कन्याकुमारी (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारी येथे विवेकानंद रॉक मेमोरियल येथे १ जूनपर्यंत ध्यानधारणा करण्यासाठी दाखल झाले आहेत. विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रथम शहरातील भगवती अम्मान मंदिरात पूजा केली. स्वामी विवेकानंद यांना ‘भारतमाते’विषयी दिव्य दर्शन झाले होते, असे मानले जाणारे ध्यानमंडपम येथे मोदी गुरुवारी सायंकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान धारणा करतील. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून त्यांच्या मुक्कामादरम्यान २००० पोलीस तैनात राहणार असून, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाचाही चोख बंदोबस्त असणार आहे.
गुरुवार ते शनिवार या कालावधीत हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींना नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट कमी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कन्याकुमारीला पोहोचले. येथे त्यांनी भगवती देवी अम्मन मंदिरात (कन्याकुमारी मंदिर) दर्शन आणि पूजा केली. तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा पुतळाही ते पाहतील. पंतप्रधान मोदी १ जूनच्या संध्याकाळी दिल्लीला रवाना होऊ शकतात.
निवडणुकांची घोषणा झाल्यापासून नरेंद्र मोदींनी प्रचारसभा, रॅली, रोड शोंचा धडाका लावली होता. बिहारच्या जुमई येथून मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. गेल्या ७५ दिवसांत मोदींनी २०० पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शोमधून जनतेला संबोधित केले आणि विविध न्यूज चॅनेल्सला मिळून ८० मुलाखती केल्या आहेत. निवडणुकांच्या घोषणेपूर्वी मोदींनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १५ रॅली केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात १८ सभा घेतल्या आहेत. नरेंद्र मोदींनी पंजाबच्या होशियारपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यानंतर, पुढील दोन दिवस ध्यान साधना करण्यासाठी पंतप्रधान मोदी कन्याकुमारीला रवाना झाले.