
अवघ्या काही तासात मिळवले लाखो व्ह्यूज
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (Tollywood) प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2: The Rule) या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटाचं टायटल साँग लाँच केलं होतं. त्या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या पुष्पा २ मधील दुसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचं नाव ‘अंगारों’ असं आहे (Angaaron Lyrical Video). हे चित्रपटातील रोमँटिक गाणं आहे. या गाण्याचा आज लिरिकल व्हिडीओ प्रदर्शित झाला असून यामध्ये गाण्यांचं मेकिंग दाखवण्यात आलं आहे. विशेषत: या व्हिडीओमधील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हटके हूक स्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
तीन तासात मिळवले लाखो व्ह्यूज
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायलं आहे. तर रकीब आलम यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच ‘अंगारों’ गाण्याच नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेलं ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील हे गाणं आता युट्यूबवर ट्रेंड होत आहे. या गाण्याला अवघ्या तीन तासांत ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
&authuser=0
६ भाषांमध्ये गाणं रिलीज
निर्मात्यांनी चित्रपटातील हे नवं गाणं ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज केलं आहे. तेलुगुमध्ये 'सुसेकी', हिंदीमध्ये 'अंगारो', मल्याळममध्ये 'कंडालो', कन्नडमध्ये 'नोडोका', तमिळमध्ये 'सूदाना' आणि बंगालीमध्ये 'अगुनेर' असं या गाण्याची शीर्षक आहेत.
दरम्यान, रश्मिका मंदाना हिनं तिच्या इन्स्टाग्रामवर या गाण्याचं पोस्टर शेअर करत गाण्याविषयी सांगितलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे गाणं तिच्यासाठी खूप खास आहे, ज्यावर संपूर्ण देश नाचू शकेल याची तिला खात्री वाटते.