Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कोस्टल रोडच्या पुलाला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गळती सुरू

कोस्टल रोडच्या पुलाला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गळती सुरू

रोड सुरक्षित असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा


मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात भिंतींच्या बाजूला असलेल्या एक्सपान्शन जॉईंटमध्ये सोमवारी पाणी झिरपताना दिसून आले. त्यामुळे करोडो रुपये खर्चूनही हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित कसा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. बोगद्यात ४ जॉइंट्सपैकी एका जॉइंट्समध्ये ही गळती झाल्यामुळे वाहतुकीला दिवसभरात किंवा यापुढे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही अडथळा नाही, असे कोस्टल रोड प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बहुचर्चित कोस्टल रोडच्या पुलाला पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गळती सुरू झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईचा मानबिंदू असलेल्या कोस्टल रोडला गळती लागली असली तरी महापालिका प्रशासनाने मात्र हा रोड सुरक्षित असल्याचा दावा केला.


दरम्यान, कोस्टल रोड बोगद्याचा काही भाग ११ मार्च रोजी मुंबईतील वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यानंतर दोन महिन्यांतच येथे पाण्याची गळती दिसून आली आहे. विशेषत: प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरजवळील दक्षिणेकडील बोगद्याच्या टोकाला भिंती आणि छतामधून पाणी वाहत आहे. दक्षिणेकडील बोगद्यातील भिंतींच्या दोन्ही बाजूंना गळती दिसून येते, वरील स्लॅब देखील ओला दिसत आहे. सततच्या पाण्याच्या गळतीमुळे येथील भिंतींवरील रंग उखडला आहे. जवळपास ७ लाखांहून अधिक वाहनांनी आतापर्यंत या मार्गावरुन प्रवास केला आहे. लवकरच याची दक्षिण मार्गिका खुली करण्याचा विचार प्रकल्प अधिकाऱ्यांचा आहे. मात्र, त्याआधीच कोस्टल रोडच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पडताना दिसत असल्याने हा रस्ता खर्च वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता मुंबईकरांकडून उपस्थित होत आहे.



कोस्टलचा दुसरा बोगदाही लवकरच होणार सुरु


दरम्यान कोस्टल रोडचा दुसरा बोगदा प्रवाशांसाठी लवकरच उघडण्याची योजना आहे. लगतचा उत्तरेकडील बोगद्याचे बांधकाम अजूनही सुरू आहे, तो जूनमध्ये उघडण्याची अपेक्षा आहे. बोगद्याच्या चाचणीवेळी सततची पाणी गळती लक्षात आली होती. त्यानंतर याची कथित दुरुस्ती केली गेली, पण बोगद्याच्या उद्घाटनाच्या दोन महिन्यांत पुन्हा ही गळती सुरू झाली. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यामध्ये दहा किलोमीटर प्रवास करता येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा हा मार्ग असणार आहे. प्रवाशांसाठी हा कोस्टल रोड सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू असणार आहे. दरम्यान या कोस्टल रोडचे राहिलेले काम अंतिम टप्प्यात आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना तब्बल पाऊण तासांचा प्रवास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करता येणार आहे.



इपॉक्सी ग्राउंटिंग इंजेक्शनचा वापर


येत्या २ ते ३ दिवसांत बोगद्यातील भिंतींची डागडुजी करण्यात येईल. बोगद्यात भिंतींच्या बाजूला गळणारे पाणी हे भिंतीला गेलेले तडे नाहीत. त्यामुळे पुढच्या २ ते ३ दिवसांत त्याचे निरीक्षण करून त्यावर इपॉक्सी ग्राउंटिंग इंजेक्शनचा वापर केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कायमस्वरूपी दुरुस्तीचे मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश


मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. या घटनेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी एका रात्रीत संबंधित जागेवर डागडुजी करुन गळती थांबवली आहे. कोस्टलच्या टनेलमध्ये होणाऱ्या गळतीबाबत मी माहिती घेतली. मनपा आयुक्तांशी बोललो. टनेलच्या ग्राऊटींगमध्ये काही लिकेज आहेत. मुख्य बांधकामात कोणतीही गळती नाही. मूळ संरचनेला कोणताही धोका नाही. तिथे मनपा अधिकारी अमित सैनी, एलएनटीची टीम देखील पाहणीला गेली होती. आताही सर्व तज्ज्ञ मंडळी तिथं आहेत. जी काही दुरुस्ती करायची आहे ती कायमस्वरुपी असली पाहिजे. तात्पुरती असता कामा नये असे आदेश मी दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment