ज्ञानदेवांनी प्रत्येक ओवीचे मोजक्या शब्दांत अर्थ मांडले आहेत. ते पुढीलप्रमाणे ‘व्याळा कां हारा। वरपडा झालेया नरा। हरिखु आणि दरारा। सरिसाचि उठी॥’ ‘व्याळ’ शब्दाचा अर्थ आहे साप, तर ‘हरिखु’चा अर्थ आनंदून जाणं. हे वर्णन किती नाट्यमय! एखाद्या माणसाने नीलमण्यांचा हार समजून आनंदून जावं आणि हात लावताक्षणी तो साप आहे, हे समजल्याने घाबरून जावं! असं हे भावनांचं नाट्य आहे. हे माणसाच्या मनोवृत्तीचं दर्शन आहे.
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
सर्प असूनही तो नीलमण्यांचा हार आहे. या भावनेने हर्ष होतो आणि त्यास हात लावताक्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन, लागलीच भीती उत्पन्न होते.
त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते.’ ओवी क्र. ४८९
‘व्याळा कां हारा। वरपडा झालेया नरा।
हरिखु आणि दरारा। सरिसाचि उठी॥ ओवी क्र. ४८८
ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायात आलेल्या या अद्भुत ओव्या! ज्ञानेश्वरी हा एकीकडे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ. दुसऱ्या बाजूने तो अप्रतिम काव्यग्रंथ सुद्धा आहे. ज्ञानदेवांच्या अलौकिक प्रतिभेने म्हणून यात अशा छान ओव्या सापडतात. एखाद्या खाणीतून माणिक, मोती, पाचू अशी अनेक रत्नं सापडावी; त्याप्रमाणे यात शब्दलावण्य, कल्पनासौंदर्य, नादमयता अशी असंख्य रत्नं मिळतात. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणून जणू तत्त्वज्ञान आणि काव्याची पदवी म्हणावी असा होतो.
आता वरील ओव्यांचा विचार करूया. सांगायचा विषय आहे की, एखादं कर्म कसं घडतं? त्याला कारणीभूत असतो कर्ता आणि कारण. हा कर्ता कसा वागत असतो? तर प्रिय वस्तू पाहिल्यावर ती हवीशी वाटणं. अप्रिय गोष्ट दिसल्यावर, ती नकोशी वाटणं. हे तत्त्व समजावण्यासाठी ज्ञानदेवांनी दिलेलं उदाहरण सर्प आणि हार यांचं. ते चपखल आहे. पुन्हा त्यासाठी त्यांनी वापरलेली शब्दयोजना पाहावी, समजून घ्यावी अशी.
कवितेची शक्ती नेमकी कशात असते? त्यातील कल्पकता, शब्दसुंदरता, मोजक्या शब्दांचा वापर, नादमयता इ. सर्वांत असते. ज्ञानदेवांच्या प्रत्येक ओवीत हे सारे गुण अगदी तुडुंब भरलेले आहेत. आता वरच्या ओवीतील शब्दांचा वापर पाहा ना! किती मोजक्या शब्दांत सारा अर्थ मांडला आहे. ‘व्याळा कां हारा। वरपडा झालेया नरा। हरिखु आणि दरारा। सरिसाचि उठी॥’
‘व्याळ’ शब्दाचा अर्थ आहे साप, तर ‘हरिखु’चा अर्थ आनंदून जाणं. हे वर्णन किती नाट्यमय! एखाद्या माणसाने नीलमण्यांचा हार समजून आनंदून जावं आणि हात लावताक्षणी तो साप आहे हे समजल्याने घाबरून जावं! असं हे भावनांचं नाट्य आहे. हे माणसाच्या मनोवृत्तीचं दर्शन आहे.
हे नाट्य मांडताना वापरलेले शब्द आहेत हरिखु आणि दरारा. ‘हरिखु’ म्हणजे हरखून जाणं. या शब्दांत विलक्षण सुंदरता आहे. कारण आनंदाची ही नेमकी छटा यातून जाणवते. तसेच ‘दरारा’ शब्दही अर्थघन आहे. ‘भीती’, ‘भय’ हे शब्द सामान्य वाटतात. तेच ‘दरारा’ या शब्दातून भयाची भावना अचूक कळते. जसं एखाद्या कडक माणसाचा, पोलीस अधिकाऱ्याचा असतो तो दरारा. यात ‘हरिखु’ आणि ‘दरारा’ या दोन शब्दांच्या मेळातून त्याच्यातील विरोध मनापर्यंत पोहोचतो आणि ठसतो. त्यामुळे यातून सांगायचं तत्त्वज्ञानही स्पष्ट, ठसठशीत होतं. अशा प्रकारे ज्ञानदेव ‘ज्ञानेश्वरी’तून आपल्या बुद्धीला वळण लावतात आणि त्याचबरोबर सुंदर काव्याची दृष्टी देतात.
manisharaorane196@ gmail.com