आयुष्यात वेळेवर यू टर्न घ्या!

Share

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

समुपदेशन करताना अनेक वेगवेगळ्या केसेस हाताळल्या जातात. अनेक लोक असतात ज्यांना स्वतःच्या चुका सुधारायच्या असतात, स्वतःचे आयुष्य बदलायचे असते, त्यांनी घेतलेले काही चुकीचे निर्णय, केलेल्या काही चुकीच्या गोष्टी, त्यामुळे भोगलेले वाईट परिणाम, त्यातून झालेले नुकसान भरून काढायचे असते. खूप लोकांना समुपदेशन केल्यामुळे, त्यांनी स्वतः ठरवल्यामुळे अथवा त्यांच्या जवळच्या अथवा कुटुंबातील लोकांनी समजावल्यामुळे, स्वतः काही गंभीर परिणाम भोगल्यामुळे चुकीच्या त्रासदायक परिस्थितीमधून बाहेर येण्याची मनापासून इच्छा असते.

काही जणांना आपण चुकलो होतो हे समजायला आयुष्य निघून जाते, तर काही जण एका अनुभवातून शहाणे होऊन स्वतःचा रस्ता ताबडतोब बदलून घेतात, स्वतःला बदलून टाकतात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही वेळी आपण बदलू शकतो, बदल घडवू शकतो, परिस्थिती चांगली करू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. चुकीच्या लोकांना, चुकीच्या सवयींना, चुकीच्या व्यवहारांना, वाईट गोष्टींना आयुष्यातून हद्दपार करता येऊ शकतं. खूपदा लोक म्हणतात खूप उशीर झाला, आता काही फायदा नाही, पहिलंच असं करायचं नव्हतं, आधीच असं करायला हवं होतं इत्यादी इत्यादी. जे झाले, होऊन गेले ते आपण बदलू शकत नसतो, पण जे आपल्या हातात आज आहे, आता आहे ते मात्र आपण ठरवलं तर निश्चित बदलू शकतो.

कोणीही आज परत परत तीच चूक करत आहे किंवा अजून चुकीच्या दिशेने प्रवास सुरूच आहे, तर त्या व्यक्तीने अशा प्रवासात अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून यू टर्न नक्कीच घ्यावा. अनेकदा आपल्या हातून घडलेल्या चुका, आपल्या आजूबाजूला तयार झालेली चुकीची परिस्थिती, आपले फसलेले आर्थिक व्यवहार, आपण ज्यांच्यात अडकलोत ती चुकीची माणसं आपल्या घरातील लोकांना माहिती नसतात. अनेकदा आपल्याही कळत-नकळत आपण चुकीचा मार्ग निवडलेला असतो, ज्याची जाणीव उशिरा होते. आपण एकटेच त्रासातून जात असतो, एकटेच परिस्थितीशी लढत असतो, प्रचंड मानसिक तणाव घेत असतो आणि आता वेळ निघून गेली आहे, आता काहीच करता येणार नाही म्हणून हतबल झालेलो असतो. परिस्थिती कितीही बिकट असली, आपण कितीही फसलेलो, गुंतलेलो असलो तरी आपली त्यातून बाहेर पडण्याची जिद्द असेल, तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. खूपदा कळतंय पण वळत नाही अशी लोकांची अवस्था असते. आपण चुकतोय, चुकीच्या दिशेने चाललोय, आपलं नुकसान होणार आहे हे माहिती असून सुद्धा केवळ माघार आणि कमीपणा घ्यायचा नाही, चूक कबूल करायचीच नाही म्हणून लोक चुकीच्या दलदलित अधिकाधिक फसत जातात.

एक पाऊल चुकीचं पडलं म्हणजे पुढील सगळीच पावले चुकीचीच टाकायची अथवा चुकीचीच पडतील असे अजिबात नाही. आयुष्यात यू टर्न घेताना आवश्यकता आहे ती फक्त प्रचंड इच्छाशक्तीची, आपल्या कुटुंबातील लोकांवर, अत्यंत विश्वासू आणि जवळच्या लोकांवर विश्वास ठेवून हिंमतीने त्यांना आपल्याकडून झालेल्या चुका, ओढवलेली परिस्थिती, बिघडलेली मानसिकता, चुकलेली आर्थिक गणितं काहीही न लपवता स्पष्ट सांगण्याची. कोणत्याही नको त्या चुकीच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्वतःला गुरफटून घेतलं असेल, त्यातून माघारी फिरणं त्रासदायक होत असेल अथवा कोणाच्या उपकाराच्या दबावाखाली तुम्ही दबलेले असाल, कोणतीही चिंता तुम्हाला जाळत असेल, तर स्वतःला बदला, खोट्या अहंकार आणि अट्टहासापोटी अजून गंभीर आणि आपल्यासोबतच सगळ्यांनाच त्रासदायक ठरतील अशा घटना आयुष्यात घडू देवू नका.

आयुष्य दररोज नवीन संधी देत असते पण आपण आपल्याच धुंदीत जगत असल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. माघारी फिरणं, रस्ता बदलणं त्यासाठी थोडं झुकावं लागलं, नमतं घ्यावं लागलं, वाकावं लागलं, माघार घ्यावी लागली, थोडा अपमान सहन करावा, चार शब्द ऐकावे लागले तरी त्यामुळे आपल्या भविष्यातील अडचणीत वाढ होण्यापेक्षा परिस्थिती वेळीच सावरली जाईल. अनेक चुका आपण जाणूनबुजून केलेल्या असतात, केवळ मनमानी म्हणून करत असतो. खूप चुका परिणाम माहिती असून सुद्धा केलेल्या असतात. आपल्या लेखी त्या चुका नसतातच मुळी! कारण आपण स्वतःला जगावेगळं काहीतरी समजत असतो, आपल्याला फाजील आत्मविश्वास असतो आणि दुनियेच्या विरोधात जाऊन वेगळं काहीतरी करणं म्हणजे खूप काही धाडस केलं असा आपला समज असतो.

आपण स्वतः आपल्याशी संबंधित आणि अवलंबून असलेल्या सगळ्यांसाठी, कुटुंबासाठी, समाजात वावरताना जे नीतिमत्तेला, माणुसकीला, जगराहटीला सोडून असतं ते चुकीचंच असतं पण आपलं मन ते स्वीकारत नसतं. आपण चुकलोय, चुकू शकतो, आपण विनाशाकडे जातोय हेच आपल्याला स्वीकारताना त्रास होतो. अशा मानसिकतेमुळे हातून अधिक चुका घडत जातात. एक चूक लपवायला दुसरी, दुसरी लपवायला तिसरी अशी चुकांची मालिका सुरूच राहते.
आपलंच खरं करण्याच्या नादात आपण वर्षानुवर्षे, दिवसेंदिवस चुकीच्या दिशेने चालत राहतो, आपल्यावर खरं प्रेम करणाऱ्यांची, आपली काळजी करणाऱ्या, आपल्यासोबत चालणाऱ्यांची पण फरफट आपण करत राहतो, पण वेळीच यू टर्न घेत नाही.

भविष्यात वैयक्तिक आपल्याला होणारा त्रास, पश्चाताप, आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांना होणारा त्रास, अपमान, मनस्ताप, आर्थिक नुकसान, कुटुंबातील पुढील पिढीचे आयुष्य, मुलांचे भविष्य, आपली समाजातील इज्जत, प्रतिष्ठा, पत, आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनी कमवलेला नावलौकिक, केलेली प्रगती यातील कशाला पण आपल्यामुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या निर्णयामुळे धक्का लागणार असेल, तर नक्कीच लवकरात लवकर यू टर्न घ्या आणि योग्य मार्गाला लागा. वेळ निघून गेली असे कधीही समजू नका.
meenonline@gmail.com

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago