्या (Water Shortage) तीव्र संकटांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यासह (Marathwada) नाशिकमध्येही (Nashik) पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस आणखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. शहरातील काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे.

मनमाडला महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा

पाणीटंचाईचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडकरांना याही वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ २० ते २२ दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे.

पेठ तालुक्यात भीषण पाणी टंचाई

पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून ८५ कामे सुरू आहेत. त्यामधील ७७ कामे ही निर्धारित मुदत संपूनही पूर्ण झाली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तर वाड्या -वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळत आहे. त्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याचे आगमन होईपर्यंत नाशिककरांना तीव्र पाणीटंचाईच्या समस्या पार कराव्या लागत आहेत. नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी जलजीवन योजनेच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. मात्र मुदत संपूनही ते काम पूर्ण झालं नसल्यामुळे जलजीवन योजनेचे पाणी मुरते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -