राजकीय पक्षांना नकोत मुस्लीम उमेदवार…

Share

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने केरळमधून एकमेव मुस्लीम उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभा केला आहे. भाजपाचा एनडीएमधील मित्रपक्ष असलेल्या बिहारमधील नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षानेही एकच मुस्लीम उमेदवार दिला आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सपा, राजद, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय (एम) या स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या प्रमुख विरोधी पक्षांनी मिळून देशभरात ७८ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ११५ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती, यंदा ही संख्या ७८ वर घसरली आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २६ मुस्लीम खासदार निवडून आले होते. त्यात काँग्रेस व तृणमूल काँग्रसचे प्रत्येकी चार होते. प्रत्येकी तीन मुस्लीम खासदार होते सपा व बसपचे. राष्ट्रवादी काँग्रेस व सीपीआय (एम)चा प्रत्येकी एक मुस्लीम खासदार होता. अन्य मुस्लीम खासदार हे एआययूडीएफ (आसाम), लोकजनशक्ती (पासवान), आययूएमएल आणि जम्मू – काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे होते. यंदाच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मायवतींच्या बसपने ३५ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक मुस्लीम उमेदवार मायावतींनी दिले आहेत. त्यातले १७ उमेदवार हे उत्तर प्रदेशमधून लढत आहेत. चार मध्य प्रदेशमधून, प्रत्येकी तीन बिहार व दिल्लीतून, दोन उत्तराखंडमधून तसेच राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, तेलंगणा, गुजरात व पश्चिम बंगालमधून प्रत्येकी एक मुस्लीम उमेदवार बसपच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात आहे.

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत बसपने ३९ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती, पैकी केवळ तिघेच खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा सपाबरोबर आघाडी करून बसपने निवडणूक लढवली होती. बसपने २०१४ मध्ये लोकसभेच्या ५०३ जागांवर उमेदवार उभे केले व त्यात ६१ उमेदवार मुस्लीम होते. मोदी लाटेत तेव्हा बसपचा एकही मुस्लीम उमेदवार निवडून आला नव्हता. यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपने ४२४ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. दहा वर्षांपूर्वी ६१ मुस्लिमांना उमेदवारी देणाऱ्या बसपने यंदा ३५ मुस्लिमांनाच निवडणुकीला उभे केले आहे. मायावतींनाही मुस्लिमांना उमेदवारी देताना कपात करण्याची पाळी आली. यंदाच्या निवडणुकीत बसपने उत्तर प्रदेशात १७ मुस्लीम उमेदवार दिले असले तरी २०१९ मध्ये केवळ सहा मुस्लीमच उभे केले होते. तेव्हा सपाबरोबर बसपने आघाडी केली होती. मुस्लिमांची मोठी व्होट बँक ही सपाकडे तेव्हाही होती व आजही आहे. यंदाच्या निवडणुकीत बसप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दलित-मुस्लिमांची मते खेचून त्याचा तोटा इंडिया आघाडीला व लाभ भाजपाला होणार आहे, असे इंडिया आघाडीचे नेते उघड बोलत आहेत. भाजपाला मदत व्हावी असे मायावती राजकारण करीत आहेत, असा आरोप इंडिया आघाडीने केला आहे.

काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. त्यातले सहा उमेदवार पश्चिम बंगालमध्ये आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दोन मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच कर्नाटक, केरळ, ओडिशा, तेलंगणा व लक्षद्वीपमध्ये काँग्रेसचा एक मुस्लीम उमेदवार आहे. काँग्रेस हा मुस्लीमधार्जिणा पक्ष आहे, मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष आहे, अशी जोरदार टीका २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने केली होती, तेव्हाही काँग्रेसने ३५ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. त्यातले १० मुस्लीम उमेदवार हे पश्चिम बंगालमध्ये, तर ८ मुस्लीम हे उत्तर प्रदेशात होते. काँग्रेसच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत चारच मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते. सन २०१९ मध्ये काँग्रेसने देशभर ४२१ लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, यंदा २०२४ मध्ये काँग्रेसने ३२८ मतदारसंघांतच आपले उमेदवार उभे केले आहेत.

मुस्लिमांना सर्वाधिक उमेदवारी देणारा काँग्रेसनंतरचा तृणमूल काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. तृणमूल काँग्रेसने सहा मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे, पैकी ५ जण पश्चिम बंगालमध्ये लढत आहेत. तृणमूल काँग्रेसने आसाममध्येही एक मुस्लीम उमदेवार उभा केला आहे. सन २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल, ओडिशा, त्रिपुरा, आसाम व बिहारमध्ये १३ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. पैकी चार जण खासदार म्हणून विजयी झाले. सन २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसने एकूण २४ मुस्लीम उमेदवार उभे केले होते, पैकी केवळ तीनच विजयी झाले. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा जागा लढविण्याचा आलेख सतत घसरत चालला आहे. सुरुवातीला लोकसभेच्या १६१ जागा लढवल्या, नंतर ६२ जागा लढवल्या, यंदा २०२४ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस ४८ जागा लढवत आहे.

उत्तर प्रदेशात मुस्लिमांची व्होट बँक समाजवादी पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभी असतानाही यंदा २०१४ च्या निवडणुकीत सपाने केवळ ४ मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. २०१९ च्या तुलनेने ही संख्या निम्मी आहे. तेव्हा केवळ तीनच मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते. २०१४ मध्ये तर सपाचा एकही मुस्लीम उमेदवार मोदी लाटेत विजयी होऊ शकला नव्हता. सपाने २०१४ मध्ये १९७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. २०१९ मध्ये केवळ ४९ मतदारसंघांत लढत दिली. यंदा २०२४ मध्ये ७१ मतदारसंघांत सपा मैदानात आहे. या वर्षी सपाचे तीन मुस्लीम उमेदवार उत्तर प्रदेशातून व एक मुस्लीम उमेदवार आंध्र प्रदेशातून उभा आहे. सपाने यंदाच्या निवडणुकीत यादव उमेदवार जास्त उभे केले आहेत. मावळत्या लोकसभेतील मुरादाबादमधील खासदार एस. टी. हसन यांना उमेदवारी नाकारून सपाने त्या मतदारसंघात हिंदू उमेदवार उभा केला आहे. २०१९ मध्ये सपाने महाराष्ट्रातून तीन मुस्लिमांना तिकिटे दिली होती. यंदा २०२४ मध्ये महाराष्ट्रातून माघार घेणे पसंत केले.

लालू प्रसाद यादव यांच्या राजदने बिहारमध्ये नेहमीच यादव-मुस्लीम व्होट बँक जवळ बाळगून राजकारण केले. राजदने यंदाच्या निवडणुकीत दोनच मुस्लिमांना तिकिटे दिली आहेत. २०१९ मध्ये राजदने ५ मुस्लीम उमेदवार उभे केले होते, पैकी एकही तेव्हा निवडून आला नाही. २०१४ मध्ये राजदने ६ मुस्लिमांना तिकिटे दिली व एकच निवडून आला. बिजू जनता दलाने गेल्या २०१४, २०१९ च्या निवडणुकीत एकही मुस्लीम उमेदवार उभा केला नव्हता आणि यंदा २०२४ च्या निवडणुकीतही एकही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षानेही यंदा २०२४ मध्ये एकही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. २०१९ मध्येही या पक्षाने एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नव्हते. २०१४ मध्ये मात्र वायएसआर काँग्रेसने ३८ उमेदवार उभे केले होते, त्यात तिघे मुस्लीम होते. २०१४ मध्ये वायएसआर काँग्रेसचे ९ खासदार निवडून आले, पण एकही मुस्लीम विजयी झाला नाही.

तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीने यंदा एकही मुस्लीम उमदेवार दिलेला नाही. २०१९ मध्येही या पक्षाने एकही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. सन २०१४ मध्ये त्यावेळच्या तेलंगणा राष्ट्र समितीने १७ उमेदवार उभे केले, त्यात दोन मुस्लीम होते, पण एकही मुस्लीम विजयी झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१९ मध्ये तीन मुस्लीम उमेदवार उभे केले होते. पैकी एक खासदार म्हणून विजयी झाला. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार लक्षद्वीपमधून उभा केला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तीन मुस्लीम उमेदवार दिले होते, पैकी दोघांचा विजय झाला.
सन २०१९ मध्ये भाजपाने देशात ४३६ जागा लढवल्या. त्यात तीन मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. त्यात एकही मुस्लीम विजयी झाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने देशात ४२८ जागा लढवल्या. त्यात ७ मुस्लिमांना तिकिटे दिली. पैकी एकही मुस्लीम विजयी झाला नाही. यंदा २०२४ मध्ये भाजपा ४४० जागा लढवत आहे, केवळ एकाच जागेवर मुस्लीम उमेदवार दिला आहे.

सीपीआय व सीपीआय (एम) यांनी २०१९ च्या निवडणुकीत १३ मुस्लीम उमेदवार दिले होते. त्यात ७ उमेदवार पश्चिम बंगालमधील होते. केवळ एकच निवडून आला. २०१४ मध्ये या दोन पक्षांनी १७ मुस्लीम उमेदवार दिले, दोन जिंकले. यंदा २०२४ मध्ये सीपीआय (एम) ने १० मुस्लीम उमेदवार दिले आहेत. त्यातले ५ पश्चिम बंगाल, ४ केरळ व १ तेलंगणात आहे.
जम्मू-काश्मीर वगळता, सर्वाधिक २२ मुस्लीम उमेदवार उत्तर प्रदेशात आहेत. पश्चिम बंगालमध्ये १७, बिहारमध्ये ७, केरळमध्ये ६, मध्य प्रदेशात ४ व मुस्लीम टक्केवारी मोठी असलेल्या आसाममध्ये केवळ ३ मुस्लीम उमेदवार आहेत.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

4 hours ago