घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेलं अन्…
अकोला : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. घरी परतणाऱ्या एका ७८ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करुन तिच्यावर एका दुचाकीस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिला सुखरुप असून प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, अकोला पोलीस आरोपींचा शोध घेत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ७८ वर्षीय वृद्ध महिला अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतत होती. दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर ही महिला बसमधून उतरुन गावाकडे पायी चालत होती. त्यावेळी तिघेजण दुचाकीने आले व तिला गावात सोडतो, असे सांगत शेतशिवारात घेऊन गेले. त्यानंतर या तिघांपैकी एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच अत्याचार केल्याचा गुन्हा कोणाला सांगितल्यास, ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली.
या घटनेदरम्यान गावातील काही लोक रस्त्यावरून जात असताना या वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. वृद्ध महिलेचा आवाज कानावर पडताच त्या व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. गावातील व्यक्तींनी या महिलेची सुटका केली असून तिला सुखरुपरित्या घरी सोडलं. मात्र त्यावेळी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.
दरम्यान, याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.