Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणची पोरं हुशारच, यशाचा कोकण पॅटर्न...!

कोकणची पोरं हुशारच, यशाचा कोकण पॅटर्न…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक १०वी आणि १२वीच्या परीक्षेमध्ये कोकण विभागाने महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. कोकण विभागातील मुलांनी यशस्वितेत सलगता ठेवली आहे. गेले तेरा वर्षे सातत्याने हे यश प्राप्त केले जात आहे. १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांच्या यशस्वितेचा हा कोकण पॅटर्न तयार झाला आहे. गेल्या काही वर्षांत मुलांनी १०वी, १२वीच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळविले यावरच बरच काही अवलंबून होऊ लागले आहे. परीक्षेत मिळविल्या जाणाऱ्या गुणांना अधिक महत्त्व दिलं जाऊ लागलं. मुलांच्या हुशारीचं मोजमाप हे गुणांमध्ये होऊ लागले. पुढील शिक्षण घेण्यासाठीही हीच गुणवत्तेची यादी लागते. यामुळे आपला मुलगा-मुलगी परीक्षेत पास झाली याचं कौतुक वाटण्याचे आजचा काळ नाही. मुलांनी परीक्षेत किती गुण मिळवले, यावरच त्या मुला-मुलींचं भवितव्य अवलंबून आहे. असा समज असण्याचा हा काळ आहे. यामुळे पूर्वीचे ४५, ५०, ६० टक्के मिळवणारे अभिमानाने गावभर पेढे वाटत हिंडायचे.

अख्या गावात पास होण्याचे कौतुक असायचं. याचं कारणही तसंच होतं. आई-वडिलांच्या शेती कामात मदत करत शिक्षण घेणारी मुलं होती. त्यामुळे पालक म्हणून त्यांच्याही अपेक्षा तितक्याच मर्यादित होत्या. त्यातही कोकणात पूर्वी फक्त डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशांचीच मुलं शिक्षणासाठी कोकणाबाहेर जाऊन शिक्षण घेत; परंतु आज कोकणातही मुलांना शिक्षणाच्या सहज संधी उपलब्ध आहेत. पुढील शिक्षण घेण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत; परंतु पूर्वी यातल्या कोणत्याच संधी नव्हत्या. पन्नास वर्षांपूर्वी डी.एड.बी.एड् कॉलेजही एखाद, दुसरच होतं. यामुळे शिक्षक सर्वच पश्चिम महाराष्ट्रातून यायचे. आज बी.एड.डी.एड. बंद करावी लागावीत एवढी संख्या डी.एड.बी.एड. कॉलेजची आहे. इंजिनीअरिंग कॉलेजही झाली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आजचा कोकणातील शैक्षणिक उपलब्ध संधीचा विचार करत असताना अगदी मेडिकल कॉलेजही उपलब्ध आहेत.

कोकणात १०० टक्के १०वी आणि १२वीच्या परीक्षेचा निकाल लागतो. याचं निश्चितच कौतुकच आहे. ज्या शाळांचे १०० टक्के निकाल लागतात, त्या शाळा अभिनंदनास पात्रच आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १०वीला एकूण १७,९९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १७७८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९८.८५ टक्के इतका लागला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८,७८८ विद्यार्थी १०वीच्या परीक्षेत बसले होते. यातील ८,७३१ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.३५ टक्के इतका लागला. कोकणात १०वी, १२वीच्या निकालामध्ये प्रथम क्रमांकावर राहण्याचे यावर्षीचे हे १३वे वर्षं आहे. यशातलं सातत्य राखणं वाटतं तेवढं सोपं नसतं. सलगता जपण्यात कोकण यशस्वी झाले आहे. १०वी, १२वी मध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन! महाराष्ट्रात कोकण अव्वलस्थानावर आल्याने गेल्या काही वर्षांत कोकणचा पॅटर्न तयार झाला आहे.

१०वी आणि १२वीमध्ये विशेष प्रावीण्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फारच कमी विद्यार्थी पुढील शिक्षणात चमकलेले दिसत नाहीत. यूपीएससी, एमपीएससी या अवघड ठरणाऱ्या शिक्षणाकडे तर अगदी बोटावर मोजता येईल इतकीच संख्या आहे. मात्र, इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेणारा विद्यार्थी किंवा इथल्याच माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थींनीही यूपीएससीमध्ये यश मिळवले आहे; परंतु दोन-पाच जणच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनेकवेळा अनेकांच्या एक चर्चेचा विषय झालेला असतो. १०वी, १२वीच्या परीक्षेत एवढे गुण मिळविणारे विद्यार्थी पुढे काय करतात. पुढील जीवनात ते वेगळ्या वाटेने प्रवास का? करत नाहीत असे या अानुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतात. याचं कारण पुढील शिक्षण घेऊन हे विद्यार्थी पुढे कधी महत्त्वाच्या जागांवर दिसत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील गावच्या-गाव एमपीएसीच्या परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक, डीवायएसपी, तहसीलदार, प्रांत या पदावर कार्यरत दिसतात; परंतु कोकणातील तरुणांना जिल्हाधिकारी, प्रांत, डीवायएसपी या पदांवर का लक्ष नसतं हेच कधी समजून येत नाही.

डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरचं झालं पाहिजे हा आजही अट्टहास असतो. याचे कारण डॉक्टरांनी उभी केलेली हॉस्पिटलं वारसा म्हणून चालवली गेली पाहिजेत. त्यामुळे वेगळ्या वाटेने जाणाऱ्यांची संख्या कमीच होत जाते. १०वी आणि १२वीच्या निकालानंतर सर्वसामान्यपणे कोकणातील मुलांचा वैचारिक गोंधळ उडतो. ज्यांनी १०वीपासूनच पुढे काय व्हायचं, काय करायचं हे ठरवलेलं असेल तर त्याची दिशा निश्चित असल्याने तो विद्यार्थी ठरविलेल्या मार्गाने प्रवासाला सुरुवात करतो; परंतु अशा विद्यार्थ्यांची संख्याही फारच कमी असते. गेल्या वीस वर्षांपूर्वी १०वी आणि १२वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय नेते असलेले नारायण राणे यांनी सामाजिक जाणिवेने आणि शैक्षणिक क्षेत्रात कोकणचा असलेला मागासलेपणा दूर व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या गुणगौरव सोहळ्यातून शेकडो विद्यार्थ्यांच्या अंगावर पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारे प्रोत्साहन देणारी ऊब निश्चितच मिळत गेली.

सकारात्मक शैक्षणिक वातावरण निश्चितपणे तयार होत गेले. गेल्या काही वर्षांत जे सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार होत गेले, त्यामागेही या अशा सामाजिक संस्थांचा निश्चितच मोठा वाटा आहे. कोकणी माणसाच्या स्वभावगुणात धाडस नसते. त्यामुळे विद्यार्थी पुढे काय करायचे या विवंचनेत सापडतो. पुढे काय करायचे या प्रश्नाभोवतीच तो घुटमळत राहतो. यश-अपयशाचे मेळ मांडण्यात तो गुंतून जातो. एकीकडे ज्यांना उंच भरारी घेण्याची इच्छा असते, त्यांच्या पाठीशी कोणी नसतं. आई-वडिलांची बेताचीच आर्थिक परिस्थिती यामुळे अनेकवेळा पुढे जाण्याच्या संधी खुणावत असतानाही, इच्छा असूनही पुढे जाता येत नाही, अशी उदाहरणेही बरीच आहेत. जर-तरच्या गर्तेत सापडतात. काय करावं या प्रश्नाचं उत्तरही त्यांना सापडत नाही. यामुळेच १०वी आणि १२वीच्या यशस्वितेनंतर यांचे पुढे काय होते, पुढे काय करतात या प्रश्नांची चर्चा होतच राहते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -