Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता!

मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता!

मुंबई : राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कुठे पावसाची हजेरी दिसत आहे, तर कुठे उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणेसह, पालघरमध्ये आज पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. या भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, २९ मेपासून ते १ जूनपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

याशिवाय, अहमदनगर, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या भागात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात मात्र तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. आयएमडीने अकोलासह नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याला २९ आणि ३० मे रोजी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याउलट देशाच्या दुसरीकडे, पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पूर्व राजस्थानचे अनेक भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

येत्या २४ तासांत केरळात दाखल होणार मान्सून

यावर्षीच्या भयंकर उन्हाळ्याने आजवरचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. तीव्र उन्हामुळे झळांनी होरपळून निघालेल्या मानवाला आणि समस्त जीवसृष्टीला आता आस लागून राहीली आहे ती मान्सूनच्या आगमनाची. आणि आता तो चक्क येत्या २४ तासांत केरळमध्ये दाखल होत आहे.

गेल्या आठवड्यात अंदमानात दाखल झालेला मान्सून रेमल चक्रीवादळाचा अडथळा यशस्वीपणे परतवत उद्या केरळच्या भूमीवर दाखल होत आहे. या आनंदवार्तामुळे शेतकरीवर्गासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुशखबर! मान्सून १० जूनला मुंबईत येणार, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

उकाड्याने संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतेय. तर आता सर्वांनाच पावसाचे वेध लागलेत. रेमल वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून सुटका होणार हे मात्र नक्की. येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवतोय. विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्याने पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान ४४ ते ४९ अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस होत असताना, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पंढरपूरमधील उजनी धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणी आटल्याने धरणाच्या जमिनीला भेगा पडल्याचे दृश्य दिसतंय. तर धरणातील पाणी कमी झाल्याने मंदिरंही पाण्याबाहेर दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -